Friday 22 April 2016

पुस्तकप्रवासातल्या खाणाखुणा

पुस्तकप्रवासातल्या खाणाखुणा 
(एप्रिल २०१६ च्या 'आपले वाङ्मयवृत्त'मध्ये प्रकाशित झालेला लेख)

गिरगावातल्या ठाकूरद्वार सिग्नलपासच्या भारत बुक डेपोमध्ये जुन्या मराठी पुस्तकांच्या शोधात मी दहाअकरा वर्षांपासून जातोय. या दुकानाचा शोध कसा लागला ते आता नेमकं आठवत नाही. अरुण टिकेकरांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळी  या २००५च्या पुस्तकात भारत बुक डेपोविषयीची आठवण सांगितली आहे : “...नवनीतच्या आवृत्त्यांच्या शोधात असताना एकदा मुंबईतल्या ठाकुरद्वारजवळच्या भारत बुक डेपोपर्यंत पोहोचलो. भारत बुक डेपोमध्ये त्यापूर्वीही अनेकदा गेलो होतो. पुस्तकांच्या दुकानाचे मालक आवटी हे माझ्या वडिलांचे मित्र होते. ते फक्त नवी पुस्तकं विकत, असा माझा समज होता. नवनीतच्या आवृत्त्यांच्या शोधात मी तिथं पोहोचलो, तेव्हा मालक आवटी खूपच वृद्ध झाले होते. त्यांची दोन मुलं दुकान सांभाळायची. आजही तसंच आहे, फक्त वडील नाहीत. भारत बुक डेपोत मला नवनीतच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या तर मिळाल्याच, पण इतरही काही दुर्मीळ मराठी पुस्तकं मिळाली. तेव्हापासून गिरगाव भागात गेलो की ठाकुरद्वारी जाऊन भारत बुक डेपोच्या पुस्तकांवरून नजर फिरवण्याची ऊर्मी येत गेली. पुस्तकंही मिळत गेली.
ही आठवण वाचूनच बहुदा मी भारत बुक डेपो धुंडाळला असेल. अरुण टिकेकरांच्या पुस्तकात उल्लेख असलेल्या दुकानांपैकी महम्मदअली रोडवरची कोकिळ ॲन्ड कंपनी आणि अलवी बुक डेपो ही दोन्ही तोपावेतो बंद पडली होती. तुम्ही दुर्मीळ पुस्तकांसाठी काही वर्षं उशिरा आलात, असं दिल्लीजवळच्या गुरगावमधले दुर्मीळ पुस्तक-विक्रेते अरुण टिकेकरांना म्हणाले होते. पण टिकेकरांचं पुस्तक वाचून, आपल्याला टिकेकरांपेक्षाही उशीर झाला, अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. फक्त काळबादेवीचं न्यू ॲन्ड सेकंडहँड बुक्स हे दुकान अद्याप चालू होतं. तिथं मी पूर्वीपासून जायचो. मुंबई विद्यापीठात १९९४ ते ९६ या काळात मराठीत एम० ए० करत असताना इंग्रजी वाचायला सुरुवात केली. भालचंद्र नेमाडे तेव्हा विद्यापीठाच्या तौलनिक साहित्याच्या गुरुदेव टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. इंग्रजी वाचायला कोणत्या पुस्तकापासून सुरुवात करावी हे विचारायला एके दिवशी थेट त्यांच्याकडेच गेलो (आमच्या डोक्यात थेट सार्त्र-कामू-काफ्का होते. त्यांच्या पेंग्विन क्लासिक्स आवृत्त्या त्या काळात हुतात्मा चौकातल्या फुटपाथवर सहजी मिळत). आणि नेमाड्यांनी सांगितलं, दॉन किहोते, रॉबिन्सन क्रुसो, गलिव्हर्स ट्रॅव्हल्स  या क्लासिक्सपासून सुरुवात करा. या इंग्रजी पुस्तकांसाठी दुकानाचा ठावठिकाणाही त्यांनी सांगितला : काळबादेवी भागातलं न्यू ॲन्ड सेकंडहँड बुक्स. तेव्हापासून मी तिथे चकरा मारू लागलो. अर्थात, १९९४-९५ नंतर या दुकानाचा पडता काळ सुरू झाला. फारसं काही मिळत नसे. सर्बियन कवी वास्को पोपा याचं कलेक्टेड पोएम्स  किंवा विल्यम फॉकनरचं स्टिफन ओट्सने लिहिलेलं जाडजूड चरित्र, असा क्वचित केव्हातरी सुखद धक्का बसायचा. एकदा वरच्या मजल्यावरच्या कपाटाखाली सारून ठेवलेली केसरी-प्रबोध  या ग्रंथाची अर्धवट आवृत्ती हाती लागली. आणखी एकदा लाईफ ॲन्ड ॲडव्हेंचर्स ऑफ रॉबिन्सन क्रुसो  या पुस्तकाची जुनी पुठ्ठा बांधणीतली प्रत. या आवृत्तीचं वैशिष्ट्य असं की १८२० सालच्या स्टोथर्ड एडिशन म्हणून नावाजल्या गेलेल्या आवृत्तीवरून केलेलं हे हुबेहूब पुनर्मुद्रण होतं. थॉमस स्टोथर्ड (Thomas Stothard) या रेखाचित्रकाराने काढलेली वुडकट्स तंत्राने छापलेली रेखाचित्रं आणि मूळचा टाईप या दोन्ही गोष्टी या पुनर्मुद्रणात कायम होत्या. थॉमस स्टोथर्ड याने इंग्रजी साहित्यातल्या सर्व महत्त्वाच्या साहित्यकृती आपल्या रेखाचित्रांची जोड देऊन सादर केल्या, म्हणून त्याला इलस्ट्रेटर ऑफ द इंग्लिश लिटरेचर म्हणून नावाजलं जातं. अशा खास वस्तू तुरळक का होईना, पण न्यू ॲन्ड सेकंडहँडमध्ये मिळाल्या.

भारत बुक डेपोमध्ये दहाअकरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा गेलो, तेव्हा दुकानमालक आवटी यांच्या ज्या दोन मुलांचा उल्लेख अरुण टिकेकरांनी अक्षरनिष्ठांची मांदियाळीमध्ये केला आहे, त्यांपैकी शशिकांत आवटी उतारवयात दुकान सांभाळताना दिसले. टिकेकरांना ललित साहित्याची नवी पुस्तकं विकणारं दुकान म्हणून भारत बुक डेपो प्रामुख्याने ठाऊक होतं. आता इतक्या वर्षांनंतर मला ते दिसलं, शालेय क्रमिक पुस्तकं आणि स्टेशनरीच्या दुकानाच्या रूपात. १९२३ साली सुरू झालेलं हे दुकान बदलत्या काळाप्रमाणे स्वतःचं रूप पालटत राहिलं. हा काळाचा अटळ महिमा होता : ज्या समाजात पुस्तक ही गरजेची सोडा, चैनीची देखील वस्तू मानली जात नाही, तिथं आज केवळ दुर्मीळ पुस्तकं किंवा ललित साहित्याची पुस्तकं विकून चरितार्थ चालवणं अवघड आहे. पण अद्यापही भारत बुक डेपोतली एक मागली भिंत दुकानाचं मूळ सत्त्व सांभाळत उभी होती. त्या भिंतीला छतापर्यंत चढत गेलेल्या फडताळांत दुर्मीळ, जुन्या पुस्तकांची गर्दी दाटली होती. क्रमिक पुस्तकांच्या फडताळांच्या रांगांमधून वाट काढत जायचं आणि मागच्या भिंतीपासच्या जेमतेम आणि कोंदट जागेत घामाने निथळत पुस्तकांचा एकेक गठ्ठा उपसत उभं राहायचं.
मी भारत बुक डेपोत पोहोचेपर्यंत मुंबईतल्या दुर्मीळ पुस्तकांचाही भरतीचा काळ ओहोटत आला असावा. तरीही इथं मला एकोणिसाव्या शतकातल्या व्यक्तींविषयीचं चरित्रपर साहित्य बरंच मिळालं. पु० बा० कुलकर्णींनी लिहिलेली जगन्नाथ शंकरशेट, न्यायमूर्ती चंदावरकर, मामा परमानंद, निर्णयसागरचे जावजी दादाजी (निर्णयसागरची अक्षरसाधना) यांची चरित्रं मला इथं मिळाली. काशिबाई कानिटकरांनी लिहिलेलं आनंदीबाई जोशींचं चरित्र (1889 सालची पहिली आवृत्ती; पुस्तकाच्या प्रतीवर नेटिव्ह लायब्ररी, वेंगुर्ले असा शिक्का आहे), त्र्यंबक रघुनाथ जोशींचं वासुकाका जोशी आणि त्यांचा काळ, अहिताग्नी राजवाडे यांचं आत्मवृत्त, देवदत्त टिळकांनी लिहिलेलं महाराष्ट्राची तेजस्विनी : पंडिता रमाबाई, विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला  अशी मी आजवर न पाहिलेली पुस्तकं पहिल्याच एकदोन भेटींत मिळाल्याने मी भारत बुक डेपोत नियमित जाऊ लागलो. या  काळात एकदा तिथं ग० रा० हवलदार यांनी लिहिलेलं, अत्यंत विस्कळीत रिपोर्ताजवजा, पण माहितीपूर्ण तपशिलांनी खच्चून भरलेलं रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचं चरित्र  मिळालं. १९२७ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा फक्त पहिलाच खंड भारत बुक डेपोत होता. त्याची पृष्ठसंख्या ६४० होती. हा पहिला खंड वाचून माझी खात्री पटली की चरित्रलेखकाच्या कितीही मर्यादा असल्या तरी एकोणिसावं शतक समजावून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. ग० रा० हवलदार यांच्यासमोर मंडलिकांच्या चरित्राची प्रचंड सामग्री होती : अनेक मान्यवरांशी असलेला मंडलिकांचा फार मोठा पत्रव्यवहार, त्यांची भाषणं, विविध विषयांवरचे लेख, त्यांची प्रत्येक वर्षाची रोजनिशी, इत्यादी. पण त्यांनी स्वतःच प्रस्तावनेत म्हटलंय त्याप्रमाणे, ही सारी सामग्री पाहून ते भांबावून गेले, या त्यांच्या प्रामाणिक कबुलीवरूनच ते सामान्य वकुबाचे चरित्रलेखक होते हे ध्यानात येतं.  त्यांनी या सर्व साधनांमधली माहिती सरधोपटपणे आहे तशी वापरून चरित्र लिहिलं. त्यामुळे चरित्रात अनेक ठिकाणी पाल्हाळ आहे, माहितीच्या निवडीमध्ये सुसंगतीचा अभाव आहे, संशोधकीय शिस्तीचा अभाव आहे, आणि चरित्राची मांडणीही अतिशय विस्कळीत आहे;  पण त्याचा एक फायदा असा होतो की १८४० ते १८९० या काळातल्या महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या सामाजिक घडामोडींचा, नीट संपादित न केलेला किंवा व्यवस्थित आकार नसलेला रंजक तपशील या पुस्तकात भरपूर मिळतो. मंडलिक आधुनिक शिक्षणाने संस्कारित, वकील, मुंबई आणि कलकत्ता इथल्या इंग्रज सरकारच्या कायदेकौन्सिलाचे सदस्य, संपादक-लेखक, भारतविद्या आणि इतिहास या विषयांतले संशोधक इत्यादी असले, आणि सामाजिक सुधारणांसाठीही प्रयत्नशील असले, तरी ते बऱ्यापैकी परंपरावादी होते. ही त्यांची द्विधावृत्ती चरित्रात अनेक ठिकाणी दिसते. म्हणजे ते मुंबईत स्थापन झालेल्या पुनर्विवाह मंडळाचे सदस्य होते; पण बाबा पदमनजींच्या यमुनापर्यटनवर त्यांनी खरमरीत टीका केली होती. ग्रंथसंग्रहाचं जबरदस्त व्यसन असलेल्या मंडलिकांनी हजारो मुद्रित ग्रंथ (धार्मिक ग्रंथांसह) संशोधनासाठी जमवले होते; पण देवघरात पठणासाठी मात्र ते कटाक्षाने भग्वद्घीतेची, किंवा अन्य धार्मिक ग्रंथाची हस्तलिखित प्रतच वापरत होते. आधुनिकतेविषयीच्या या त्यांच्या द्विधावृत्तीमुळे एकोणिसाव्या शतकातल्या प्रबोधनप्रक्रियेकडे पाहण्याचा तत्कालीन शिक्षित पिढीतला, सुधारक आणि सनातनी यांच्याहून वेगळा, एक नवा कोन उघड होतो.
हा खंड वाचून मंडलिकांविषयी अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागलो. पुस्तकाचा दुसरा खंड कुठं मिळेना. वि० ना० मंडलिकांकडे लाखभर पुस्तकं होती, असं अ० का० प्रियोळकरांनी आपल्याला सांगितलं होतं, असं रवींद्र पिंगे यांनी प्रियोळकरांवरच्या लेखात लिहून ठेवलं आहे. एकदा अरुण टिकेकरांकडे गेलो असताना मंडलिकांच्या या चरित्राचा विषय काढला. त्यांनी माहिती दिली की मंडलिकांचा संग्रह त्यांच्या मुलाने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयाकडे सोपवला होता. तिथे तो वरच्या मजल्यावर कुलुपबंद खोलीत धूळ खात पडला आहे; आता त्या पुस्तकांची पानं जीर्ण होऊन त्यांचे तुकडे पडू लागले आहेत. पण टिकेकरांना ग० रा० हवलदार लिखित मंडलिक चरित्राची काहीच माहिती नव्हती. ते म्हणाले, ते पुस्तक माझ्या पाहण्यात आलेलं नाही. त्यांच्या तोंडून मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं. एखादं चांगलं पुस्तक त्या क्षेत्रातल्या दर्दी, जाणकार अभ्यासकाच्या नजरेतून सुटू शकतं असं समजून मी गप्प बसलो. टिकेकरांना माहीत नसलेलं एकोणिसाव्या शतकासंदर्भातलं एक पुस्तक आपण वाचलं आहे, आपल्या मालकीचं आहे, या कल्पनेने मी मनात थोडा फुशारूनही गेलो.
नंतर एखाद्या वर्षाने मला या पुस्तकाचे दोन्ही खंड माहीमच्या एका रद्दीवाल्याकडे मिळाले. दोन्ही खंडांची मिळून सुमारे साडेबाराशे पानं. त्यांची पुठ्ठा-बांधणी पुस्तकांच्या कण्यापाशी निखळलेली असली, तरी मूळचीच कायम होती. त्यावरची धूळ कपड्याने पुसल्यानंतर सोनेरी अक्षरांत एम्बॉसिंग केलेलं पुस्तकाचं शीर्षक चमकू लागलं. आधीचा भारत बुक डेपोमध्ये मला मिळालेला पहिला खंड पुनर्बांधणी केलेला होता. भारत बुक डेपोच्या शशिकांत आवटींची मला नापसंत असलेली एक वाईट खोड म्हणजे, त्यांच्याकडे आलेल्या जुन्या पुस्तकाची बांधणी उसवलेली किंवा खराब झालेली असेल, किंवा त्याचं मुखपृष्ठ, वेष्टण (book jacket) फाटलं असेल, तर ते त्यांची घाऊकपणे नव्याने बांधणी करवून घेतात. या बांधणीत मूळ पुस्तकाचं वेष्टण, मुखपृष्ठ किंवा त्याच्या आतली पुस्तकाची सुरुवातीची पानं यांचा बळी जातो, ही बाब त्यांना दुर्लक्षणीय वाटते. पण पुस्तकाच्या मूळ रूपाशी अशी कुठल्याही प्रकारे छेडछाड करणं मला क्रूरपणाचं कृत्य वाटतं. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी प्राचीन काळची मोडकळीस आलेली मंदिरं जीर्णोद्धाराच्या नावाखाली पूर्णपणे मोडीत काढून तिथं सिमेंटची ठोकळाछाप मंदिरं उभारली जातात; त्यासारखाच हा एक प्रकार. पुस्तकाचं मूळ मुखपृष्ठ, वेष्टण किंवा त्याच्या आतली सुरुवातीची पानं, ही फाटलेली किंवा खराब झालेली असली तरी त्यांना त्या पुस्तकाच्या एकूण अस्तित्वात एक महत्त्वाचं स्थान असतं. त्यामुळे त्यांची आहे त्या परिस्थितीत जपणूक करणं मला आवश्यक वाटतं. आवटींकडून मला मिळालेला मंडलिक चरित्राच्या पहिल्या खंडात पुस्तकाची मूळची सुंदर पुठ्ठाबांधणी, मुखपृष्ठावरची फुलांची नक्षी आणि सोनेरी अक्षरात एम्बॉसिंग केलेलं शीर्षक यांचा बळी गेलेला होता. आता हा दोन खंडांचा मूळ बांधणीतला संच मिळताच मी माझ्याकडची पहिल्या खंडाची साध्या पुठ्ठाबांधणीतली विरुप प्रत काढून टाकली आणि निखळलेल्या, पण  सुंदर बांधणीच्या या संचाची माझ्या संग्रहात स्थापना केली. पण हे लगेच झालं नाही. तोवर माझी आधीची प्रत वाचून झाली होती. जागजागी खुणा तर होत्याच; पण पुस्तकाच्या शेवटच्या कोऱ्या पानांवर पृष्ठ क्रमांकासह महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. ही माझ्या अभ्यासापुरती तयार केलेली सूची असते. नंतर जेव्हा जेव्हा पुस्तकातला एखादा संदर्भ लागेल, तेव्हा पूर्ण पुस्तक चाळण्याची गरज राहात नाही. शेवटच्या नोंदी अचूक संदर्भ पुरवतात. मंडलिक चरित्राच्या प्रतीला निरोप देण्याचा प्रसंग आला, तेव्हा तिच्या अखेरच्या पानांवर केलेल्या सगळ्या नोंदी स्वतंत्र कागदावर लिहून घ्याव्या लागल्या. मग एवढे उपद्व्याप करण्यापेक्षा दोन्ही प्रती ठेवायला काय हरकत आहे, असं कोणी म्हणेल. पण मी जागेची एवढी चैन करू शकत नाही. माझ्याकडे अपुऱ्या जागेत इतक्या पुस्तकांची दाटी झाली आहे, की एका पुस्तकाच्या दोन प्रती संग्रही ठेवणं म्हणजे दुसऱ्या एका पुस्तकाला आपल्या संग्रहात प्रवेश नाकारणं ठरतं. त्यापेक्षा थोडे कष्ट पडलेले परवडतात.
भारत बुक डेपोच्या प्रत्येक फेरीत असं खास काहीतरी मिळत गेलं. केशव शिवराम भवाळकर यांचं १९६१मध्ये विदर्भ संशोधन मंडळाने प्रकाशित केलेलं त्रुटित आत्मकथन मिळालं. जोतीबा या शब्दापाशी हे पुस्तक थबकलं आहे. महात्मा जोतीबा फुल्यांचं एक वेगळंच बेधडक, रांगडं व्यक्तिमत्त्व या पुस्तकात वर्णिलेल्या अखेरच्या घटनेत दिसतं. दक्षिणा प्राईज कमिटीच्या प्रारंभीच्या योजनेबद्दल नापसंती दाखवून ती बंद करण्याची मागणी इंग्रज सरकारकडे केल्याबद्दल लोकहितवादी आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या विरोधात पुण्यातल्या सनातनी ब्राह्मणांनी ग्रामण्याची सभा भरवली. तिथं जमलेल्या सनातनी ब्राह्मणांच्या क्षोभाला सामोऱ्या जाणाऱ्या या ब्राह्मण सुधारकांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन, इंग्रज सरकारात दक्षिणा प्राईझ कमिटीच्या विरोधातला अर्ज आपण केला होता असं म्हणत, त्या प्रकरणाची जबाबदारी महात्मा फुल्यांनी स्वतःवर घेतली. शिवाय, लोकहितवादी व त्यांच्या सहकाऱ्यांना बहुजन-दलित समाजातल्या दोनेकशे तगड्या लोकांचं संरक्षणही महात्मा फुल्यांनी पुरवलं. ग्रामण्याच्या तडाख्यात सापडलेल्या लोकहितवादींच्या सहकाऱ्यांपैकी केशव शिवराम भवाळकर हे एक होते. सावित्रीबाई फुल्यांना गुपचूप अक्षरओळख शिकवणारे केशव शिवराम ते हेच. त्यांचं आत्मकथन हा या ग्रामण्याच्या घटनाक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन करणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पण हे त्रुटित आत्मकथन नेमक्या या प्रसंगापाशीच थांबलेलं आहे. एकदा,  साताऱ्याहून १९४५ साली प्रकाशित झालेलं आगरकरांशी ओळख  हे पु० पां० गोखले यांचं पुस्तक आणि १९४६मध्ये प्रकाशित झालेला, बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणमधल्या लेखांचा दर्पण-संग्रह  ही पुस्तकं मिळाली. इंग्रजी पुस्तकं तिथं फारशी मिळत नसतानाही गिबनच्या राईज ॲन्ड फॉल ऑफ रोमन एम्पायरचे पुठ्ठा बांधणीतले पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकांचे खंड मिळाले (मधला दुसऱ्या क्रमांकाचा खंड पुढं काही वर्षांनी पुण्यात लकडी पुलावर मिळायचा होता). सयाजीराव गायकवाड यांच्या १९३३ सालच्या वाढदिवशी प्रकाशित झालेला सुमारे आठशे पानांचा सयाजी गौरव-ग्रंथ  मिळाला. दामोदर सावळाराम यंदे, चिं० वि० जोशी, य० रा० दाते ही मंडळी या ग्रंथाच्या संपादक मंडळावर होती. १९०६ साली प्रसिद्ध झालेला, अनंत नारायण भागवत लिखित सयाजीराव चरित्राचा दुसरा भाग मिळाला (या पुस्तकाचा पहिला भाग दलित-ब्राह्मणेतर चळवळींच्या साहित्याचे व कागदपत्रांचे ज्येष्ठ संग्राहक रमेश शिंदे यांच्याकडे आहे. दोन्ही भाग एकाच संग्रहात ठेवले पाहिजेत यावर आमचं दोघांचं एकमत आहे. फक्त दोघांपैकी कोणाच्या संग्रहात ते असावेत याविषयी अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्यांचं उतारवय लक्षात घेता ते माझ्या संग्रहात असावेत हा माझा विचार त्यांना अन्यायाचा वाटतो; आणि त्यांच्या ज्येष्ठतेचा, अनुभवाचा मान म्हणून ते त्यांच्या संग्रहात असावेत ही त्यांची इच्छा मला अनाठायी वाटते). महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकाचा सांस्कृतिक इतिहास समजावून घेण्याची जिज्ञासा माझ्या मनात सर्वप्रथम भारत बुक डेपोमध्ये मिळालेली ही पुस्तकं वाचताना निर्माण झाली. मग पुढं मी त्या दिशेने पुस्तकसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला.
गेल्या तीनचार वर्षांत भारत बुक डेपोत मला महत्त्वाची वाटणारी पुस्तकं मिळण्याचं प्रमाण कमी कमी होत गेल्यावर माझ्या तिथल्या फेऱ्याही रोडावल्या. आता मी तिथं वर्षातून दोनतीनदाच केवळ जातो. शशिकांत आवटी आता काहीसे थकलेले दिसत असले, वयोमानानुसार येणाऱ्या आजारांनी त्रस्त असले, तरी तितक्याच उत्साहाने पुस्तकं दाखवतात. आणि मी एकदाही रिकाम्या हाताने येत नाही, एखादं तरी पुस्तक आणतोच, हा त्यांच्या संग्रहाचा विशेष. आता तर त्यांनी संगणकावर त्यांच्याकडच्या दोनअडीच हजार पुस्तकांची सूची तयार करवून घेतली आहे; पुस्तकांना आणि त्यांच्या गठ्ठ्यांना क्रमांक देऊन पुस्तकांची स्वतःपुरती वर्गीकरण पद्धतीही तयार केली आहे. दुकानातल्या मागच्या भिंतीपाशी काळोख्या जागेत आपण घाम गाळत उभं राहण्याची आता गरज नाही. सूची पाहून पुस्तकाचा क्रमांक त्यांना दिला की ते पुस्तकाचा तो गठ्ठा काढून समोर ठेवतात. कुठून खास काही पुस्तकं आली की आवर्जून फोन करतात. असा फोन आला की मी माझी त्यांना एवढीच विनंती असते : पुस्तकं माझ्या नजरेखालून जाईपर्यंत पुनर्बांधणी करायला पाठवू नका. पुस्तकांचं प्राईसिंग त्यांनी स्वतः केलेलं असतं. क्वचित एखाद्या पुस्तकाची दुर्मीळ म्हणून जरा जास्तच किंमत लावलीय असं मला वाटतं. मग मी थोडी घासाघीस करतो. आता त्या अमक्या पुस्तकाची नवी आवृत्ती निघाली आहे, ती यापेक्षा स्वस्त किमतीत आहे, किंवा अमुक एक पुस्तक इंटरनेटवर आता मोफत उपलब्ध असताना तुमची ही महागडी प्रत कोण घेईल, असं म्हणत मी त्यांना थोडं डिवचतो. अशा वेळी त्यांच्या चेहऱ्यावर तरळणारा अगतिक भाव पाहून मलाच कसंसं होतं. त्या क्षणी ते मला, फुटलेल्या नावेत पाण्याचे लोट शिरत असताना नावेच्या फटी बंद करू पाहण्याची निष्फळ धडपड करणाऱ्या नावाड्यासारखे भासतात. परवा अशाच घासाघिशीच्या प्रसंगी मी त्यांना म्हटलं, अहो, माझ्यासाठी तुम्ही आहात आणि तुमच्यासाठी मी आहे. असं दुसरं कोणी आता आपल्यासाठी उरलेलं नाही. आपणच एकमेकाला सांभाळून घ्यायला हवं. ते मोकळं हसले. मग आम्ही दोघांनाही समाधानकारक वाटेल असा मध्यममार्ग काढला.
पण मी म्हटलं त्याप्रमाणे आवटी मला सतत काही ना काही देत राहिले. संगीत नाटकांच्या काळातल्या मराठी नाट्यविश्वाचं आतून दर्शन घडवणारी पु० रा० लेल्यांची दोन हट केपुस्तकं, महाराष्ट्राचे दुसरे वेड  आणि नाटकमंडळीच्या बिऱ्हाडी त्यांनी मला दिली; एकदा हरिभाऊ मोटे यांच्या एक सर्वमंगल क्षिप्रा  या आत्मकथनाचे देखणे दोन खंड दिले. या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडात मोटे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाविषयीच्या हकिगती छापलेल्या आहेत. त्या वाचून मोटे प्रकाशनाची पुस्तकं संगृहित करण्याची मला मनापासून इच्छा झाली. एकदा तर, तीसेक वर्षांपूर्वी गुन्हेगारी कथालेखक, थ्रीलर्स-लेखक म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेल्या श्रीकांत सिनकर यांच्या संग्रहातली कोसलाची प्रतही मिळाली. आवडलेला मजकूर जागजागी अधोरेखित करून ठेवलेला आणि काही ठिकाणी समासात शेरे मारलेले : ‘Top Jock’, ‘Top’, ‘वंडरफुल,अतिशय सुंदर वाक्य. प्रश्नच नाही इत्यादी; आणि शेवटच्या कोऱ्या पानावर कोसलाविषयी पसंतीदर्शक पानभर मजकूर; त्यात कोसलाचं भरभरून कौतुक; आणि त्यावर विरजण घालणारं शेवटचं वाक्य : ‘एकंदर कादंबरी नक्कीच टॉप. पण संस्काराला जपायला हवं
मी उशिरा, म्हणजे, विसाव्या शतकाच्या शेवटच्या चतकोरात जन्माला आल्यामुळे वाचायचं राहून गेलेली अनेक लेखकांची पुस्तकं मला वाचायला मिळावीत म्हणूनच जणू काही भारत बुक डेपोशी माझा ऋणानुबंध निर्माण झाला होता.  शेजवलकर, हरिभाऊ आपटे, सेतुमाधवराव पगडी, ग० त्र्यं० माडखोलकर हे लेखक मी इथून घेऊन वाचले. मराठीतले एकोणीसशे पन्नासपूर्वीचे जवळजवळ सर्वच कादंबरीकार आता अडगळीत पडले आहेत. वि० वि० बोकील, केतकर, नाट्यछटाकार दिवाकर यांच्याकडे माझं लक्ष वेधलं गेलं ते भारत बुक डेपोत त्यांची पुस्तकं हाती लागल्यामुळे (एरवी मी हे लेखक वाचण्यासाठी खास ग्रंथालयात गेलो असतो का याविषयी शंकाच आहे). माडखोलकरांसारख्या लेखकाला त्यांचे समकालीन समीक्षक देखील कादंबरीकार मानत नसत आणि आज तर त्यांचं नावही कुणी घेत नाही. माडखोलकरांची १९३३साली प्रकाशित झालेली मुक्तात्मा  ही पहिलीच कादंबरी मला भारत बुक डेपोत मिळाली. ही कादंबरी प्रकाशित होताच अतिशय वादग्रस्त ठरली, ती माडखोलकरांनी कादंबरीतलं मुख्य पात्र कॉम्रेड डांगे यांच्यावरून बेतलं आहे, या आरोपावरून. ऐंशी वर्षांनंतर वाचताना मला मात्र या कादंबरीत वेगळ्याच गोष्टी दिसल्या. माडखोलकरांना स्वतःला पुस्तकांचं प्रचंड वेड होतं आणि तो काळ प्रबोधन चळवळीचा होता. या कादंबरीतली बहुतेक पात्रं सतत बौद्धिक चर्चा करणारी, पुस्तकांचा संग्रह आणि भरपूर वाचन करणारी आहेत; अनेक पुस्तकांच्या आणि लेखकांच्या संदर्भांनी कादंबरी खच्चून भरलेली आहे. आता माझी नोंदवही सांगते की मुक्तात्मामध्ये पुस्तकं किंवा लेखक यांचे एकूण ४२ उल्लेख, संदर्भ किंवा उद्धृतं आहेत. त्यात हॉल केन, लॉर्ड लीटन हे दोन आता विस्मरणात गेलेले पाश्चात्य कादंबरीकार (त्यापैकी लीटन हा एकोणिसाव्या शतकात काही काळ भारताचा गव्हर्नर जनरल होता) आणि इब्सेन; शेली, बायरन, कीट्स, वर्डस्वर्थ, मूर आणि फ्रेंच कवी म्युस्से हे पाश्चात्य कवी; मॅझिनी, रूसो, टॉलस्टॉय, मार्क्स, रस्किन, मॉरिस, ओवेन हे पाश्चात्य तत्त्वज्ञ-विचारवंत; बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, आगरकर हे भारतीय चिंतक, वि० कों० ओकांचा एक तिरकस उल्लेख, आणि भवभूती, कालिदास (शाकुंतल, मालतीमाधव), उत्तररामचरित, मोरोपंत (आर्याभारत) हे भारतीय कवी – इतके लोक आहेत. लेखक आणि त्यांची पुस्तकं यांचे एवढ्या संख्येने संदर्भ दुसऱ्या एखाद्या मराठी कादंबरीत असतील असं वाटत नाहीत. या कादंबरीतलं गुप्ते मास्तर या पात्राच्या खोलीचं माडखोलकरांनी केलेलं हे वर्णन वाचून मी माडखोलकरांवर बेहद्द खूश झालो : “त्यांची खोली म्हणजे एक अव्यवस्थित ग्रंथसंग्रहालयच होते. खिडक्या, अलमाऱ्या, टेबले, खुर्च्या, सारांश, ज्या ज्या वस्तूवर म्हणून पुस्तके ठेवणे शक्य होते, त्या त्या सर्व वस्तूंवर पुस्तकांचे ढीग रचलेले होते; व त्यांपैकी बहुतेकांवर धुळीचा थर साचलेला होता. मास्तर नैष्ठिक ब्रह्मचारी असल्यामुळे पुस्तके हीच त्यांची सर्व संपत्ती आणि त्यांचे सर्व सामान होते.खिडकी, अलमाऱ्या, टेबलं यांवरचे पुस्तकाचे ढीग ठीक आहेत, पण ज्याला  त्या ढिगांवर साचलेली धूळही दिसते (पण बोचत नाही), त्याला नक्कीच पुस्तकांविषयी आतून काहीतरी वाटत असतं. पण माडखोलकरांचं आणखी एका प्रकारचं लेखन मला आवडतं; ते म्हणजे, त्यांच्या समकालीन किंवा ज्येष्ठ अशा अनेक लेखकांविषयी त्यांनी लिहिलेली संस्मरणं. तत्कालीन समाजात वर्चस्व असलेल्या औचित्याच्या संकेतांना न जुमानता बरंवाईट स्पष्टपणे लिहिलं आहे. मराठीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने समकालीनांविषयीची स्पष्टवक्ती संस्मरणं लिहिणारा दुसरा लेखक आजही नाही. तितकं मोकळं वातावरण मराठीत नाही, अशा लेखनाला समजून घेण्याची खिलाडू वृत्ती नाही. त्यामुळे आजही मराठीतली बहुतेक व्यक्तीविषयक सभ्यतेच्या-औचित्याच्या नाहक दबावाखाली सपक झालेली, खोटी खोटी असतात. माडखोलकरांनी मात्र या प्रकारचं लेखन बिनधास्त केलं. त्यापायी अनेकदा वाद अंगावर ओढवून घेतले. हे त्यांचं धाडस मराठी साहित्यात दुर्मीळ आहे.

पण माडखोलकरांच्या नॉन-फिक्शन पुस्तकांकडे मुळात मी वळलो कुठल्या कारणाने? ‘फडके-खांडेकरांच्या काळातले एक कादंबरीकार याशिवाय त्यांच्याविषयी मला आधी काहीच ठाऊक नव्हतं. भारत बुक डेपोत माझे आवडते लेखक, श्रद्धांजली, माझे लेखनगुरू  ही त्यांची पुस्तकं मला एकदा दिसली. ती मी चटकन विकत घेण्याचं कारण, त्यांवरची माडखोलकरांची स्वाक्षरी. लेखकाच्या स्वाक्षरीचं हाती आलेलं पुस्तक मी कधीच दूर लोटत नाही. अशा पुस्तकांना माझ्या संग्रहात मुक्त प्रवेश असतो. मग मी ही पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि त्यांच्याद्वारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि त्यांच्या नंतरच्या पिढीतले गडकरी-खांडेकर यांच्या काळातले साहित्यातले वेगवेगळे गट आणि केंद्रं, त्यांच्यातले संबंध आणि संघर्ष यांच्याविषयी मला बरंच ज्ञान झालं.
माडखोलकरांनी स्वाक्षरी केलेली ही पुस्तकं अरविंद ताटके या गृहस्थांना भेट दिलेली होती. श्री० अरविंद ताटके यांना स्नेहपूर्वक भेट असं या पुस्तकांवर लिहिलेलं होतं. ताटक्यांचं नाव लेखक म्हणून माझ्या कानावरून गेलं होतं. मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की भारत बुक डेपोत मला मिळणाऱ्या एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या इतिहासविषयक आणि चरित्रपर बहुतेक पुस्तकांच्या पहिल्या पानावर अरविंद ताटके यांचंच मालकीदर्शक नाव लिहिलेलं आहे.
अरविंद ताटके हे विसाव्या शतकाच्या अखेरच्या तीसपस्तीस वर्षांत चरित्रलेखक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्यांचा संग्रह भारत बुक डेपोच्या माध्यमातून आता हळूहळू माझ्या कपाटांमध्ये येऊन विसावला. बहुतेक पुस्तकं त्यांनी वाचलेली होती. त्यांतल्या मजकुरावर बहुदा लाल शाईने केलेल्या खुणा आणि समासात टपोऱ्या अक्षरांत टिपून ठेवलेल्या नोंदीही होत्या. ही त्यांच्या चरित्रलेखनाची पूर्वतयारी असावी. त्या खुणा-नोंदींच्या माध्यमातून मी ताटक्यांच्या मनोरचनेचा, अभिरुचीचा, वैचारिक भूमिकेचा अदमास घेऊ लागलो. त्यांनी लिहिलेलं एकही पुस्तक तोवर माझ्या वाचनात आलं नव्हतं. त्यांनी अनेक मराठी लेखक आणि क्रिकेटपटू यांची चरित्र लिहिली असल्याचं मला कळलं. या दोन परस्परविरुद्ध गुणधर्मांच्या प्रजातींशी एकाच वेळी ते कसे समरस झाले कुणास ठाऊक? त्यांचा संग्रह इथं जुन्या पुस्तकांच्या दुकानात का आला हेही मला ठाऊक नव्हतं. उतारवयात त्यांनी स्वतःच या संग्रहाचा त्याग केला असावा किंवा त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी हा संग्रह काढून टाकला असावा अशी मी समजूत करून घेतली. यातली दुसरीच शक्यता अधिक वाटत होती. याविषयी आवटींनाही मी त्या काळात कधी विचारलं नाही. 
पण अरविंद ताटके यांनी आयुष्यभर कष्टपूर्वक जमवलेला हा पुस्तक-संग्रह मला काहीसा आयता मिळाला, हे खरं. आणि या पुस्तकांच्या वाचनामुळेच मी एकोणिसाव्या शतकाच्या सांस्कृतिक इतिहासाकडे वळलो, त्याविषयी लिहू लागलो, हे देखील तितकंच खरं. या कारणाने माझ्या मनात ताटक्यांविषयी कृतज्ञताभाव निर्माण झाला.
ताटक्यांच्या संग्रहातून माझ्यापर्यंत पोहोचलेली काही पुस्तकं खासच होती. त्यापैकी एक म्हणजे, जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई  हे श्री० रा० टिकेकरांचं १९६१ सालचं पुस्तक. मराठीत हे पुस्तक अनोखं यासाठी आहे की दोन महनीय व्यक्तींच्या चरित्रांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा असा दुसरा प्रयत्न मराठीत झालेला नसावा. जदुनाथ सरकार आणि गोविंद सखाराम सरदेसाई हे दोघेही इतिहासकार. दोघांचंही इतिहासकार म्हणून व्यक्तिमत्त्व आणि महत्त्व वेगवेगळ्या कारणांसाठी. इतिहाससंशोधक म्हणून जदुनाथ सरकारांचा आवाका सरदेसाईंपेक्षा कितीतरी मोठा. पण मराठा इतिहासाच्या निमित्ताने दोघांमध्ये संपर्क प्रस्थापित झाला आणि त्यातून त्यांच्यात स्नेहबंधही निर्माण झाले. श्री० रा० टिकेकरांना या दोघांचाही सहवास लाभला होता. दोघांचंही व्यक्तिगत चरित्र, इतिहासकार म्हणून काम करण्याची, विचार करण्याची पद्धत आणि त्यांच्या हातून घडलेलं लेखनकार्य – हे सगळं टिकेकरांनी जवळून न्याहाळलं होतं. याचा अतिशय नेटका वापर करून टिकेकरांनी हे पुस्तक लिहिलं आहे. श्री० रा० टिकेकर म्हणजे, वाईकर भटजी  या कादंबरीचे लेखक धनुर्धारी यांचा मुलगा; आणि अरुण टिकेकर यांचे ते काका. दोन विद्वान पिढ्यांना जोडणारा, मधला तितकाच विद्वान दुवा.
श्री० रा० टिकेकरलिखित या पुस्तकामुळे माझ्या संग्रहाची श्रीमंती वाढते असं मला वाटण्याचं एक कारण म्हणजे पुस्तकाचा अनोखा विषय; आणि दुसरं कारण म्हणजे त्यावरची लेखकाची स्वाक्षरी. हे पुस्तक १९/१०/१९६१ रोजी खुद्द श्री० रा० टिकेकरांनी अरविंद ताटक्यांच्या इतिहासप्रेमाचं द्योतक म्हणूनत्यांना स्वाक्षरीनिशी भेट दिलं होतं. प्रत्येक पुस्तकवेड्याप्रमाणे माझ्याही संग्रहाचा छोटासा कोपरा, अशा, लेखकांच्या सह्यांनिशी असलेल्या पुस्तकांनी सजलेला आहे. या पुस्तकामुळे तो कोपरा आणखी समृद्ध झाला. पण एवढ्यावरच या पुस्तकाची कथा संपत नाही.
माझ्या संग्रहातल्या इतर कागदी आवरणांच्या पुस्तकांमध्ये हे पुस्तक शब्दशः उठून दिसायचं. त्याचं कारण, पुठ्ठा बांधणीच्या या पुस्तकाला सुंदर नक्षीकाम असलेल्या काळ्या सुती कापडाचं आवरण चिकटवलेलं होतं. हे कापड पहिल्या आणि शेवटच्या मुखपृष्ठाच्या आत, आसपास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुस्तकाच्या भागावरही पसरलेलं होतं. आवरणावर वरच्या बाजूला फुलांची नक्षी होती, तर आतल्या कापडावर रासनृत्य करणाऱ्या गोपिका आणि वाद्यं यांची चित्रं होती. असं कापडी आवरणाचं पुस्तक मी आजवर कधी पाहिलं नव्हतं. हे आवरण पुस्तकाला मूळचंच होतं असं वाटावं, इतकं ते त्याच्या बांधणीशी एकरूप दिसत होतं. मराठीतला कोणी प्रकाशक पूर्वी किंवा आता, अशा नक्षीदार, रंगीत कापडी आवरणाच्या बांधणीची पुस्तकं प्रकाशित करू इच्छिल हे मला अशक्य वाटत होतं. ताटक्यांनी ते पुस्तकावर चढवलं होतं असं मानावं, तर त्यांच्या संग्रहातल्या माझ्या संग्रही असलेल्या इतर एकाही पुस्तकाला असं कापडी आवरण दिसत नव्हतं. मग त्यांनी या एकाच पुस्तकाला कापडी आवरण घालण्याचं कारण काय, हे कळत नव्हतं. या पुस्तकावर कापडी आवरण आलं कुठून, हा प्रश्न अनुत्तरित राहत होता.
श्री रा टिकेकरांनी मोडी लिपीत लिहिलेला मजकूर व स्वाक्षरी
या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दुसरं एक पुस्तक भारत बुक डेपोच्या त्या काळोख्या भिंतीवरच्या एका फडताळावर माझी वाट पाहात पडून होतं. भारत बुक डेपोतला अरविंद ताटक्यांचा पुस्तक-संग्रह मला एकाच फेरीत मिळाला नव्हता. एक तर त्या कोंदट, अपुऱ्या जागेत जेमतेम दीड-दोन तास उभं राहिल्यावरच घुसमटून, कधी एकदा इथून बाहेरच्या मोकळ्या हवेत जातोय, असं होई. तेवढ्या वेळात पदरात पडणाऱ्या पुस्तकांवर समाधान मानून पुढच्या भेटीची वाट पाहावी लागे. तिथला एकेक विभाग मी असाच पाहिला. अशा पुढच्या एका भेटीत ताटक्यांच्याच संग्रहातलं आणखी एक पुस्तक माझ्या हाती लागलं : १९७६ साली श्री० रा० टिकेकरांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित झालेलं संपादित पुस्तक, मुशाफिर. अरुण टिकेकरांनी संपादित केलेल्या या पुस्तकात ना० गो० चापेकर, कवी अनिल, पु० ल० देशपांडे यांच्यापासून श्री० बा० जोशी, अरविंद ताटके यांच्यापर्यंत अनेकांचे श्री० रा० टिकेकरांविषयीचे लेख समाविष्ट आहेत. त्यातला पु० ल० देशपांड्यांचा मुशाफिर टिकेकर हा लेख वाचताना पुढील वाक्यांपाशी मी थबकलो : “मला त्यांच्या ग्रंथप्रेमातील आणखी एका गोष्टीचे कौतुक वाटते. खादी भांडारातून अनेक रंगीबेरंगी डिझाईनचे कापडाचे तुकडे आणून कागदी बांधणीच्या ग्रंथाचे चित्रविचित्र कापडी बांधणीत रूपांतर करून त्यांनी आपला ग्रंथसंग्रह नटवला आहे. त्यांच्या खाजगी ग्रंथांचे कपाट त्यामुळे एखाद्या हौशी गृहिणीच्या वॉर्डरोबसारखे दिसत असावे.
म्हणजे, सध्या माझ्या ताब्यात असलेल्या जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई  च्या प्रतीला खुद्द लेखकानेच कापडी वेष्टण चढवलं होतं तर! ही प्रत स्वतः टिकेकरांनीच ताटक्यांना भेट दिली असणार हे त्यावरच्या टिकेकरांच्या मोडी लिपीत लिहिलेल्या शेरायुक्त स्वाक्षरीवरून उघड होतं. मग मी मुशाफिरमधल्या ताटक्यांच्या लेखाकडे वळलो. श्री० रा० टिं०च्या सहवासातया लेखात ताटक्यांनी आपली आणि श्री० रा० टिकेकरांची पहिली भेट १९६०मध्ये कशी झाली, आणि पहिल्याच भेटीत आपल्याला इतिहास-वाचनाचा नाद आहे हे कळताच, अनेक प्रश्नांच्या फैरी झाडत त्यांनी आपल्या वाचनाची परीक्षा कशी घेतली याविषयी लिहिलं आहे. त्यानंतर मात्र ताटके अस्सल वाचक आहेत याबद्दल टिकेकरांची खात्री पटली आणि त्यांनी ताटक्यांना वाचन-लेखनासाठी अनेक प्रकारे प्रोत्साहन दिलं, पुस्तकं उपलब्ध करून दिली, या सर्व अनुभवाचं कथन करून पुढं एका ठिकाणी ताटके लिहितात : “टिकेकरांच्या साठाव्या वाढदिवशीच (१६//१९६१) त्यांचं सरकार-सरदेसाई पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याची पहिली प्रत त्यांनी मलाच दिली. त्यावर त्यांनी पुढील मजकूर मोडीत लिहिलेला आहे – चि० अरविंद ताटके यांस, इतिहास प्रेमाचे द्योतक म्हणून भेट.
'सरकार-सरदेसाई' या पुस्तकाच्या मुखपृष्ठाला
चिकटवलेल्या कापडी आवरणावरची सुरेख वेलबुट्टी
आपण स्वतः लिहिलेलं, स्वतःच्या हाताने कापडी आवरण घातलेलं पुस्तक श्री० रा० टिकेकरांनी स्वतःच्या वाढदिवशी अरविंद ताटक्यांना भेट दिलं. आणि इतक्या वर्षांनंतर ते आता माझ्या संग्रहात येऊन पोहोचलं. दोन पुस्तकप्रेमींमधल्या नात्याच्या लोभस रूपाचा इतक्या वर्षांनंतर मी अचानक साक्षीदार झालो. ताटक्यांनी दिलेल्या माहितीतली एकमेव विसंगती म्हणजे प्रत्यक्ष पुस्तकाच्या प्रतीवर टिकेकरांच्या सहीखाली  ६१ सालची १९ ऑक्टोबर ही तारीख आहे; आणि ताटके मात्र सांगतायत १६ ऑगस्ट ही तारीख. अर्थातच, टिकेकरांनी प्रत्यक्ष सही करताना केलेली तारीख आपल्या पुढ्यात असल्याने तीच खरी  मानून चालायला हरकत नाही.
पुस्तकवेड आणि वाचन यांमुळे टिकेकरांशी जुळून आलेल्या आत्मीय नात्याविषयी ताटक्यांनी या लेखात आणखीही लिहिलं आहे. टिकेकरांशी १९६०मध्ये ओळख झाली, तेव्हा ताटक्यांची इतिहाससंशोधकांवरची लेखमाला नवयुगमध्ये प्रकाशित होत होती. ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावी म्हणून टिकेकरांनी खूप कळकळ दाखवली. ताटके लिहितात, खरे टिकेकर मला तेव्हाच उमजले व समजले. त्यावेळी स्वतःकडची अनेक पुस्तकं त्यांनी मला दिली. शिवाय मुंबई विद्यापीठातून ते मला दुर्मिळ पुस्तकं आणून देत ती वेगळीच. मला त्यांनी भेट म्हणून किती पुस्तकं दिली त्याला गणतीच नाही. टिकेकरांसारखा ग्रंथसंग्रह करणारे अनेक आहेत. पण त्यांच्यासारखा पुस्तकं भेट देणारा दाता मी तरी पाहिलेला नाही.
हा परिच्छेद वाचल्यानंतर मला ताटके-संग्रहातल्या आणखी एका पुस्तकाची आठवण आली.  रियासतकार गो० स० सरदेसाई यांचं माझी संसारयात्रा  हे आत्मकथनात्मक पुस्तक भारत बुक डेपोतल्या ताटके-संग्रहातूनच माझ्यापर्यंत पोहोचलं होतं. त्यावर अरविंद ताटके यांचं मालकीदर्शक नाव लिहिलेलं तरी त्यांच्या (मला आतापावेतो परिचित झालेल्या) हस्ताक्षरातल्या खुणा आणि नोंदी त्यावर होत्या; शिवाय आवटींच्या घाऊक पुनर्बांधणीच्या प्रयोगाला बळी पडलेल्या या पुस्तकाच्या कण्याच्या शिलाईमध्ये अर्ध्याहून अधिक अदृश्य झालेली एक स्वाक्षरी त्यावर होती. पुस्तक घेताना चाळून पाहिलं, तेव्हा त्या स्वाक्षरीची अक्षरवटी ओळखीची वाटल्याचं मला आठवत होतं. ताटक्यांची वरील वाक्यं वाचताना मनात काहीतरी चमकलं आणि मी जदुनाथ सरकार आणि रियासतकार देसाई  या पुस्तकावरच्या टिकेकरांच्या स्वाक्षरीशी माझी संसारयात्रावरची अर्धवट स्वाक्षरी ताडून पाहिली. शंका खरी ठरली : माझी संसारयात्रावरची स्वाक्षरी श्री० रा० टिकेकरांचीच होती. सरळ निष्कर्ष होता : माझी संसारयात्रा  या पुस्तकाची माझ्याकडे आलेली प्रत देखील श्री० रा० टिकेकरांच्या संग्रहातलीच होती. टिकेकरांनी ताटक्यांना वेळोवेळी भेट दिलेल्या पुस्तकांपैकी आणखीही काही पुस्तकं भारत बुक डेपोतून मला मिळालेल्या ताटके-संग्रहात असणार या जाणिवेने त्या क्षणी मी रोमांचित झालो.
आणि ही 'सरकार-सरदेसाई' पुस्तकाच्या आसपासवर
चिकटवलेल्या कापडावरची चित्रे
माझ्या मनात विचार आला, श्री० रा० टिकेकरांचा जन्म १९०१चा. ते जाणते झाल्यावर त्यांनी ग्रंथसंग्रह करण्यास सुरुवात केली असेल. अरविंद ताटक्यांचा काळ साधारणतः स्वातंत्र्योत्तर चारपाच दशकांचा; त्यानंतर माझ्या जाणत्या वयाचा (म्हणजे पुस्तकं जमवण्याचा) काळ सुरू होतो. या कालप्रवाहात, टिकेकरांच्या संग्रहातली काही पुस्तकं पाऊण शतकभर वाट काढत अखेर एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. ताटक्यांसारखा ग्रंथप्रेमी, आवटींसारखा जुन्या ग्रंथांचा विक्रेता यांच्या माध्यमातून या पुस्तकांनी मार्ग काढला. हे शक्य झालं ते केवळ शशिकांत आवटींनी प्रतिकूल परिस्थितीतही जुन्या, दुर्मीळ पुस्तकांना आश्रय देण्यासाठी आपल्या दुकानाची निदान पाठची भिंत तरी राखून ठेवली, म्हणून.
मला वाटलं, आपल्याला ज्याने निर्माण केलं, त्या माणसाचं आयुष्य मात्र आपल्याहून खूपच कमी आहे, हे पुस्तकांना समजून चुकलंय. त्यामुळे आपली निगराणी होण्यासाठी कुठल्याही एका माणसावर विसंबून न राहता, पुस्तकं बिचारी शतकानुशतकं अशीच भटकत राहतात. एकाची साथ सुटली की दुसऱ्या बऱ्या, आस्थेवाइक माणसाच्या, संग्राहकाच्या शोधात राहतात. सापडली की त्याच्या आधाराने तग धरून टिकण्याचा प्रयत्न करतात. श्री० रा० टिकेकरांपासून, शतकभरापासून, टिकून राहण्यासाठी धडपडत असलेल्या या पुस्तकांनी आपल्यालाही असंच निवडलं असावं : अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगी पडणाऱ्या साखळीतली एक कडी म्हणून.1 comment:

  1. खूप छान लेख आहे. या लेखात उल्लेख केलेल्या ग्रंथांचे वाचन करावे असे वाटते. उपयुक्त माहिती मिळाली.
    श्रीकांत बोबडे

    ReplyDelete