Monday 6 March 2017

टोलेजंग कादंबऱ्या आणि कमजोर वाचक

टोलेजंग कादंबऱ्या आणि कमजोर वाचक

रॉबेर्तो बोलॅन्यो याच्या २६६६ (प्रकाशनः स्पॅनिशः २००४, इंग्रजीः २००८) या कादंबरीतलं एक साहित्यप्रेमी पात्र अमालफितानो हे औषधीच्या दुकानात जातं आणि तिथला दुकानदार पुस्तक वाचण्यात गर्क असलेला पाहून त्याला फार आनंद होतो. मोठ्या कौतुकाने अमालफितानो त्याला तो कोणतं पुस्तक वाचतोय आणि कोणत्या प्रकारची पुस्तकं त्याला आवडतात, ते विचारतो. दुकानदार पुस्तकातून मानही वर न काढता सांगतो, काफ्काच्या मेटॅमॉर्फॉसिससारखी पुस्तकं त्याला आवडतात. आणि त्याच्या हातातलं पुस्तक असतं, ट्रुमन कपोते या लेखकाचं, ब्रेकफास्ट ॲट त्रिफनीज’.
अमालफितानोच्या मनातली कौतुकाची भावना क्षणात विरून जाते. मेटॅमॉर्फॉसिस किंवा ब्रेकफास्ट अँट त्रिफनीज ही पुस्तकं अमालफितानोला खऱ्या अर्थाने पुस्तकंवाटतच नसतात. त्या असतात केवळ कथा. किंवा आपल्याकडच्या लघुकादंबऱ्या. त्या अत्यंत रेखीव असतील, त्यांची परिणामकारकता अत्यंत टोकदार असेल. पण शेवटी कादंबऱ्यांमध्ये असलेली अनेकप्रवाही कथानकं, त्यातून दाखवलेली जीवनाची गुंतागुंत या कथांमध्ये नसतेच. अमालफितानोला विषण्णपणे वाटतं की, या औषधविक्यासारख्या वाचकांनासुद्धा वाचायला मोठ्या लेखकांच्या तासून तासून सुबक बनवलेल्या, आकाराने आटोपशीर अशा कादंबऱ्याच हव्या असतात. त्यांना लेखकांनी घडवलेले पैलूदार हिरेच हवे असतात. पण त्याच लेखकांनी निर्माण केलेल्या बहुप्रवाही, ओबडधोबड जीवनाच्या अज्ञात प्रदेशाचा बेधडक शोध घेणाऱ्या कादंबऱ्यांच्या ते वाटेलाही जात नाहीत. हे वाचक काफ्काच्या ट्रायलऐवजी मेटॅमॉर्फासिस निवडतील, मेलविलच्या मोबी-डिकऐवजी त्याची छोटीशी बार्टलबाय निवडतील, फ्लॉबेरच्या बॉवार्द अँड पेश्श्यूतच्या ऐवजी अ सिंपल हार्ट निवडतील आणि डिकन्सच्या अ टेल ऑफ टू सिटीज किंवा द पिकविक पेपर्स यासारख्या कादंबऱ्यांच्या ऐवजी अ ख्रिसमस कॅरोल हातात घेतील. अमालफितानोला वाटतं, लेखक आपलं अवघं अस्तित्व, आपली सगळी सर्जनशक्ती पणाला लावून जीवनाचा मोठा आवाका कवेत घेण्याचा प्रयत्न करतो. असं लिखाण करण्यासाठी कादंबरीच्या रूढ चाकोऱ्यांचीही तो तमा बाळगत नाही. ही त्याची खरी लढाई असते. मानवी जीवनातल्या जखमा, दहशत आणि दुर्गंधी यांच्याशी हे लेखक लढत असतात. अशा कादंबऱ्याच खऱ्या अर्थाने कादंबऱ्या असतात. वाचकांना मात्र लेखकाच्या या लढाईत रस नसतो. एकप्रकारे त्यांना वाचनदेखील सुरक्षित हवं असतं.
स्वतः बोलॅन्योची महत्त्वाकांक्षा, अशी, मानवजातीत दहशत निर्माण करणाऱ्या गोष्टींशी, जीवनातल्या जखमा आणि दुर्गंधी यांच्याशी दोन हात करणारी कादंबरी निर्माण करण्याची होती. त्यातूनच २६६६ ही नऊशे पृष्ठसंख्येची कादंबरी बोलॅन्योने आयुष्याच्या अखेरच्या जीवघेण्या आजारात लिहिली. त्याचं यकृत दिवसेंदिवस निकामी होत चाललेलं असतानाही तो दिवसाचे सोळा-सोळा तास ही कादंबरी लिहिण्याचे कष्ट घेत होता. ह्या कादंबरीची रचना पाहिल्यास त्याने कादंबरीकार म्हणून किती मोठी रिस्क घेतली हे लक्षात येतं. या कादंबरीचे पाच विभाग आहेत आणि या पाचही विभागांचा एकमेकांशी असलेला संबंध म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही अशा स्वरूपाचा आहे. बेन्नो व्हॉन् आर्चिम्बोल्डी या जर्मन लेखकाचा ठावठिकाणा शोधणे हे या संपूर्ण कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र धरलं, तर मेक्सिको शहरात विसाव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या शेकडो तरुण मुलींच्या खूनसत्रावरचं रिपोर्ताजवजा असलेलं या कादंबरीतलं चौथं प्रकरण बऱ्याच वाचकांना अडगळीचं वाटू शकेल. पण वरच्या प्रसंगात अमालफितानो काय म्हणतो आहे हे समजावून घेतलं तर बोलॅन्यो याने ही अडगळहेतूपुरस्सर कादंबरीत समाविष्ट केली आहे हे लक्षात येतं. नाझी जर्मनीतल्या हिंसाचारापासून मेक्सिकन तरुणींच्या खूनसत्रातील हिंसाचारापर्यंतचा पट मांडण्यातली बोलॅन्योची जाणीवपूर्वकताही ध्यानात येते.
रॉबेर्तो बोलॅन्यो याची २६६६पूर्वीची द सॅवॅज डिटेक्टिव्ह्ज (१९९८/२००७) ही ५७७ पृष्ठांची कादंबरीदेखील अशीच टोलेजंग होती. उलिसेस लिमा आणि अल्बेर्तो बेलान्यो हे दोन मेक्सिकन कवी या कादंबरीचे नायक आहेत. त्यांच्या १९७६ ते १९९६ या वीस वर्षांतल्या हालचालींचं वर्णन या कादंबरीत केलं आहे. पण या कादंबरीत तब्बल ५४ निवेदक आहेत. या निवेदकांच्या निवेदनांतून, तुकड्या-तुकड्यांनी, लिमा आणि बेलान्यो यांची कथा जोडली जाते. लॅटिन अमेरिकेतील मेक्सिकोपासून अमेरिका, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, ऑस्ट्रिया, इटली, इस्रायल इतक्या देशांतून ही कादंबरी वाचकांना फिरवून आणते.
पूर्वी एकोणिसाव्या शतकातले युरोपिय कादंबरीकार टोलेजंग कादंबऱ्या लिहीत असत : दोस्तोवस्की, टॉलस्टॉय, डिकन्स, बाल्झाक यांच्यासारख्या गंभीर लेखकांपासून अलेक्सांदर द्युमा याच्यासारख्या लोकप्रिय लेखकांपर्यंत सर्वांचीच प्रवृत्ती मजबूत मोठ्या कादंबऱ्या लिहिण्याची होती. पण या कादंबऱ्या वेगळ्या होत्या. चित्रकलेतल्या वास्तववादी तंत्राचा प्रभाव या कादंबऱ्यांवर होता. कादंबरीतल्या व्यक्तीचं, प्रसंगांचं, स्थळांचं अत्यंत तपशीलवार वर्णन करणं तेव्हा आवश्यक असायचं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपिय कादंबरी व्यक्तीच्या मनाच्या तळघरात उतरू लागली. मानवाच्या अस्तित्वाचा तात्त्विक अर्थ काय हे तपासू लागली. तसतसं समाजातल्या बाह्य वास्तवाऐवजी व्यक्तीच्या मनातले वेगवेगळे अदृश्य कंगोरे, कुंठीत करणारी मानवाची अवस्था यांचं दर्शन कादंबरीतून घडू लागलं. कादंबरीचं कथानक, पात्रसंख्या, घटना-प्रसंगांची संख्या, उपकथानकांचे फाटे या साऱ्यांचा संकोच होऊ लागला. एखाद्या प्रसंगात बोलणारी पात्रे कोणत्या हालचाली करतात, त्यांची चेहरेपट्टी काय, पेहराव कोणता, यांच्या तपशीलवार वर्णनांना काट बसली. अमूर्त विचार, कल्पना यांचा आकार कादंबरी धारण करू लागली. कादंबरी कवितेचे गुण धारण करू लागली. शब्दांची काटकसर, कमी शब्दांत अर्थांची अनेक वलये इत्यादी इत्यादी. याचा परिणाम कादंबरीच्या रचनेवर, आकारावर होऊन तिचं कथानक सरळसोट एकरेषीय, आकार आटोपशीर बनले.
याच दरम्यान कांट या जर्मन तत्त्वज्ञाच्या सौंदर्यवादी विचारानुसार, एक कलाकृती म्हणून कादंबरीतल्या घटकांची अंतर्गत सुसंगती, सेंद्रिय एकात्म रचना वगैरे कल्पनाही प्रभावी ठरल्या. कवितेप्रमाणेच कादंबरीचाही एकात्म स्वरूपाचा परिणाम वाचकावर व्हायला हवा, हा एकात्म परिणाम बिघडवून टाकील असं काही कादंबरीच्या रचनेत असू नये, हा आग्रह वरचढ ठरला. मराठीत देखील एकोणीसशे साठच्या सुमारास खेड्यापाड्यातून नव्याने लिहू लागलेल्या लेखकांमध्ये वचक बसवणारं, कथेला, कादंबरीला टोक हवं, कलात्मक परिमाण हवा, वगैरे मौजसंप्रदायाचं साहित्यशास्त्र याच जातकुळीचं होतं.
या विचारांच्या प्रभावामुळे युरपमध्ये देखील विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धुकात कादंबऱ्या आशयदृष्ट्या आणि आकारदृष्ट्या चिंचोळ्या होत गेल्या. थॉमस मान, मार्सेल प्रुस्त आणि रॉबर्ट मुसील हे लेखक अपवाद करता इतर लेखक मोठ्या पल्ल्याच्या कादंबऱ्या लिहू शकले नाहीत. पण गेल्या पंचवीस-तीस वर्षांत मात्र युरोपीय लेखक पुन्हा एकदा धाडसी बनल्याचं दिसतं. जीवनाचे मोठमोठे अज्ञात प्रदेश पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर हे कादंबरीकार पुन्हा एकदा निघाले आहेत. अर्थात, आता त्यांच्या कल्पनाशक्तीची आयुधं एकोणिसाव्या शतकातल्या  वास्तववाद्यांपेक्षा वेगळी, नवी, ताजी आहेत. कारण काळ बदललाय. ह्या नव्या काळातले गुंते सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधण्याचं आव्हान निर्माण झालं  आहे.
मेक्सिकन लेखक रॉबेर्तो बोलॅन्यो हा असाच एक धाडसी लेखक आहे. पण तो एकटा नाही. लॅटिन अमेरिकन लेखक गार्सिया-मार्खेज, वर्गास-योसा यांच्यापासून ही मजबूत परंपरा सुरू झाली आहे. आता त्यांच्या जोडीला हंगेरीयन लेखक पेतर नादास आणि पेतर इस्तरहेजी आणि लाझ्लो क्राझ्नाहोर्काइ हे आहेत. जर्मन लेखक पास्कल मर्सियर आहे. जपानी लेखक हारूकी मुराकामी आहे (हा लेखक आशियायी असला तरी त्याचे देशबांधव त्याला पाश्चात्त्य संवेदनशीलतेचा म्हणून हिणवतात किंवा नावाजतात). या लेखकांच्या कादंबऱ्यांचे टोलेजंग आकार पाहून वाचक प्रथमदर्शनीच दचकू शकतात. आणि वाचायला सुरुवात केल्यास त्यांच्या गुंतागुंतीच्या रचनांमध्ये वाचक हरवून जाऊ शकतात. हे लेखक कादंबऱ्यांच्या आकाराची तमा बाळगत नाहीत. ते शेकडो-हजारो पानं लिहितात. रचनेची एकात्मता आणि परिणामकारकता यांविषयीही ते बेफिकीरी दाखवतात. याचा अर्थ असा की ते नव्या रचना घडवण्याचं धाडस दाखवतात. आपले काही प्रयोग फसतील, काही यशस्वी होतील, याची त्यांना जाणीव आहे. पेतर नादासच्या बुक ऑफ मेमरीजमध्ये (१९८६/१९९७, पानं ७००) किंवा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पॅरालल स्टोरीजमध्ये (पानं ११३३) एकाहून अधिक कथासूत्रं एकत्र आणलेली आहेत. पेतर इस्तरहेजी याच्यासेलेस्टियल हार्मनीज (२०००/२००४, पानं ८४६) या कादंबरीत दोन विभाग आहेत. इस्तरहेजी घराणं हे हंगेरीमधलं शेकडो वर्षांची परंपरा असलेलं राजघराणं. याच घराण्यातले पेतर इस्तरहेजीचे वडील हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही काळ हंगेरीचे पंतप्रधानही होते. पण हंगेरीवरील नाझी आक्रमणाच्या आणि त्यानंतरच्या कम्युनिस्ट अतिक्रमणाच्या काळात त्यांना फार यातनामय जीवन जगावं लागलं होतं. ही कादंबरी पेतर इस्तरहेजीच्या वडिलांविषयीची आहे. पहिल्या विभागात ३७१ तुकड्यांमधून लेखकाने इस्तरहेजी घराण्यातल्या पूर्वज पुरुषांच्या कथा सांगितल्या आहेत. या प्रत्येक पूर्वजाचा उल्लेख  निवेदक माझे वडील असाच करतो. दुसऱ्या विभागात निवेदकाच्या प्रत्यक्ष वडलांचं शोकात्म स्वरूपाचं जीवन येतं. ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी पेतर इस्तरहेजीला आपल्या वडलांच्या कागदपत्रांमध्ये एक वही सापडली. त्यावरून कम्युनिस्टांच्या ज्या जुलमी राजवटीच्या काळात इस्तरहेजींचा छळ झाला होता, त्या काळात ते कम्युनिस्टांचा  हेर म्हणूनही काम करत होते, ही धक्कादायक वस्तुस्थिती पेतर इस्तरहेजीला कळली. त्यावर त्याने पुन्हा सेलेस्टियल हार्मनीजला पुरवणी म्हणूनरिवाईज्ड एडिशनया नावाची आणखी एक छोटी कादंबरी लिहिली.
आजच्या काळाची गुंतागुंत पकडण्यासाठी या लेखकांना किती वेगवेगळे प्रयोग करावे लागत आहेत, ते या कादंबऱ्यांवरून दिसतं. महत्त्वाचं म्हणजे काळाचं आव्हान स्वीकारून कष्टपूर्वक कादंबऱ्या लिहिणारे हे लेखक आहेत. कथानकांचे एकाहून अधिक प्रवाह, आंतरसंहितात्मक मजकूर, वाचकांना चकवणारे आणि थकवणारे निवेदनाचे प्रयोग ही या कादंबऱ्यांची वैशिष्ट्यं आहेत. काही प्रमाणात गार्सिया-मार्खेज किंवा वर्गास-योसा यांच्यापेक्षाही या कादंबऱ्या वाचकाला थकवणाऱ्या, वाचायला कठीण आहेत. इथे प्रश्न उपस्थित होतो की असे स्वतःला थकवून घेणारे वाचक या लेखकांना लाभतील का? अमालफितानोला भेटलेल्या औषधविक्यासारखेच जर बहुतेक वाचक असतील, तर या टोलेजंग कादंबऱ्यांच्या वाटेला कोण जाईल? अशा कादंबऱ्या बैठक मारून, एकाग्र होऊन वाचाव्या लागतात. त्या समजावून घेण्यासाठी बौद्धिक आणि भावनिक क्षमता पणाला लावाव्या लागतात. एकप्रकारची सहनशक्ती वाचकाच्या अंगी असावी लागते. काही वर्षांपूर्वी श्याम मनोहरांनी डोक्याला ताप चांगला असं मानणाऱ्या वाचकांची गरज प्रतिपादिली  होती. असा वाचक मुळातच अल्पसंख्य असतो. आजचा वाचक अनेक तासपर्यंत एकाच पुस्तकाच्या वाचनात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता गमावून बसला आहे असं म्हटलं जातं. तो या हजारो पृष्ठांच्या आणि गुंतागुंतीची कथानकं असलेल्या कादंबऱ्यांशी डोळा भिडवायला घाबरत असेल तर या धाडसी कादंबरीकारांचे बौद्धिक आणि शारीरिक श्रम वायाच जाणार की काय? या कादंबऱ्या सशक्त वाचकांची वाट पाहात आहेत.

 नीतीन रिंढे