Saturday 4 June 2016

पेसोआचा पेटारा

पेसोआचा पेटारापोर्तुगीज कवी फर्नांदो पेसोआला खुद्द पोर्तुगालमध्ये १९४०पर्यंत फारसं कोणी ओळखत नव्हतं. ३० नोव्हेंबर १९३५ या दिवशी, लिस्बन शहरी राहात असलेला हा अठ्ठेचाळीस वर्षांचा कवी मरण पावला तेव्हा त्याच्या नावावर फक्त एक कवितासंग्रह, नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या दीडेकशे कविता, काही इंग्रजी कविता आणि काही समीक्षा व राजकीय स्वरूपाचे लेख – इतकंच साहित्य जमा होतं.
पण पेसोआ-साहित्याचा अमेरिकी अभ्यासक-अनुवादक रिचर्ड झेनिथ याने म्हटल्याप्रमाणे पेसोआचा लौकिक मृत्यू ही घटनाच एका विशाल कवीच्या जन्माचा प्रारंभ होता. त्याच्या मृत्यूनंतर चार-पाच वर्षांनी त्याच्या घरातला मोठा पेटारा उघडण्यात आला. आणि बाटलीतून महाकाय जीन निघावा तसा एक महाकाय अस्ताव्यस्त लेखक त्या पेटाऱ्यातून बाहेर आला. फर्नांडो पेसोआचं तोवरचं प्रकाशित साहित्य हे केवळ हिमनगाचं टोक होतं याची अभ्यासकांना जाणीव झाली. त्या पेटाऱ्यात त्यांना एकोणतीस वह्या आणि पंचवीस हजाराहून अधिक सुटे कागद -  इतकं लेखन सापडलं. यातले काही कागद हस्तलिखित तर काही टंकलिखित होते. काही वाचताही येणार नाहीत, इतक्या बारीक अक्षरांत लिहिलेले होते. त्यात शेकडो कविता, कथा, नाटकं, समीक्षा, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान, अनुवाद, राजकीय लेखन, ज्योतिष-गूढविद्या, थिऑसफी या विषयांवरचं लेखन - असं सर्व प्रकारचं साहित्य होतं. अर्धवट राहिलेलं लेखन संख्येने अधिक होतं. या कागदांचं संशोधन, संपादन करून, कागदांच्या त्या गुंताळ्यातून पेसोआच्या काही साहित्यकृती आकाराला आणण्याचा वाङ्मयीन उद्योग गेली सत्तर वर्षं अव्याहतपणे चालू आहे.
पेसोआची टोपणनावांनी लिहिण्याची सवय त्याच्या हयातीतच पोर्तुगीज वाचकांच्या परिचयाची झाली होती. पण ही  केवळ टोपणनावे नव्हती. त्या प्रत्येक नावाला पेसोआने लौकिक चरित्र (जन्म, शिक्षण, व्यवसाय), वैचारिक आणि वाङ्मयीन भूमिका इत्यादी गोष्टी बहाल केल्या होत्या. अल्बेर्तो कायरो, रिकार्दो रीस, अल्वारो-द-काम्पोस यांच्या नावांनी नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या कविता वाचकांनी वाचल्या होत्या. पण पेसोआचा पेटारा उघडल्यानंतर अभ्यासकांना कळलं की पेसोआने निर्माण केलेल्या अशा कवी-लेखकांच्या कल्पित व्यक्तिरेखांची एकूण संख्या पन्नासच्या आसपास होती. पेसोआने स्वतःच्या नावाने लिहिलेलं साहित्य तर त्यात होतंच. पण त्याशिवाय, अनेक अनुवादक, तत्त्वज्ञ, राजकीय भाष्यकार, ज्योतिष-लेखक, इंग्रजीत लिहिणारे दोन कवी, फ्रेंचमध्ये लिहिणारा एक कवी आणि एक पोर्तुगीज भाषेत लिहिणारी कवयित्री यांचा देखील समावेश होता. या प्रत्येकाला आपापलं आयुष्य होतं. अल्वारो-द-काम्पोस हा नेव्हल इंजिनियर असलेला कवी इंग्लंडमध्ये काही वर्षं राहून आला होता, तर रिकार्दो रीस हा व्यवसायाने डॉक्टर होता. पेसोआने त्याला ब्राझीलला पाठवलं आणि तिथंच स्थायिक केलं. या  कल्पित कवींनी पेसोआच्या बरोबरीने केवळ कविताच लिहिल्या नाहीत, तर परस्परांच्या साहित्याची कठोर चिकित्सा करणारे लेख लिहिले, एकमेकांना पत्रं लिहिली; पेसोआशी आणि परस्परांशी आपापल्या भूमिकांतून वादविवाद केले. या संपूर्ण साहित्याची छाननी अद्यापही चालूच असल्याने, पेसोआचं फार कमी साहित्य आजवर मूळ पोर्तुगीजमध्ये आणि इंग्रजीमध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झालं आहे. एकप्रकारे पेसोआच्या या पेटाऱ्याचा तळ  संशोधकांना अजूनही गवसलेला नाही.
आज समीक्षक म्हणतात, पोर्तुगीज साहित्यात आधुनिकवाद (modernism) पेसोआने अक्षरशः एकहाती आणला. आधुनिकवादातल्या दोन महत्त्वाच्या चळवळी, घनवाद (cubism) आणि प्रतिकवाद (symbolism) यांचा पेसोआ आणि अल्वारो-द-काम्पोस यांच्या कवितांवर प्रभाव आहे. अल्बेर्तो कायरोच्या कवितांमध्ये  झेन तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं; तर रिकार्डो रीसच्या कविता अभिजातवादाकडे झुकलेल्या आहेत. बुक ऑफ डिसक्वाएट (अस्वस्थ माणसाची नोंदवही) या न-कादंबरीचा निवेदक आणि नायक (किंवा न-नायक) बर्नार्दो सोरेस हा काफ्काच्या अस्तित्ववादी नायकांच्या कुळीतला, त्यांचा पूर्वसूरी शोभेल असा आहे. पेसोआच्या कवितांमुळे आणि द बुक ऑफ डिसक्वाएट’, ‘द एज्युकेशन ऑफ द स्टॉइकया कादंबरीसदृश गद्य पुस्तकांमुळे तो रिल्के, रँबो, बॉदलेअर, जेम्स जॉईस, काफ्का, काम्यू अशा विसाव्या शतकातल्या महान लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
साहित्याविषयीचे संकेत मोडणे हे आधुनिकवादातलं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. पेसोआने हे संकेतांना उद्ध्वस्त करण्याचं कार्य साहित्यनिर्मितीच्या सर्व पातळ्यांवर केलं. बुक ऑफ डिसक्वाएट हे महत्त्वाकांक्षी पुस्तक १९१३पासून पुढे तो मृत्यूपर्यंत लिहीत होता. बर्नार्डो सोरेस हा लिस्बनमध्ये एकटेपण भोगत जगणारा कारकून आपल्या मनातले विचार लिहून ठेवतो, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्याची शेकडो पानं पेटाऱ्यातल्या निरनिराळ्या लिफाफ्यांमध्ये ठेवलेली सापडली. आयुष्याच्या टप्प्यावर अनेक वेळा त्याची या पुस्तकाविषयीची योजना बदलत गेली. एकदा नायकही बदलला. काही नोंदींवर पेसोआने क्रमांक घातले होते. तर काही नोंदी बुक ऑफ डिसक्वाएटमध्ये समाविष्ट करायच्या किंवा नाहीत याविषयी त्याच्या मनात शेवटपर्यंत संदिग्धता होती. त्यामुळे पेटाऱ्यात सापडलेल्या सर्व नोंदींची छाननी करून त्यापासून बुक ऑफ डिसक्वाएटची पोर्तुगीज भाषेतली अंतिम प्रत तयार व्हायला १९८२ साल उजाडावं लागलं. आणि त्यानंतरही प्रकाशित झालेलं हे पुस्तक निर्णायकरित्या अंतिम प्रत आहेच असं म्हणता येणार नाही. इंग्रजीमध्ये या पुस्तकाची अनेक भाषांतरं उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक आवृत्तीत नोंदींची संख्या वेगवेगळी आहे, क्रम वेगळे आहेत. मूळ पोर्तुगीज आवृत्तीशी प्रामाणिक राहात सर्व नोंदी (अगदी संशयास्पद नोंदींसह) समाविष्ट असलेलं बुक ऑफ डिसक्वाएटचं इंग्रजी भाषांतर रिचर्ड झेनीथ याने केलं आहे. लेखन अर्धवट ठेवण्याची किंबहुना त्याला निश्चित आकार न देण्याची पेसोआची प्रवृत्ती या एकाच पुस्तकापुरती मर्यादित नाही. द एज्युकेशन ऑफ स्टॉइक या पुस्तकाचा कल्पित लेखक बॅरन ऑफ तीव्ह याने, आपण पुस्तकाला पूर्णत्व देऊ शकत नाही म्हणून आलेल्या निराशेपोटी आत्महत्या केल्याचं पेसोआने लिहून ठेवलं आहे. याशिवाय त्याच्या बऱ्याच कथा, नाटकं ही अपूर्ण अवस्थेत सापडली आहेत. पेसोआसाठी लेखन ही आयुष्यभर निरंतर चालणारी कृती होती. त्यामुळेच पुस्तक लिहून संपवणं आणि ते प्रकाशित करणं या गोष्टी त्याला अप्रिय असाव्या.
एखाद्या लेखकाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या सर्व साहित्यातून सुसंगतपणे उभं राहात असतं, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पेसोआने या समजुतीलाच सुरूंग लावला. त्याने साहित्य तर निर्माण केलंच, पण त्याचबरोबर या साहित्याच्या निर्मात्यांनाही निर्माण केलं. वाचक हे साहित्य वाचतो, तेव्हा त्यातून त्याला पेसोआच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा, भूमिकेचा थांगही लागत नाही. वाचकाला भेटतो तो रिकार्दो रीस किंवा बर्नार्दो सोरेस. स्वतःच्या लेखनापासून इतकं तटस्थ राहणं पेसोआला कसं साधलं असेल? इतरही लेखक कथा-कादंबऱ्यांतून पात्रांची निर्मिती करून त्यांना त्यांचे त्यांचे विचार, भूमिका देत असतातच. पण अशा पात्रांना त्या कथा-कादंबरीबाहेर अस्तित्व मुळीच नसतं. अशी पात्रं निर्माण करणं वेगळं आणि त्यांच्या भूमिकेत शिरून कथा, कविता लिहीत राहणं  वेगळं. रिकार्डो रीस किंवा अल्बेर्तो कायरो किंवा बर्नार्दो सोरेस हे त्यांच्या कविता-कादंबरीबाहेरही लेखांतून, पत्रव्यवहारांतून, त्यांच्याविषयी पेसोआने लिहिलेल्या नोंदींमधून अस्तित्वात आहेत. मुख्य म्हणजे पेसोआ जिवंत होता तोवर ते त्याच्या मनात अस्तित्वात होते. माझ्या अस्तित्वात इतक्या साऱ्या लोकांची गर्दी असल्यामुळे मला स्वतःची स्वतंत्र अशी जाणीवच उरलेली नाही”, अशी तक्रार पेसोआने नोंदवून ठेवली आहे. याचा दुसरा अर्थ असा की, पेसोआ आणि कंपनीने केलेलं संपूर्ण लेखन (कविता, कथा, नाटकं यांच्यासह त्यांची पत्रं, नैमित्तिक लेख, नोंदी इत्यादी) ही एकच मोठी जगङव्याळ साहित्यकृती मानली पाहिजे.  असं मानलं तरच पेसोआचा लेखक म्हणून अफाटपणा काही प्रमाणात समजून घेता येईल.    
पेसोआच्या संदर्भातली गुंतागुंत इथेच थांबत नाही. एका ठिकाणी अल्वारो-द-काम्पोस म्हणतो,फर्नांदो पेसोआ, काटेकोरपणे सांगायचं तर, अस्तित्वातच नाही.या विधानामुळे पेसोआ आणि त्याने निर्माण केलेले कवी-लेखक यांच्यातली, प्रत्यक्ष आणि काल्पनिक यांच्यातली, भेदरेषाच नाहीशी होऊन जाते. पुढे १९६०नंतरच्या नव्या जगात, बार्थ, देरीदा आणि  फुको या तत्त्वज्ञांनी साहित्याची निर्मिती, लेखक या संकल्पनांविषयी मांडलेले नवे सिद्धांत पेसोआने विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्या लेखनाच्या प्रयोगशाळेत आपल्या पद्धतीने वापरून टाकले होते असं आता साहित्याचे काही अभ्यासक म्हणू लागले आहेत.

पेसोआ आणि त्याच्या मांदियाळीच्या कविता आणि गद्य साहित्य आज इंग्रजीसह अनेक भाषांत भाषांतरित होत आहे. मराठीत पेसोआ फारसा कोणाला ठाऊक नसला तरी शेजारच्या हिंदीत तो बराचसा अवतरलेला आहे. एक बेचैन का रोजनामचा हा द बुक ऑफ डिसक्वाएटचा हिंदी अनुवाद आहे. आज विश्वसाहित्यात मानाचं स्थान प्राप्त झालेल्या या लेखकाभोवती मिथकांची वलयं बरीच तयार झाली आहेत. पण त्याचबरोबर लेखक-कलावंतांवरच्या त्याच्या प्रभावाची वलयंही दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत आहेत. पास्कल मर्सियर या जर्मन कादंबरीकाराच्या कादंबऱ्यांमध्ये पेसोआच्या साहित्याचे संदर्भ पेरलेले दिसतात. तर एन्रिक विला-मातास या स्पॅनिश लेखकाच्या जवळजवळ प्रत्येक कादंबरीत पेसोआ एक पात्र म्हणून भेटतो. मॅन्युएल-द-ऑलिविएरा या पोर्तुगीज दिग्दर्शकाच्या प्रत्येक चित्रपटात पेसोआचा एक तरी संदर्भ असतो. द पोर्तो ऑफ माय चाईल्डहूडया चित्रपटात तर त्याने एका जुन्या चित्रफितीद्वारे प्रत्यक्ष पेसोआचंच दर्शन घडवलं आहे. इटालीयन कादंबरीकार आंतोनिओ ताब्बुची याने द लास्ट फोर डेज ऑफ फर्नांदो पेसोआ या नावाची कादंबरी लिहिली आहे.  नोबेल पारितोषिकविजेता पोर्तुगीज कादंबरीकार जुझे सारामागु याच्या द इयर ऑफ डेथ ऑफ रिकार्दो रीस या कादंबरीत फर्नांदो पेसोआच्या मृत्यूची बातमी वाचून ब्राझीलमध्ये स्थायीक झालेला रिकार्दो रीस हा त्याचा कवीमित्र पुन्हा पोर्तुगालमध्ये लिस्बनला परतून एका हॉटेलमध्ये उतरतो. कबरीतून बाहेर येऊन रीसला भेटतो. शेजारच्या स्पेनमध्ये तेव्हा यादवी युद्ध सुरू आहे. तिथले लाखो स्थलांतरीत लिस्बनमध्ये आश्रयाला आले आहेत. त्या अस्थिर राजकीय-सामाजिक वातावरणात पेसोआने रीससोबत केलेल्या चर्चा म्हणजे ही कादंबरी. थोडक्यात, पेसोआने कल्पित लेखक-कवींच्या द्वारे सुरू केलेलं लेखन अद्यापही थांबलेलं नाही. आता तर ते त्या पेटाऱ्याबाहेर वेगवेगळ्या दिशांनी वाढत आहे. आणि पेसोआदेखील या लेखनात एक कल्पित लेखक म्हणून, पात्र म्हणून सामावला आहे. पेसोआचं हे जग खरोखरच अद्भुत आहे. 

Tuesday 3 May 2016

शब्द : झोरान झिवकोविच

झोरान झिवकोविच या सर्बीयन लेखकाची कथा : शब्द


प्लुशाल नावाचा गृहस्थ शब्द गोळा करायचा. वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी त्याने आयुष्यात पहिल्यांदा प्रेमकवितांचा एक संग्रह वाचला आणि शब्द गोळा करायला सुरुवात केली. ते एक छोटं कागदी बांधणीचं पुस्तक होतं; मुखपृष्ठावर सुंदर जांभळं फूल असलेलं. पुस्तकाचा वास मात्र या चित्राशी विसंगत होता. बराच काळ जुन्या पुस्तकांच्या दुकानात तळघरात पडून राहिल्यावर  पुस्तकाला अपरिहार्यपणे एक जुनाट कुबट दर्प येतो, तसा त्या पुस्तकाला होता.
प्लुशालने तो कवितासंग्रह खरीदलाही नसता. दर काही दिवसांनी तो पुस्तक-दुकानात जात असला तरी त्याने क्वचितच कधी पुस्तक विकत घेतलं. आणि तो घ्यायचा ती देखील अगदी वेगळ्या प्रकारची पुस्तकं असायची. त्याच्यापाशी प्रामुख्याने हस्तपुस्तिकांचा (Handbooks) एक लहानसा संग्रह होता. उदाहरणार्थ, रोपं कशी वाढवावीत? त्याच्या घरी फुलझाडं मुळीच नव्हती. पण स्वतःला तो या विषयातला जाणकार समजायचा. किंवा मांजरीविषयीची पुस्तकं. मांजरीच्या केसांचं वावडं असल्यामुळे त्याने स्वतः मांजर पाळलेली नव्हती, पण कोणाला गरज असल्यास मांजरपालनाविषयी भरपूर सूचना त्याच्याकडे होत्या. फ्रीजची निगा व दुरुस्ती या विषयावरचीही एक हस्तपुस्तिका त्याच्या संग्रहात होती. खरं तर फ्रीजची त्याला काहीच गरज नव्हती; पण व्यवहारोपयोगी ज्ञानाला तुच्छ लेखणं बरं नव्हे.
मुखपृष्ठावरच्या फुलासाठी प्लुशालने ते पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं. फुलझाडांचा तज्ज्ञ म्हणून त्याला ठाऊक होतं की असं फूल प्रत्यक्षात अस्तित्वात नसतं. पण याच कारणामुळे त्याला ते फूल अधिक भावलं. काहीशा अस्वस्थ मनाने त्याने ते पुस्तक विक्रेत्या मुलीच्या हाती ठेवलं. त्याच्या वयाच्या माणसाने अशा रोमँटिक कवितेत रस दाखवणं शोभत नव्हतं. एखादं अश्लील मासिक खरेदी केल्यासारखं वाटलं त्याला. सुदैवाने विक्रेत्या मुलीने या गोष्टीची जराही दखल घेतली नाही. तिने फक्त पुस्तकाची किंमत पाहिली आणि त्याने दिलेले  नेमके सुटे पैसे घेतले.
प्रेमाविषयी चारदोन गोष्टी त्याला अर्थातच ठाऊक होत्या. त्याही स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून नव्हे. पण त्याची गरज काय होती? बहुतेकांना मूळातच या गोष्टीची जाणीव असते. दुसरं  काय? तरीही त्याने पुस्तक वाचायला घेतल्यावर दुकानात वाटलेली बेचैनी पुन्हा जागी झाली. खरं तर इथं तो एकटाच होता, पण तो लाजला देखील. शेवटी, हा कवितासंग्रह म्हणजे प्रेमविषयक हस्तपुस्तिकाच आहे असा विचार मनात आल्यावर त्याला थोडं मोकळं वाटलं. मग सर्व सोपं आणि मजेदार झालं.
एका गोष्टीचं प्लुशालला नवल वाटलं : त्या कवितांमधल्या हळुवार आणि उदात्त भावनांपेक्षाही त्यांतल्या शब्दांनी तो  अधिक उल्हसित होत होता. आज पहिल्यांदा त्याला जाणवलं की सुंदर शब्द अस्तित्वात असतात. म्हणजे काही खास किंवा दुर्मीळ शब्द नव्हेत. उलट इतर प्रकारच्या पुस्तकांमध्येही आढळणारे साधे शब्द. पण या ना त्या कारणांमुळे हस्तपुस्तिकांमध्ये ते सुंदर वाटत नव्हते. किंवा त्यांचं सौंदर्य त्याच्या नजरेला भावलं नव्हतं.
जसजसं प्लुशाल वाचत गेला, काहीतरी गमावण्याच्या भीतीने त्याला घेरलं. एक पान उलटलं आणि त्यावरचे शब्द मनातून पुसट झाले; त्यांची वाफ झाली. त्यांच्या जागी नवे शब्द आले, पण त्याने समाधान होत नव्हतं. काहीतरी करून आधीचे शब्दही वाचवायला हवे होते. त्यांना नाहीसं होऊ देण्यात अर्थ नव्हता. अर्थातच त्याला पुन्हा मागे, त्या शब्दांकडे जाता येत होतं. पण अशाने ते पुस्तक कधीच वाचून पूर्ण झालं नसतं. दुसरा काहीतरी उपाय हवा होता. आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक कल्पना चमकली. 
कातडी वेष्टनाची मोठ्या आखीव तावांची वही त्याने विकत आणली. सुंदर शब्दांचं संग्रहालय म्हणून शोभून दिसायला   तितक्याच तोलाची गोष्ट हवी. साध्या वहीत हे शब्द कसे लिहिणार? अशाने त्यांच्या पावित्र्याची विटंबना झाली असती. कवितासंग्रहाच्या पहिल्या पानापासून त्याने सुरुवात केली. उघडी वही पुढ्यात ठेवली. सुंदर शब्द आढळताच लगेच झरणीने वहीत नोंदवू लागला. झरणी सोन्याची नव्हती हे खरं; सगळ्याच गोष्टी काटेकोरपणे मनाजोगत्या घडत नसतात.
त्याचं हस्ताक्षर स्वच्छ होतं. नक्षीदार नव्हे, पण प्रमाणबद्ध आणि काहीसं सरळ, थेट. आपल्या परीने सुंदर; सुंदर शब्द लिहिताना त्यांना अधिक ठळक करणारं नव्हे, तर त्यांच्याशी मेळ राखण्यासाठी गरजेचं होतं तितपत. एरवी तो टपोरं अक्षर काढायचा; पण या खेपेला त्याने अक्षर लहान काढलं. सुंदर शब्दांची संख्या किती असेल याचा अदमास नव्हता. वही पुरेशी मोठी असली तरी काळजी घ्यायलाच हवी होती.
कवितासंग्रहातला एकूण एक सुंदर शब्द लिहून होईपर्यंत वहीतल्या शब्दांचं काय झालंय ते पाहण्याचं त्याला धाडस झालं नाही. वहीत त्यांचं सौंदर्य टिकून राहिलं असेल की हस्तपुस्तिकांमधल्या शब्दांप्रमाणे ते नाहीसं झालं असेल? वही थोडी दूर पकडून दाटीवाटीने लिहिलेली चार पानं न्याहाळल्यावर त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. शब्दांमधलं सौंदर्य कायम होतं; किंबहुना काहीसं वाढलंच होतं. वहीत केवळ सुंदर शब्दच नोंदवले गेल्याने असं घडलं असावं. अगदीच कुरूप म्हणता येणार नाहीत, पण विशोभीय वाटतील असे इतर शब्द वहीत नव्हते. ती वही एक संपृक्त सौंदर्यवस्तू बनली होती.
संपूर्ण कवितासंग्रह पाहून झाल्यावर प्लुशालला प्रश्न पडला, आता काय करावं? वहीची थोडीच पानं भरली होती. उरलेली तशीच कोरी सोडायची? सौंदर्याचा लचका तोडल्यासारखं होईल ते. नाही, हे काम पुढं सुरू ठेवलं पाहिजे. सुंदर शब्दांची संख्या कितीतरी मोठी असणार. ते सगळे एकाच जागी असले पाहिजेत. पण त्यांना कुठं शोधायचं?
पहिला विचार त्याच्या मनात आला तो दुसऱ्या प्रेमकविता संग्रहाचा. विचार चुकीचा नव्हता. प्रेमकवितेत सुंदर शब्दांचा होणारा आविष्कार थोरच असतो, याची प्रचिती त्याने घेतली होती. पण हीच पुस्तकं तो सतत विकत घेत राहिला, तर ते लोकांच्या नजरेत येणार. त्याने पाहिलेल्या मुख्य ग्रंथालयातल्या सूचीनुसार अशा प्रकारची तीनशे पस्तीस पुस्तकं होती. दोनतीन पुस्तकांपर्यंत लोक दुर्लक्ष करतील, पण नंतर मात्र नावं ठेवतील. नको. दुसरं काहीतरी करायला पाहिजे. आणि इथं त्याच्या मनात दुसरी कल्पना चमकली.
फक्त प्रेमकवितांच्या संग्रहांमध्येच सुंदर शब्द सापडू शकतील असं कोण म्हणतं? दुसऱ्या प्रकारच्या पुस्तकांमध्येही ते नक्कीच असले पाहिजेत. अगदी हस्तपुस्तिकांमध्येही का नाही? एव्हाना महान सत्याचा साक्षात्कार करवून घेण्यात तो निष्णात झाला होता. सुंदर शब्द सर्वत्र आहेत. खरं कौशल्य पुस्तकं निवडण्यात नसून असे शब्द हेरण्यात आहे. त्यासाठी तशी दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी आपल्याकडे असल्याची चाहूल त्याला लागली होती. पडताळा घेण्याचा एक सोपा मार्ग होता : हाती येईल ती पहिली हस्तपुस्तिका त्याने उघडली. त्याच क्षणी सुंदर शब्दांच्या झोताने त्याचे डोळे दिपले. जणू कोणीतरी ते शब्द चमकदार मार्करने ठळक करून ठेवलेले असावेत.
वही उघडून हे शब्द तिच्यात उतरवून घेण्याची तीव्र इच्छा त्याने कशीबशी आवरली. त्याच्यातल्या विवेकबुद्धीनेच त्याला सावरलं. याचा त्याला रास्त अभिमानही वाटला. माणसाने इतकं उतावळं असू नये. असं उतावळेपण त्याला कुठं घेऊन जाईल? क्षणात सगळा गोंधळ माजेल. आपण खंबीर आणि शिस्तीत राहिलं पाहिजे. एकूण परिस्थितीचा बारकाईने विचार केल्यानंतर, मनात पुन्हा एकदा चमकलेल्या कल्पनेच्या रूपात, त्याच्यासमोर मार्ग स्वतःहूनच दृश्यमान झाला.
वहीतली पहिली चार पानं फाडून टाकावीत आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी, या मनात उगवलेल्या विचाराशी त्याला थोडं झगडावं लागलं. शेवटी त्याने तो विचार सोडून दिला. इतकं महत्त्वाचं नोंदकाम फाटक्या वहीत सुरू करणं शक्य नव्हतं. नवी वही घेणंच योग्य. त्याने एक मोठ्यात मोठी वही निवडली. तिच्यातली एक सुविधा फारच उपयुक्त होती : वाचताना किंवा लिहिताना पानांत घालून ठेवण्याच्या खुणेसाठी एक सोनेरी फीत त्या वहीत होती.
त्या प्रचंड शब्दकोशाचे सोळा अवजड टोलेजंग खंड होते. पहिला खंड त्याने उघडला आणि चमचमत्या सुंदर शब्दांची झुंडच त्याच्या नजरेस पडली. अर्थात पुढे वाढून ठेवलेल्या कामाच्या प्रचंड आवाक्याने तो मुळीच डगमगला नाही. आव्हानाला तोंड देण्याची पूर्ण तयारी त्याने केली होती. त्यात त्याला कोणत्याही सवलती, चोरवाटांची अपेक्षा नव्हती. हे सर्व लिहून काढायला जेवढा म्हणून वेळ हवा होता तेवढा तो देणार होता, थोडाही कमी किंवा अधिक नाही. शेवटी त्याच्यासमोर वाढून ठेवलेलं ते दुःख नव्हतं, आनंद होता. खरंच, सौंदर्याला शब्दबद्ध करण्याहून अधिक आनंददायक आणखी काय असणार?
अखेर, जेव्हा प्लुशाल गृहस्थाचं काम संपत आलं, तेव्हा त्याने वयाची छप्पन्न वर्षं ओलांडली होती. पण त्यामुळे त्याच्या मनातली समाधानाची आणि कृतार्थतेची भावना तीळभरही उणावली नाही. उलट, आपण सौंदर्याचा संग्रह केल्यामुळे आपलं आयुष्य सार्थकी लागलं, असं त्याच्या वयाचे कितीसे लोक म्हणू शकतात? आता फक्त एकच गोष्ट करायची राहिली होती. संपूर्ण भरलेल्या त्या वहीत शेवटच्या पानाच्या तळाशी केवळ दोन शब्द मावतील इतकी जागा शिल्लक होती. शब्द नोंदवायला सुरुवात केल्यापासून प्रथमच त्याचं हस्ताक्षर किंचित हळुवार झालं. पूर्वीइतकंच सरळ, पण कोमल, कारुण्यपूर्ण. अगदी संगीताच्या सुरावटीच्या लिपीप्रमाणं. वहीत प्रवेश करून त्याने वहीचं अखेरचं पृष्ठ आपल्यामागे हलकेच मिटून घेतलं, जडावलेली पापणी मिटावी, तसं.
इंग्रजी अनुवाद : अलिस कॉपल-तोसिक
                                                                                                               
##############Saturday 23 April 2016

हिटलर : पुस्तकं जपणारा आणि जाळणारा

हिटलर : पुस्तकं जपणारा आणि जाळणारा

People who have read just one book – be it the Bible, the Koran, or Mein Kampf – are the fiercest of fanatics in their religious or political beliefs. But there is also a problem if we look at the overall effect of literature on a person. Take the Germans : history tells us they are among the most cultured of peoples. They have world famous writers, they’re a nation of readers. But Goethe, Schiller, Herder, Lessing, Heine, and Kant notwithstanding, Germany was the birthplace of Nazism, the death camps, the extermination of the Jews and other ‘interior races’. The fact that they read these authors, that they were educated in a spirit of humanism, was no obstacle to their descent into barbarity.”
                                                                                                                      Danilo Kis
                                                                                              (Homo Poeticus, P. 276-77)


टिमोथी रेबॅक (Timothy Ryback) या लेखकाचं हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी : द बुक दॅट शेप्ड् हीज लाईफ हे पुस्तक वाचताना दॅनिलो किश् या लेखकाच्या वरील विधानाची आठवण मनात वारंवार जागी झाली. किश् ज्यू होता आणि त्याचे वडील ऑशवित्झ छळछावणीत झालेल्या ज्यू-संहाराला बळी पडले होते. त्याच्या कादंबऱ्यांवर आणि समीक्षालेखनावर याची दाट छाया पडली आहे. जर्मनी हे वाचाकांचं राष्ट्र म्हणून ओळखलं जात होतं, असं दॅनिलो किश याने वर म्हटलं आहे. हिटलर स्वतःला अस्सल जर्मन समजत होता आणि तो हाडाचा वाचकही होता. इतिहासात हिटलरची पुस्तकांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा उमटलेली असली, तरी त्याच्या या प्रतिमेची दुसरी बाजू आजवर अज्ञात होती. जो पुस्तकं वाचतो, तोच त्यांची परिणामकारकता जाणतो आणि तोच पुस्तकं नष्ट करायला उद्युक्त होतो, हे मानवी इतिहासात अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे. ज्यू लेखकांनी लिहिलेली पुस्तकं – मग ती कोणत्याही विषयावरची असोत – जाळून टाकण्याचे आदेश त्याने दिले. त्याला प्रिय असणाऱ्या अतिरेकी राष्ट्रवादी-वंशवादी विचारांना छेद देणाऱ्या, त्याविषयी संशय व्यक्त करणाऱ्या पुस्तकांच्या याद्या बनवून त्यांच्या होळ्या करण्याची मोहीम हिटलरने उघडली.
पण हाच हिटलर पुस्तकांचा नुसता वाचक नव्हता, तर त्यांच्यावर प्रेम करत होता. ३० एप्रिल १९४५ या दिवशी त्याने स्वतःचं जीवन संपवलं तेव्हा त्याच्या संग्रहात सोळा हजाराहून अधिक पुस्तकं होती. हा संग्रह त्याने म्युनिच, बर्लिन आणि ऑबर्साल्झबर्ग (Obersalzberg) अशा तीन ठिकाणी राखला होता. त्यात किशने उल्लेखलेले ग्योथे, शिलर, कान्ट हे लेखक-तत्त्वज्ञ तर होतेच, पण रवींद्रनाथ टागोरांचं नॅशनॅलिझम, महात्मा गांधीचं रोमां रोलॉंलिखित चरित्र आणि गांधीजींच्या तुरुंगातील लेखनाचा एक संग्रह ही पुस्तकं देखील होती.  हिटलरच्या संग्रहात निम्मी पुस्तकं इतिहास आणि युद्ध या विषयांवरची होती. त्याखालोखाल संख्या धर्म, गूढविद्या यांवरच्या पुस्तकांची होती. पण साहित्याचं त्याला वावडं नव्हतं. कलाविचार, तत्त्वज्ञान याही विषयांचं तो वाचन करत असे.
एक ब्रिटीश इतिहासकार आयन करशॉ (Ian Kershaw) याच्या मते, आधुनिक इतिहासातलं सर्वाधिक अज्ञात व्यक्तिमत्त्व हिटलरचं आहे. हिटलरचे कुटुंबीय आणि नातेवाईक-मित्र यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही; स्वतः हिटलर व त्याचे नाझी पक्षातले सहकारी-मार्गदर्शक यांनी १९२१पासून हिटलरविषयीचे फारशे तपशील उघड होऊ दिले नाहीत; तो पक्षाचा प्रमुख असतानाही त्याचं छायाचित्र मुद्दाम प्रसृत होऊ दिलं नव्हतं. त्यामुळे तो कसा दिसतो याविषयी एक समाजात गूढ तयार झालं होतं. महायुद्धानंतर त्याच्याविरुद्ध जगभर निर्माण झालेल्या घृणेच्या भावनेच्या परिणामी त्याच्या चरित्रावर फार प्रकाश टाकला गेला नाही. विशेषतः चर्चिल आणि स्टॅलिन या त्याच्या दोन समकालीनांविषयी विपुलतेने उपलब्ध असलेल्या साहित्याच्या तुलनेत हिटलरचं चरित्र आणि चारित्र्य यांविषयीच्या माहितीचं दुर्भिक्ष्य तीव्रतेने जाणवतं.
दोस्त राष्ट्रांच्या फौजांच्या हाती सापडण्या नामुष्की टाळण्यासाठी हिटलरने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. इव्हा ब्राऊनसह आपण आत्महत्या केल्यानंतर आपले मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकावेत अशा त्याच्या सहकाऱ्यांना सूचना होत्या. त्यानुसार त्यांनी या दोघांचेही देह नष्ट करून टाकले. स्वतःचं भौतिक अस्तित्व अशाप्रकारे समूळ पुसून टाकणाऱ्या हिटलरने पुस्तकांविषयी काही निर्णय घेतलेला नव्हता. हिटलरच्या मृत्यूनंतर त्याचे तीनही ठिकाणचे ग्रंथसंग्रह दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांच्या हाती पडले. सैनिकांनी त्यातली पुस्तकं स्वतःला हवी तशी लुटून नेली. काही पुस्तकांची जाळपोळीत राख झाली. हिटलरच्या माईन काम्फ या आत्मचरित्राच्या पहिल्या आवृत्तीला चांगले पैसे येतील म्हणून कित्येकांनी या पुस्तकाच्या प्रती हिटलरच्या संग्रहांतून लांबवल्या. या ठिकाणांवर पोहोचण्यात अमेरिकी सैनिक आघाडीवर असल्याने हिटलरची बरीच पुस्तकं त्यांच्यामार्फत अमेरिकेत पोहोचली आणि वेगवेगळ्या गावा-शहरांतल्या खाजगी किंवा सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विखुरली गेली. हिटलरच्या बंकरमध्ये सर्वप्रथम पोहोचलेल्या अल्बर्ट अरॉन्सन या अमेरिकी सेनाधिकाऱ्याने ऐंशी पुस्तकं उचलली. ती पुढे १९७०मध्ये त्याच्या पुतण्याने ऱ्होड आयलंडमधल्या ब्राऊन विद्यापीठाच्या ग्रंथालयाला दिली.  अमेरिकेत गेलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकं वॉशिंग्टन इथल्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेस या महाकाय ग्रंथालयात हळूहळू गोळा झाली. त्यापैकी खरोखर हिटलरची पुस्तकं कोणती हे निश्चित करण्याचं काम या ग्रंथालयाने १९५२ मध्ये अर्नॉल्ड जॅकोबीयन या अनुभवी ग्रंथपालाकडे सोपवलं. त्याने काही निकष लावून एकूण पुस्तकांपैकी बाराशे पुस्तकं हिटलरची असल्याचा निर्णय दिला. अशाप्रकारे हिटलरने जिवंत असताना आपल्याभोवती गूढतेचं वलय उभं केलं, आपलं भौतिक अस्तित्व नष्ट केलं, तरी तो त्याच्या ग्रंथसंग्रहाच्या रूपाने शिल्लक राहिलाच.
हिटलरच्या या संग्रहात डोळसपणे डोकावणारा संशोधक एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात इतिहासकार आणि संस्कृतीसमीक्षक टिमोथी रेबॅक याच्या रूपाने मिळाला. त्याने लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, ब्राऊन विद्यापीठ इथले हिटलरचे ग्रंथसंग्रह तपासले; अमेरिकेतल्या इतरही ठिकाणच्या ग्रंथालयातल्या हिटलर-संग्रहातल्या पुस्तकांचा शोध घेतला. याशिवाय हिटलरच्या ग्रंथसंग्रहाच्या जर्मनीत उपलब्ध असणाऱ्या सूचींचाही अभ्यास केला. हिटलरने वाचलेल्या शेकडो पानांवरून त्याने आपली शोधक नजर फिरवली. तो म्हणतो की, आपल्या एकूण संग्रहातली दोन तृतियांश पुस्तकं हिटलरने वाचलेली तर नव्हतीच, पण बहुदा उघडूनही पाहिली नसावीत. हे खरं असलं तरी त्याला खास प्रिय असलेली, त्याने आयुष्यभर पुन्हा पुन्हा वाचलेली अशी कितीतरी पुस्तकं त्याच्या संग्रहात निश्चितच होती. हिटलर वेगाने वाचायचा. एका रात्रीत एक पुस्तक संपवून कधी कधी दुसरं सुरूही करायचा. हिटलरच्या संग्रहात अगदी पहिल्यांदा समाविष्ट झालेलं पुस्तक आणि आयुष्याच्या शेवटच्या दोन-चार दिवसांत तो वाचत असलेलं पुस्तक - यांच्या दरम्यानचा त्याने वाचलेल्या विविध विषयांवरच्या पुस्तकांचा एक विस्तृत पट रेबॅकने मांडला.  त्याला असं दिसून आलं की, हिटलरने वाचलेल्या पुस्तकांच्या मजकुरात त्याने केलेली अधोरेखितं, समासात उमटवलेली प्रश्नचिन्हं, उद्गारचिन्हं, छोट्या छोट्या नोंदी इत्यादींवरून त्या पुस्तकांनी हिटलरच्या मनावर काय परिणाम घडवला, त्याच्या मनात कोणती भावनिक आणि वैचारिक आंदोलनं निर्माण केली हे चांगल्याप्रकारे स्पष्ट होतं. आयन करशॉ यांच्या मतानुसार, इतिहासाला अज्ञात राहिलेले हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू त्याच्या वाचनाचा इतिहास मांडल्यास प्रकाशात येतात. हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी या पुस्तकाच्या रूपाने टिमोथी रेबॅकने हिटलरच्या या आयुष्यभरच्या वाचनाचा इतिहास लिहून काढला.
थॉमस राईटने लिहिलेल्या ऑस्कर्स बुक्स या ऑस्कर वाईल्डच्या चरित्रापेक्षा रेबॅकच्या हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी या पुस्तकाचं स्वरूप वेगळं आहे. यात हिटलरच्या अखेरच्या दिवसांवर स्वतंत्र प्रकरण असलं तरी हिटलरच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचं सलग चरित्र या पुस्तकात सांगितलेलं नाही. हिटलरने आयुष्यात पहिल्यांदा पुस्तकं विकत घ्यायला आणि गंभीरपणे वाचायला सुरुवात केली, त्या कालखंडापासून या पुस्तकातलं कथन सुरू होतं आणि ते हिटलरच्या शेवटच्या पुस्तकवाचनापाशी संपतं. हे पुस्तक म्हणजे हिटलरच्या वाचनाचं चरित्र आहे. काही ठिकाणी त्यात हिटलरच्या संग्रहातल्या काही पुस्तकांचंही चरित्र उलगडलं आहे. उदाहरणार्थ, मॅक्स ऑस्बर्न या ज्यू धर्मीय नामवंत कलासमीक्षकाच्या बर्लिन नावाच्या पुस्तकाची रेबॅकने सांगितलेली ही गोष्ट : बर्लिन हे बर्लिन शहरातल्या इमारतींच्या वास्तुशैलीवरचं १९०९ साली प्रकाशित झालेलं पुस्तक हिटलरने वयाच्या सव्वीसाव्या वर्षी २२ नोव्हेंबर १९१५ रोजी विकत घेतलं. पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्यात साधा मेसेंजर म्हणून नोकरी करणाऱ्या या अल्पशिक्षित सैनिकाने शहरात जाऊन चार फ्रँक सिग्रेटी, बाई किंवा बाटली यांवर स्वाभाविकपणे खर्च न करता ते बर्लिनच्या वास्तुकलेविषयीच्या पुस्तकासाठी खर्च करावेत, हे टिमोथी रेबॅकला उल्लेखनीय वाटतं. हिटलरला जर्मन राष्ट्र, जर्मन कला यांचा अभिमान होता. आणि याच अभिमानापोटी त्याने हे पुस्तक घेतलं असावं. १९१५ मध्ये हे पुस्तक खरेदी करून ते वाचायला सुरुवात केल्यानंतरच्या दिवसांत हिटलर ज्या उत्तर फ्रान्सकडच्या आघाडीवर रूजू होता, त्याच परिसरात मॅक्स ऑस्बर्न एका वृत्तपत्रातर्फे युद्धवृत्तान्त लिहिण्यासाठी फिरत होता. इतकंच नव्हे, तर हिटलरच्या तुकडीच्या हालचालींविषयी सैनिकी अहवालांमध्ये आणि ऑस्बर्नच्या प्रकाशित वृत्तान्तांमध्ये नमूद केलेल्या तपशिलानुसार ते दोघे या दरम्यान काही वेळा परस्परांच्या अगदी जवळून गेले होते. या काळात आणि नंतरही हिटलरने बर्लिन हे पुस्तक बारकाईने वाचल्याच्या खुणा त्यावर आहेत. हिटलरचं हे अत्यंत आवडतं पुस्तक बनलं. सबंध महायुद्धकाळात आघाडीवर लढत असताना त्याने हे पुस्तक जवळ बाळगलं. यानंतर सुमारे अठरा वर्षांनी हिटलर जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि ज्यू धर्मियांविरुद्ध अत्यंत विखारी असा वंशवादी प्रचार करत ज्यूंचा संहार करण्याचं सत्र हिटलरच्या नाझी पक्षाने आरंभलं. या मोहिमेचा एक भाग म्हणून १९३३मध्ये ज्यू लेखकांच्या याद्या प्रसिद्ध करून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या होळ्या करण्याचे आदेश त्याने दिले. इतर अनेक ज्यू बुद्धिजीवींप्रमाणे मॅक्स ऑस्बर्न १९३८ साली  फ्रान्समध्ये पळाला आणि १९४१मध्ये त्याने अमेरिकेत आश्रय घेतला. इकडे जर्मनीत इतर अनेक ज्यू लेखकांच्या पुस्तकांसह ऑस्बर्नच्याही पुस्तकांची राख करणाऱ्या ज्यूद्वेषाच्या ज्वाळा हिटलरच्या संग्रहात विसावलेल्या, ऑस्बर्नलिखित बर्लिनची प्रत मात्र गिळू शकल्या नाहीत. मॅक्स ऑस्बर्नच्या आणि त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या जीवावर उठलेल्या हिटलरने ऑस्बर्नच्या बर्लिनची प्रत मात्र मोठ्या प्रेमाने जपली.
१९४५मध्ये हिटलरने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या संग्रहातल्या तीन हजार पुस्तकांसोबत बर्लिनची रवानगी अमेरिकेत झाली. १९४६साली न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या मॅक्स ऑस्बर्न याने जगाचा निरोप घेतला, तेव्हा तिला हिटलरच्या इतर पुस्तकांसोबत वॉशिंग्टनच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेसमध्ये नव्याने आसरा मिळाला होता. यानंतर सुमारे अर्धशतकभराचा काळ बर्लिनच्या या ऐतिहासिक प्रतीच्या आयुष्यात काहीच उलथापालथ घडली नाही. २००१मध्ये हिटलरच्या पुस्तकांच्या शोधात लायब्ररी ऑफ कॉंग्रेसमध्ये आलेल्या टिमोथी रेबॅकने बर्लिनची ही प्रत उघडली. आणि इतकी वर्षं पोटात जपलेलं ऐतिहासिक सत्य तिने या संशोधकाजवळ उघड केलं. बर्लिनच्या १६० आणि १६१ क्रमांकांच्या पानांच्या मध्ये चिकटलेला एक इंचभर लांबीचा केस रेबॅकला गवसला. हा केस बहुदा मिशीचा होता. हिटलरची मिशी! त्याच्या अहंकाराचं, वर्चस्वाचं प्रतीक! या ठिकाणी टिमोथी रेबॅकला वॉल्टर बेंजामीनची आठवण होते. संग्राहकाचं चरित्र आणि चारित्र्य त्याच्या पश्चातदेखील जीवंत ठेवण्याचं काम त्याचा पुस्तकसंग्रह करत असतो, असं बेंजामीन म्हणाला होता. त्याचं मूळ वाक्य असं आहे : “Not that they (books) come alive in him (the collector); it is he who lives in them.”  हिटलरच्या मालकीच्या बर्लिनच्या प्रतीने बेंजामीनचं हे म्हणणं शब्दशः खरं ठरवल्याचा प्रत्यय  रेबॅकला आला. बर्लिनच्या या हिटलर-प्रतीच्या कहाणीवरून रेबॅकला न आठवलेलं बेंजामीनचं आणखी एक विधान असं : “…Not only books but also copies of books have their fates.”
अनपॅकिंग माय लायब्ररी या गाजलेल्या निबंधात वॉल्टर बेंजामीनने पुस्तकांचे संग्रह आणि संग्राहक यांच्याविषयी सूत्ररूपाने मांडलेल्या काही कल्पना टिमोथी रेबॅक याला हिटलरच्या संग्रहात प्रत्यक्षात उतरलेल्या दिसल्या.
पुस्तकं त्यांच्या संग्राहकाला स्वतःत जीवंत ठेवतात, या बेंजामीनच्या विधानाचे विविध अर्थ होऊ शकतात. संग्राहक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं जमवतो. या विषयांमधून त्या संग्राहकाचं व्यक्तिमत्त्व, त्याची अभिरुची यांचं दर्शन घडतं, हा एक अर्थ. याच अंगाने विचार करत हिटलरची अभिरुची कसकशी बदलत गेली, त्याने वाचलेल्या पुस्तकांनी त्याच्यावर कसे संस्कार केले इत्यादी गोष्टी कळतात. मुळात हिटलर अल्पशिक्षित होता. विद्यापीठीय उच्चशिक्षण त्याला अर्धवट सोडावं लागलं होतं. त्याच्या ठिकाणी दिसून आलेल्या बौद्धिक कमतरतेमुळे तो हिणवला गेला होता. याचे दोन परिणाम झाले : एक म्हणजे, बुद्धिजीवी वर्गाबद्दल आणि त्यांच्या वैचारिकतेबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला; आणि दुसरं, जे ज्ञान आपल्याला औपचारिक मार्गाने मिळालं नाही, ते पुस्तकांच्या वाचनातून मिळवण्याची असोशी त्याच्यात निर्माण झाली. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर म्युनिच इथं राहायला आलेल्या हिटलरने नाझी पक्षात प्रवेश केला आणि तिथल्या प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून १९२१ मध्ये पक्षावर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. या दरम्यान ऑक्सबर्ग विद्यापीठातला एक प्राध्यापक ओट्टो डिकेल (Otto Dickel) याचं बौद्धिक मार्गदर्शकत्व नाझी पक्षाने स्वीकारलं होतं. नाझी पक्षाचे विचार प्रखर राष्ट्रवादी आणि वंशवादी असले तरी डिकेल काहीसा मवाळ प्रवृत्तीचा होता. हिटलरला बुद्धिजीवी लोकांविषयी मुळातच आकस होता. त्यात डिकेलचा चर्चाप्रधान मवाळपणात्याला मुळीच मान्य नव्हता. त्यामुळे नाझी पक्षातल्या डिकेलच्या वाढत्या प्रभावाने तो फार अस्वस्थ झाला. त्याने हरप्रकारे आकांडतांडव करून डिकेलची हकालपट्टी करायला लावली आणि पक्षावर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं.
म्युनिच इथला एक लेखक डायट्रिच एकार्ट (Dietrich Eckart) हेन्रिक इब्सेन याच्या Peer Gynt या नाटकाची जर्मन रंगावृत्तीची प्रत हिटलरच्या संग्रहात आहे. या प्रतीच्या शीर्षक-पृष्ठावर लिहिलंय, “Intended for his dear friend Adolf Hitler. – Dietrich Eckart.” डायट्रिच एकार्ट हा जर्मनीतला त्या काळचा लेखक, भाषांतरकार. इब्सेनच्या स्वतः केलेल्या भाषांतराची प्रत त्याने हिटलरला भेट दिली. पहिल्या महायुद्धानंतर म्युनिचला राहायला आलेल्या हिटलरच्या तो संपर्कात आला आणि त्याच्या प्रेमातच पडला. एकार्ट कट्टर वंशवादी आणि ज्यूविरोधी होता. त्याने हिटलरमध्ये जर्मनीचं उज्ज्वल भविष्य पाहिलं. शुद्ध वंशाचं जर्मन राष्ट्र घडवण्याचं कार्य तो करू शकेल अशी त्याची खात्री पटली. त्याने त्याला नाझी पक्षात घेतलं आणि तिथून हिटलरच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.
या काळात हिटलर प्रचंड वाचत होताच. ओट्टो डिकेलशी बौद्धिक पातळीवर आपल्या भूमिकेचा टिकाव लागत नाही याची खंत त्याच्या मनात होती. यावर मात करण्यासाठी आपल्या विचाराला अनुरूप अशी माहिती, संदर्भ, विचार, संशोधन पुस्तकांतून शोधण्याचा त्याने सपाटा लावला. फ्रिड्रीख कोहन हा म्युनिचमध्ये उजव्या विचारसरणीच्या पुस्तकांचं ग्रंथालय चालवत होता. या ग्रंथालयातून १९१९ ते १९२१ या काळात हिटलरने वाचायला नेलेल्या शंभर पुस्तकांची यादी टिमोथी रेबॅकने पाहिली. शुद्ध आर्यवंशाविषयीची पुस्तकं, ज्यू धर्मविरोधी दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तकं त्याने स्वतः तर वाचलीच, पण नाझी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी या पुस्तकांचं वाचन सक्तीचं केलं. या पक्षाच्या सदस्यांसाठी असलेल्या ओळखपत्राच्या मागेच अशा पुस्तकांची यादी हिटलरने छापवून घेतली होती. गूढविद्या, आत्मा-पुनर्जन्म, ज्योतीष या विषयांची त्याला ओढ होती. या काळात हिटलरने कान्ट या जर्मन तत्त्ववेत्त्यापासून नॉस्त्रॅदॅमसच्या भविष्यवाणीपर्यंत विविध विषयांवरच्या पुस्तकांचं वाचन केलं.
नित्शे या तत्त्वज्ञाच्या विचारांचा प्रभाव हिटलरवर होता असं मानलं जातं. पण रेबॅकने हिटलरच्या ग्रंथसंग्रहाचा आणि वाचनविषयक तपशिलांचा धांडोळा घेतल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की नित्शेचं एकही पुस्तक त्याच्या संग्रहात नाही. आपल्या वाचनाविषयी किंवा आपल्याला प्रभावित करणाऱ्या पुस्तकांविषयी त्याने जे लिहिलंय त्यातही नित्शेचा उल्लेख नाही. शोपेनहॉवरचा मात्र आहे. उलट एफ० के० गुंथर याचं रेशियल टायपॉलॉजी ऑफ जर्मन पीपल हे पुस्तक हिटलरने अनेकदा वाचल्याच्या खुणा त्या पुस्तकावर आहेत. वंशशुद्धीचे विचार त्याने या पुस्तकातून घेतले. दुसरं त्याला भयंकर आवडलेलं पुस्तक म्हणजे हेन्री फोर्ड या अमेरिकन उद्योगपतीचं द इंटरनॅशनल ज्यू. या पुस्तकाचं जर्मन भाषांतर त्याच्या अतिशय प्रिय पुस्तकांमध्ये होतं. ज्यू ही एक जागतिक समस्या आहे आणि ती संपवली पाहिजे या विचाराचा पुरस्कार या पुस्तकात केला होता.
हिटलरचं वाचन निवडक (Selective) होतं. तो हाती लागेल ते वाचत नव्हता. जर्मन राष्ट्र, संस्कृती, इतिहास, गूढविद्या या विषयात त्याला रूची होती. या विषयांवर वाचताना काही दृष्टिकोन, काही विचार त्याच्या विचारविश्वात आकार घेऊ लागले. त्यांना पूरक अशीच पुस्तकं तो वाचनासाठी निवडू लागला. या लेखाच्या प्रारंभी दिलेल्या उताऱ्यात दॅनिलो किश् म्हणतो त्याप्रमाणे एकच एक पुस्तक आयुष्यभर वाचणाऱ्या लोकांमध्ये विचार थिजतात, कट्टरपणा वाढतो. पण हा धोका एकाहून अधिक पुस्तकं वाचणाऱ्या लोकांमध्येही तितकाच असतो, हे हिटलरच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. पुस्तकांचं जग हे परस्परांना छेदणाऱ्या, एकाच प्रश्नाच्या अनेक बाजू प्रकाशात आणणाऱ्या विचारांनी गजबजलेलं असतं, हे जरी खरं असलं तरी एखाद्याने आपल्या वाचनाचा परीघ एकाच प्रकारच्या विचाराचं समर्थन करणारी पुस्तकं वाचण्यापुरता संकुचित ठेवला, तर त्या वाचनातून बहुआयामी विचारांचा परिचय होऊ शकणार नाही आणि परिणामी तो एकच विचार अधिक पक्का, अधिक कट्टर होईल. हिटलरने स्वतः हा प्रयोग नाझी कार्यकर्त्यांवर केला. म्हणूनच आपल्या विचाराच्या विरोधी असणारी पुस्तकं जाळून टाकण्याचे आदेश त्याने दिले.
टिमोथी रेबॅक म्हणतो की, पुस्तकं संग्राहकाला जीवंत ठेवतात ही वॉल्टर बेंजामिनची कल्पना हिटलरच्या बाबतीत आणखी एका प्रकारे प्रत्यक्षात उतरली. त्याच्या संग्रहात, त्याचं आत्मकथन माईन काम्फ आणि नॉस्त्रॅदॅमसची भविष्यवाणी या दोन पुस्तकांच्या अनेक प्रती होत्या. पहिलं पुस्तक त्याचं आत्मकथन असल्याने त्यात त्याच्या जीवनाचा आणि जडणघडणीचा काही भाग आलेला होता, तर दुसऱ्या पुस्तकात केलेल्या भविष्यवाणीत हिटलरचा उदय आणि दुसरं महायुद्ध या घटनांचा उल्लेख नॉस्त्रॅदॅमसने केला आहे असा दावा त्या पुस्तकाच्या आधुनिक भाष्यकारांनी केलेला होता. हिटलरच्या संग्रहात असलेल्या या दोन पुस्तकांमध्ये अशाप्रकारे हिटलरचं चरित्र बंदिस्त झालेलं होतं. हिटलरने जपलेली ही पुस्तकं हिटलरचं जीवनचरित्र जपत होती.
बेंजामिनची पुस्तकांच्या संग्रहाविषयी आणखी एक कल्पना : पुस्तकांचा संग्रह करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ती लिहिणे. आवडलेलं प्रत्येक पुस्तक विकत घेण्याची ऐपत नसल्याने हाती आलेलं ते पुस्तक स्वतःच्या हाताने लिहून काढणाऱ्या, आणि अशा हस्तलिखित पुस्तकांचा मोठा संग्रह करणाऱ्या आपल्या एका शिक्षकाविषयी बेंजामिनने लिहिलं आहे. टिमोथी रेबॅक म्हणतो की हिटलरला १९२३मध्ये तुरुंगवास झाला. या ठिकाणी त्याने आपलं पहिलं आत्मकथनात्मक पुस्तक माईन काम्फ लिहिलं. या पुस्तकावर छापून आलेली परीक्षणं पाहता ते त्या काळात जाणकार, बुद्धिजीवी वर्गात अप्रियच ठरलं असं म्हणता येईल. काही परीक्षणकर्त्यांनी तर या पुस्तकातले हिटलरच्या अनैतिहासिक कल्पना, अतिरेकी एकांगी विचार वाचून त्याला मनोरुग्ण ठरवलं. फक्त डायट्रिच एकार्ट या त्याच्या गुरूने अनुकूल परीक्षण लिहून हिटलरची पाठराखण केली. या पुस्तकाची पहिल्या आवृत्तीच्या आणखी हिटलरची स्वाक्षरी असलेल्या अनेक प्रती अमेरिकी सैनिकांनी लांबवूनही हिटलरच्या संग्रहात शिल्लक राहिलेल्या या पुस्तकाच्या प्रतींची संख्या बरीच होती. माईन काम्फनंतर हिटलरने आणखी दोन पुस्तकं लिहिली. पण ती प्रकाशित झाली नाहीत. त्याची हस्तलिखितंही त्याच्या संग्रहात आहेत. खरोखरच हिटलरच्या पुस्तकसंग्रहात वॉल्टर बेंजामिन याने मांडलेल्या पुस्तकसंग्रह आणि त्याचे संग्राहक यांविषयीच्या कल्पनांचं प्रतिबिंब पडलेलं आहे, असं टिमोथी रेबॅकचं प्रतिपादन आहे.
हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी या पुस्तकात टिमोथी रेबॅक हिटलरच्या पुस्तकांचा पाठलागकरत त्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत केला आहे. हिटलरचा संग्रह कसा आणि त्याच्या आयुष्याच्या कोणत्या काळात वाढला, याचा शोध घेण्यासाठी रेबॅकने आयकर विभागातले हिटलरचे वार्षिक खर्चाचे कागदही तपासले आहेत. आणि आपल्या अखेरच्या दिवसांत हिटलर थॉमस कार्लाईलच्या १८५८च्या फ्रेडरिख द ग्रेट चरित्राचं संक्षिप्त भाषांतर वाचत होता, हेही त्याने शोधून काढलं आहे. ११ मार्च १९४५ या दिवशी हिटलरचा विश्वासू सहकारी गोबेल्स याने ही प्रत त्याला भेट दिली होती. अठराव्या शतकात प्रशियाचं साम्राज्य स्थापणारा पराक्रमी फ्रेडरिख द ग्रेट हा हिटलरचा आवडता आणि आदर्श नायक होता. त्याच्या चरित्राची सोबत हिटलरला अखेरच्या पडझडीच्या दिवसांत मिळाली.
हिटलरच्या पुस्तकसंग्रहाची ही कहाणी एका छायाचित्रापाशी संपते. हिटलरने बंकरमध्ये त्याच्या झोपायच्या खोलीत स्वतःचं जीवन संपवल्यानंतर काही तासांनी त्या खोलीचं घेतलेलं हे छायाचित्र आहे. अमेरिकी सैनिकांनी उद्ध्वस्त केलेल्या त्या खोलीत पाच-सहा पुस्तकं मात्र टिकून राहिलेली दिसत आहेत. ही पुस्तकं कोणती असावीत याविषयीचा काही अंदाज टिमोथी रेबॅकने नोंदवला आहे. उंच कपाटावर व्यवस्थित ठेवलेली पाच मोठ्या आकाराची पुस्तकं या छायाचित्रात ठळकपणे दिसतात. हे बहुदा मेयर किंवा ब्रॉकहाऊस ज्ञानकोशाचे हे खंड असावेत, कारण हिटलर हे खंड प्राधान्याने सोबत ठेवत असे. खाली बिछान्याजवळच्या छोट्या मेजावर एक पुठ्ठा बांधणीतलं पुस्तक आहे. त्याचा कणा (spine) कॅमेऱ्याच्या बाजूने आहे. पण त्यावरचं पुस्तकाचं शीर्षक किंवा लेखकाचं नाव वाचता येत नाही, कारण कॅमेऱ्याच्या चमकदार प्रकाशझोतात (flash) ते अदृश्य झालं आहे. रेबॅक म्हणतो, कॅमेऱ्याच्या त्या प्रकाशझोतामुळे इतिहासातला एक महत्त्वाचा तपशील काळोखात कायमचा नाहीसा झालाय. पण बिछान्याच्या इतक्या खेटून ठेवलेलं हेच पुस्तक हिटलरने मृत्यूपूर्वी शेवटचं उघडून पाहिलं असण्याची, त्यातला काही मजकूर वाचला असण्याची शक्यता आहे. गोळ्या झाडून  स्वतःचा शेवट करून घेण्यापूर्वी उघडून पाहावंसं वाटण्याइतकं आत्मीय पुस्तक हिटलरसाठी कोणतं असेल? अर्थातच, ज्याच्याविषयी हिटलरच्या मनात पराकोटीचा आदरभाव वसत होता, आणि जे तो शेवटच्या काही दिवसांत वाचत होता, ते फ्रेडरिख द ग्रेटचं गोबेल्सने दीड महिन्यापूर्वी दिलेलं चरित्रच असणार, असं टिमोथी रेबॅक खात्रीने सांगतो.
टिमोथी रेबॅक याने हिटलरच्या पुस्तकांच्या संग्रहाचं स्वरूप स्पष्ट करताना वॉल्टर बेंजामिनच्या अनपॅकिंग माय लायब्ररी या निबंधाचा आधार घेणं एका दृष्टीने अर्थपूर्ण आहे. ज्यू धर्मीय असलेल्या बेंजामिनने नाझी हिटलरपासून धोका निर्माण झाल्यानंतरच्या अस्थिर परिस्थितीत आयुष्यभर जमवलेल्या पुस्तकांचा संग्रह मागे ठेवून जर्मनी सोडलं. त्याच्या शेजाऱ्याने हा संग्रह नंतर डेन्मार्कला पाठवला. तिथे बेंजामिन त्याचा नाटककार मित्र बर्टोल्ड ब्रेख्त याच्यासोबत काही काळासाठी राहात होता. तिथून आपल्या संग्रहातली निवडक पुस्तकं घेऊन तो पॅरिसला गेला. पण १९४० मध्ये बेकायदेशीरपणे स्पेनमध्ये घुसू पाहणाऱ्या ज्यू लोकांच्या जत्थ्यात सामील होताना मात्र त्याला आपल्या पुस्तकांना कायमचा निरोप द्यावा लागला. स्पेनची सीमा पार करणं अशक्य आहे असं दिसताच आपल्या भवितव्याच्या चिंतेने हवालदिल झालेल्या बेंजामिनने फ्रान्स-स्पेनच्या सीमेवरच मॉर्फिनचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्या केली. हॅना आरेन्ड्ट या बेंजामिनच्या अभ्यासक असलेल्या विदुषीच्या मते, बेंजामिनला शेवटच्या क्षणी आलेल्या विफलतेमध्ये, आपला प्राणप्रिय पुस्तकसंग्रह गमावल्याच्या भावनेचा वाटा अधिक होता. आपली पुस्तकं म्हणजे एकप्रकारे आपलं अस्तित्वच आता फ्रेंच गेस्टापोंच्या हाती पडणार आणि नष्ट होणार या कल्पनेने तो बधीर झाला होता.
ज्या हिटलरच्या काळ्या कर्तृत्वामुळे इतर लाखो ज्यूंसह बेंजामिनच्या जीवनाची आणि पुस्तकसंग्रहाची अशी वाताहत झाली, तो हिटलरही पुस्तकप्रेमी होता. आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा अंत झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतरच्या विफलतेपोटी त्याने आत्महत्या केली आणि त्यानंतर त्याचा पुस्तकसंग्रह दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांच्या हाती पडला आणि युरोप-अमेरिकेत अनेक ठिकाणी विखुरला. वॉल्टर बेंजामिन अनपॅकिंग माय लायब्ररी हा निबंध लिहित असताना, पुस्तकसंग्रह आणि त्यांचे संग्राहक यांच्याविषयी Not that they come alive in him; it is he who lives in them, हे शब्द त्याच्या लेखनीतून कागदावर उमटले, तेव्हा पुस्तकसंग्रहांचा अशा प्रकारे विनाश होऊ शकतो याची त्याने कल्पनाही केली नसावी. या भयस्वप्नापासून त्याचा हा निबंध पूर्णपणे मुक्त आहे. पण संग्राहकाला जिवंत ठेवण्यासाठी मुळात संग्रह तर जिवंत, अक्षत राहिला पाहिजे!
हॅना आरेन्ड्ट म्हणते ते खरं असेल तर या भयाचा साक्षात्कार बेंजामिनला स्पेनच्या सीमेवर त्या अंतिम क्षणी झाला असणार. अनपॅकिंग माय लायब्ररी या निबंधातल्या वाक्यावाक्यातून निथळणारी बेंजामिनची पुस्तकांविषयीची असोशी (passion) आपण अनुभवली, तर त्याच्या या भयाची तीव्रताही आपल्याला जाणवू शकेल. आणि मग पुस्तकांचा कायमचा विरह हे बेंजामिनच्या आत्महत्येचं कारण आहे या हॅना आरेन्ड्टच्या म्हणण्यावर आपला विश्वास बसेल.
पण टिमोथी म्हणतो की बेंजामिनचा अंदाज चुकला. बेंजामिनच्या पश्चात त्याची पुस्तकं फ्रेंच गेस्टापोंनी जर्मनीत बर्लिनला पाठवून दिली. दुसरं महायुद्ध संपल्यावर सोविएत रशियाने बेंजामिनच्या संग्रहावर दावा सांगितला आणि हा संग्रह मॉस्कोला नेला. पुढे मॉस्कोहून तो पुन्हा जर्मनीत फ्रँकफर्ट इथल्या थिओडोर ऑडोर्नो (प्रसिद्ध मार्क्सवादी समीक्षक आणि वॉल्टर बेंजामिनचा मित्र) याच्या दफ्तरात दाखल झाला आणि अखेर विसाव्या शतकाच्या अखेरीस वॉल्टर बेंजामिन संग्रह म्हणून मूळ स्थळी त्याची पुनर्स्थापना झाली. हिटलरचाही विस्कळीत झालेला संग्रह हळूहळू अमेरिकेत काही केंद्रामध्ये एकवटत गेला आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध झाला. म्हणजे, संग्राहकाला जीवंत ठेवण्याची क्षमता पुस्तकसंग्रहाच्या ठायी असते, ही बेंजामिनची कल्पना सत्य ठरली.
पण हे सर्व युरोप-अमेरिकेत घडलं. रनेसान्स काळापासून युरोपीय समाजाची पुस्तकांशी जवळीक आहे. मानवी संस्कृतीमध्ये छापील कागदाला असलेलं महत्त्व ते जाणतात. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बेंजामिन, हिटलर यांच्यासारख्या इतर अनेकांचे पुस्तकसंग्रह जपले गेले. आपल्याकडेही काही मोजके पुस्तकप्रेमी आयुष्यभर पुस्तकं जमवताना, त्यांची काळजी घेताना दिसतात. पण त्यांच्यामागे त्या संग्रहाचं काय होत असेल हा विचारही आपल्या समाजात कधी चर्चेचा विषय होत नाही. अनेकदा असं घडतं की संग्राहकाने जगाचा निरोप घेतला, की त्याच्या मागे लगेच त्याची पुस्तकंही रस्त्यावर येतात. कोणालाच ती हवीशी नसतात. म्हणजे व्यक्तिगतरित्या सोडाच, पण संस्थात्मक पातळीवरही हे संग्रह जोपासण्याची काही व्यवस्था आपण आजवर निर्माण करू शकलो नाही. रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा संग्रह त्यांच्या वारसांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला दिला. डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांचा संग्रह मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आहे. अनेक दिवसांपासून बंद दरवाजाआड पडून असलेल्या या संग्रहांची आजची दशा कशी आहे कुणास ठाऊक! पण आता ग्रंथालयं देखील असे खाजगी संग्रह जागा नाही, या सबबीखाली स्वीकारायला नकार देत आहेत. जे स्वीकारले गेले, ते योग्य निगराणीअभावी आपल्या विनाशाची वाट पाहात पडलेत.
पुस्तकांच्या संग्रहानेच त्याच्या संग्राहकाला जिवंत ठेवण्याचं बेंजामिनने पाहिलेलं स्वप्न, आपल्याकडे प्रत्यक्षात येणं कठीण. उलट त्याने त्याच्या अंत:समयी पाहिलेलं स्वतःच्या पुस्तकसंग्रहाविषयीचं दुःस्वप्न मात्र इथल्या संग्राहकांना आयुष्यभर भेडसावत राहतं...
                                                                 (लोकवाङ्मयगृहातर्फे प्रकाशित होणाऱ्या 'लीळा पुस्तकांच्या' या आगामी पुस्तकातील एक लेख)

----