Monday 8 February 2021

आउटसायडर

आऊटसायडर

 

काही शब्द लहानपणीच तुमच्या मनात साकळून बसतात. तसा माझ्या मनातला घाटी हा शब्द आहे. माझ्या लहानपणी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या वाकवली नावाच्या गावात आम्ही घाटी म्हणून दहा वर्षं राहिलो. 

       वाकवलीच्या मराठवाडी, गवळवाडी, बौद्धवाडी, कोंडवाडी अशा वेगवेगळ्या वाड्या दूरदूरपर्यंत विखुरलेल्या होत्या. दर दोन वाड्यांच्या दरम्यान भाताची शेतं, नागमोडी नदी, लहानमोठ्या टेकड्या इत्यादी. पण या अस्ताव्यस्त पसरलेल्या गावाला दापोली-खेड रस्ता जिथून चिरून जायचा, त्या परिसरात बसस्टँडभोवती एक वसती उभी राहिली होती; तिला नवानगर म्हणायचे. वाकवलीच्या या नवानगरात स्थानिक लोकांपेक्षा आमच्यासारख्या घाटी लोकांचा अधिक भरणा होता. या गावात, नवानगरमध्येच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, दहावीपर्यंतचं हायस्कूल, जनावरांचा दवाखाना वगैरे होतं. शिवाय मुख्य म्हणजे दापोलीच्या कृषी विद्यापीठाचा पसारा या गावात बराचसा पसरला होता. नवानगरच्या दक्षिणेला पसरलेल्या बुटक्या टेकड्या आणि त्यांच्याभोवतीचा परिसर या कृषी विद्यापीठाचा होता. तो हापूस आंब्याच्या विस्तीर्ण बागा आणि कार्यालयांच्या इमारती यांनी व्यापलेला होता. या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारा कर्मचारीवर्ग हा बाहेरगावाहून (विशेषतः कोकणाबाहेरून) आलेला, नवानगरमध्ये भाड्याने घरं घेऊन राहात होता. काही लोक खेड-दापोली या तालुक्यांच्या गावी नोकऱ्या करणारे होते; वाकवलीत तुलनेने स्वस्तात भाड्याने घर मिळतं म्हणून नवानगरमध्ये पडाव टाकलेले होते. आम्ही त्यांच्यापैकी होतो.

       अशाप्रकारे वाकवली या गावाला आजूबाजूच्या गावांपेक्षा जरा निराळा चेहरा मिळाला. विशेषतः नवानगर हे कोकणातलं गाव वाटतच नसे. तिथं रस्त्याने चालताना स्थानिक बोली ऐकायला मिळे, तेवढ्याच प्रमाणात कोल्हापुरी, सातारी, पुणेरी बोली कानावर पडत असे.

       नवानगरमधले किंवा आजूबाजूच्या वाड्यांमधले गाववाले लोक आमचा उल्लेख घाटी किंवा ‘घाटावरचे असा करत. मुंबईत मराठी माणसाला घाटी म्हणताना अमराठी लोकांच्या बोलण्यात जो तुच्छतेचा भाव असतो, तसा त्यांच्या बोलण्यात नसे. ते फक्त आमचं त्यांच्याहून असलेलं सांस्कृतिक, भाषिक वेगळेपण अधोरेखित करणारं संबोधन असे. पण आपण इथल्या स्थानिकांच्याहून वेगळे, उपरे आहोत याची जाणीव अशा संबोधनाने मनात होत असे. अगदी लहानपणी नाही, पण मी दहा-अकरा वर्षांचा झाल्यानंतर मलाही ही जाणीव होऊ लागली होती. आमचं हायस्कूल कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद संस्थेचं होतं. तिथं नोकरी करणारा एकूण एक शिक्षक सातारा-सांगली-कोल्हापूर या पट्‌ट्यातला होता.

       इथं आणखी एक प्रादेशिक गोम' होती. आम्ही मूळचे विदर्भातल्या बुलढाण्याचे. वाकवलीतल्या कोकणी माणसांची बोली आणि संस्कृती आम्हाला जेवढी परकी होती, तेवढीच शाळेतल्या आमच्या दक्षिण महाराष्ट्रीय शिक्षकांची बोली आणि संस्कृतीही परकी होती. पण कोकणी गाववाल्यांच्या दृष्टिकोनातून आम्हां कोकणाबाहेरच्या सगळ्यांची ओळख एकच होती : ती म्हणजे, घाटी. सह्याद्री उतरून जे कोणी कोकणात खाली उतरले ते सगळे घाटावरचे, इतकं साधं त्यांचं आकलन होतं. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ वगैरे प्रदेशांमधला भाषिक-सांस्कृतिक भेद निदान १९७०च्या दशकात तरी, रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्या छोट्याशा गावातल्या स्थानिकांच्या भौगोलिक आकलनाच्या पलीकडे होता. दळणवळणाची आजच्याइतकी साधनं नसलेल्या त्या काळात इतक्या दूरच्या प्रदेशातून कोकणाच्या त्या भागात नोकरीधंद्यानिमित्त आलेले लोकही अत्यंत तुरळक होते (आज उत्तर भारतीय लोकही कोकणात सुखाने राहताना दिसतात). सह्याद्रीचा घाट हीच कोकणी खेड्यातल्या त्या स्थानिकांनी प्रमुख विभाजन रेषा बनवून टाकली होती. त्या रेषेपलीकडे, घाटावर राहणारे ते घाटी; या न्यायाने आम्ही सर्व घाटी होतो. गावात मी आणि माझे कोल्हापुरी शिक्षक घाटी या एकाच लेबलखाली वावरत असलो, तरी शाळेत त्यांची भाषा आणि त्यांची संस्कृती मला कोकणच्या संस्कृतीइतकीच परकी होती. त्यांनाही माझी.

       पण माझी आणखी गोची बुलढाण्याला गेल्यानंतर व्हायची. वर्षातून दोन वेळा दिवाळी आणि उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यांमध्ये आम्ही गावी जाऊन राहायचो. तिथं माझे नातेवाइक माझी कोकणी म्हणून थट्टा करायचे. याचं मुख्य कारण होतं माझी भाषा. माझे आईवडील बुलढाण्याला गेल्याबरोबर तिथल्या लोकांसारखेच बोलायला लागायचे. पण मला वऱ्हाडी बोली यायची नाही. नवानगरमध्ये कानावर पडणाऱ्या कोकणी, पुणेरी, कोल्हापुरी, सातारी या बोलींनी माझी संमिश्र बोली घडवलेली. ती कुठल्याच एका विशिष्ट प्रदेशाशी जुळत नव्हती. पण ती माझ्या वऱ्हाडी नातेवाइकांना माझी थट्टा करण्यासाठी ती पुरेशी परकी होती.

       शिवाय मी प्रकृतीने किडकिडीत आणि रंगाने पिंगट होतो. त्यांच्या मते कोकणातल्या दमट प्रदेशात माणसं अशी पिंगट बनतात आणि नुसता भात खाल्ल्याने किडकिडीत राहतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीतून मी पक्का कोकणी बनलो होतो. सकाळ-संध्याकाळ चटणी-भाजी-भाकरी खाऊन दिवसभर शेतात घामाने निथळत राबणाऱ्या आमच्या काळ्या वऱ्हाडी लोकांचे दणकटपणाचे निकष वेगळे होते. 

       

 

अशा प्रकारे मी एकाच वेळी दोन्ही प्रदेशांमध्ये उपरेपणाचा, परकेपणाचा अनुभव घेत होतो. त्या लहान वयात या उपरेपणाची जाणीव एवढी प्रखर नसेलहीपण नेणिवेत कुठंतरी हा अनुभव साकळून राहिला; आणि पुढल्या आयुष्यात त्याची पुन्हा पुन्हा प्रचिती येऊ लागल्यावर हा भूतकाळ अधिक ठळक झाला.

       काही वर्षांनी वडलांची ठाण्याला बदली झाल्यावर आम्ही कोकण सोडलं, आणि कल्याणला राहू लागलो. काही कौटुंबिक कारणांमुळे मला आईवडलांचं घर सोडून चार वर्षांसाठी विदर्भात वर्ध्याला राहायला जावं लागलं, तेव्हा मी बारावी झालो होतो. माझं बीएचं शिक्षण मग मी वर्ध्याला उरकून घेतलं. तिथं पुन्हा एकदा मी को?’ हा प्रश्न निराळ्या रूपात जाणवू लागला. मी कल्याणहून वर्ध्याला गेलेलो असलो, तरी वर्धा आणि माझं मूळ गाव असलेलं बुलढाणा ही दोन्ही शहरं विदर्भातली असल्याने आपण आपल्या मूळ प्रदेशातच राहायला चाललो आहोत अशी माझी भावना होती. पण वर्धेत मी ज्या मित्रांच्या गोतावळ्यात वावरलो, त्या मित्रांना मात्र तसं वाटलं नाही. एकतर माझी बोली वऱ्हाडी नव्हती. त्यांच्या नजरेतून मी मुंबई-पुण्याकडली मराठी बोलत होतो. शिवाय मी मूळचा बुलढाण्याचा आहे हे मान्य केलं तरी बुलढाणा विदर्भात आहे, हे ते मानायलाच तयार नव्हते. त्यांचं म्हणणं हा विदर्भाच्या पश्चिम टोकाचा जिल्हा; त्याचं नातं खानदेश-मराठवाड्याशी अधिक आहे. त्यामुळं त्यांच्या लेखी मी एकतर मुंबईकर होतो; किंवा त्यांच्या या म्हणण्यावर मी आक्षेप घेतला तर खानदेश-मराठवाड्याकडचा होतो; पण वऱ्हाडी मात्र खचितच नव्हतो. 

       मित्रांच्या या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य आहे, हे मध्यंतरी माझ्या बुलढाण्यातल्या वर्ष-सहा महिन्यांच्या वास्तव्यात आलेल्या अनुभवावरून मला उमजलं होतं.

       बुलढाणा शहर अजिंठा डोंगररांगेत उंच पठारावर वसलेलं आहे. शहराबाहेर उत्तरेला आठदहा किलोमीटरवरचा घाट उतरून खाली गेलं की मलकापूर-मोताळा हे तालुके लागतात. भौगोलिकदृष्ट्या विदर्भातले असले तरी या तालुक्यांचा सांस्कृतिक तोंडवळा, भाषिक लकबी यांवर खानदेशचा प्रभाव आहे. बुलढाण्याचे लोक या भागातल्या लोकांचा उल्लेख घाटाखालचे’ असा करतात. घाटाखालचे या शब्दाचा बुलढाण्यात अर्थ होतो, खानदेशी संस्कृतीतले. आम्ही कोकणात (सह्याद्री) घाटाखाली राहताना घाटावरचे म्हणून परके ठरवले जायचो; इथं आमच्या बुलढाण्यात मी घाटावर राहताना मलकापूर-मोताळ्याच्या लोकांना घाटाखालचे म्हणून परकं ठरवलं जाताना पाहात होतो. बुलढाण्याच्या पश्चिमेकडच्या उतारावरून खाली गेलं की पंचवीस-तीस किलोमीटरवर जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. हा जिल्हा मराठवाड्यात येतो. आमच्या बुलढाणा परिसरातल्या बऱ्याच लोकांच्या सोयरिकी मराठवाड्यातल्या या प्रदेशातल्या गावांमध्ये असल्याने या गावांशी तुलनेने अधिक संबंध येतो. परंतु या परिसराचा उल्लेख ते मोगलाई असा करतात. केवळ परिसराचा नव्हे, तर तिकडच्या रीतीभातींना, लोकांच्या वर्तनालाही मोगलाई म्हणून हिणवतात. कुणी मनमानी, दांडगाई करू लागला तर ही काय मोगलाई लागून गेलीय काय?’ असं म्हणण्याची प्रथा बुलढाणा परिसरात आहे (याला निजामशाहीच्या मनमानी, अराजकी राज्यकारभाराचा संदर्भ आहे;मराठवाडा १९५६पर्यंत निजामाच्या राज्यात होतं). पण असं घाटाखालचे, मोगलाईतले म्हणून दूर ढकलत दुरावा दाखवला, तरी त्या शेजाऱ्यांचा प्रभाव टाळणं बुलढाण्याच्या वऱ्हाडी लोकांना शक्य झालेलं नाही. भौगोलिकदृष्ट्या जरी हा विदर्भातला जिल्हा असला, तरी घाटाखालच्या लोकांच्या बऱ्याच चालीरीती आणि भाषा खानदेशशी नातं सांगते, तर मोगलाईला लागून असलेल्या बुलढाणा तालुक्यातल्या गावांमधली भाषा, सांस्कृतिक वैशिष्ट्यं मराठवाड्याशी साधर्म्य दाखवतात. मी याच मोगलाईच्या शेजारचा. त्यामुळे माझ्या वर्धेकर मित्रांनी मी वऱ्हाडी नसल्याचं जे निदान केलं ते एका अर्थी बरोबर होतं.

मी वऱ्हाडी नव्हतो, हे तर खरंच होतं. पण मी कोकणी किंवा मुंबईकर देखील नव्हतो. मग मी कोण होतो? आयडेंटिटीचा हा प्रश्न तेव्हापासून मला सोबत करू लागला. कोणत्याही प्रदेशात गेलो तरी परकं ठरवला गेल्यामुळं आलेला उपरेपणा तेव्हापासून बोचू लागला. माझी भाषा कोणासारखी आहे, माझं सांस्कृतिक वर्तन, जाणिवा कोणासारख्या आहेत, कोणत्या प्रदेशाशी, समाजाशी, संस्कृतीशी नातं सांगतात हे मला निश्चित करता येत नाही.

       पुढं लेखन करू लागल्यानंतर साहित्याच्या जगात प्रवेश केला. इथं तर प्रादेशिक, महानगरी, ग्रामीण अशा भेदांचं सोवळं फार. मला आठवतंय, मुंबई विद्यापीठात एम्० ए० करत असताना, कल्याणला राहात असताना, त्या काळात कल्याणहून प्रसिद्ध होणाऱ्या हेमंत दिवटेच्या अभिधा या अनियतकालिकाशी जोडला गेलो. नंतर आपल्याच खिशात अनमान धपक्या पैसे सापडावेत, तसं बुलढाण्याहून निघणाऱ्या शब्दवेधचा शोध लागला. माझंच मूळ गाव असलेल्या बुलढाण्यात रमेश इंगळे, रवींद्र इंगळे, दिनकर मनवर यांना मुंबईहून येऊन परक्यासारखा भेटलो. काही काळाने अभिधा आणि शब्दवेध या दोन्ही अनियतकालिकांच्या कर्त्यांनी असा विचार केला की आपली वाङ्मयीन अभिरुची सारखीच आहे, मतं बरीचशी जुळतात, तर एकदा सर्वांनी एकत्र भेटून साहित्याविषयी संवाद साधायला काय हरकत आहे? त्यानुसार आम्ही १९९९मध्ये वेरुळला मुक्काम करून साहित्यावर, विशेषतः कवितेवर सलग दोन दिवस चर्चा केली. त्याचीच परिणती शब्दवेध'च्या नव्वदोत्तरी कविता विशेषांकात झाली आणि त्यातून २००१मध्ये लोकवाङ्मय गृहातर्फे आजची कविता ही आठ कवितासंग्रहांची मालिका निघाली. पण या पुढच्या गोष्टी.

       वेरुळला मुंबईहून अभिधाचे श्रीधर तिळवे, हेमंत दिवटे, मन्या जोशी, अभिजीत देशपांडे वगैरे आले. बुलढाण्याहून शब्दवेधचे रवींद्र इंगळे, रमेश इंगळे, मनोज पाठक, दिनकर मनवर, प्रकाश नागोलकर, अनंत शिरसाट, जळगावहून मंगेश काळे ही मंडळी आली. मी मात्र अभिधाचा सदस्य असूनही, त्या काळात काही दिवसांसाठी बुलढाण्याला राहात असल्यामुळं, मुंबईहून न येता शब्दवेधच्या मंडळींसोबत वेरुळला आलो. 

       त्या दोन दिवसांच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की शब्दवेधची मंडळी साठोत्तरी पिढीच्याविशेषतः लघुअनियतकालिक चळवळीतल्या साहित्यावर प्रेम करणारी, त्या साहित्याला एकप्रकारे प्रमाण मानणारी होती, तर मुंबईहून आलेली अभिधाची मंडळी आता साठोत्तरीच्या पुढं आपल्याला जायचं आहे म्हणून बाह्या सरसावून बसली होती. या दोन गटांमधली ही सूक्ष्म भेदरेषा त्या दोन दिवसांत मला ठळक झाली आणि प्रश्न पडला, आपण या रेषेच्या कुठल्या अंगाला आहोत?     

       लेखकांच्या प्रत्येक पिढीला आपला स्वतंत्र आवाज शोधावा लागतो, त्यासाठी आधीचं सगळं नाकारावं लागतं, हे मला पटत होतं आणि श्रीधर तिळवे, मन्या जोशी यांच्या विचारांचं  आकर्षण वाटत होतं. पण त्याच वेळी, वेरुळ मुक्कामी मी अधिकतेने शब्दवेधच्या कर्त्यांसोबत वावरत होतो. माझ्याही नकळत त्यांच्याशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांच्या साहित्यविषयक संवेदनेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या या वर्तनाचा आज मला अर्थ असा लागतो : माझी साहित्याविषयीची भूमिका माझ्या मुंबईच्या मित्रांशी मिळतीजुळती होती; पण मला व्यक्तिगत आयुष्यात लहानपणापासून सांस्कृतिकदृष्ट्या ज्या प्रकारची द्विधावस्था, त्रिशंकू अवस्था सहन करावी लागली, कोणत्याही प्रदेशात जगताना जो उपरेपणाचा अनुभव आला, त्यामुळं मी आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःला माझ्या मूळ भूमीशी, तिथल्या लोकांशी, त्यांच्या विचारांशी जोडून घेण्याची धडपड करत होतो असावा. मला आठवतंय की वर्धेला असतानाही मला तिथल्या लोकांनी मुंबईकर म्हणून नव्हे, तर विदर्भवासी (वऱ्हाडी) म्हणून ओळखावं अशी मला आस होती. ती ओळख माझे वर्धेकर मित्र मला नाकारत याचं मला दुःखही होत असे.

       पण यातला विरोधाभास असा की मी स्वतःला कितीही शब्दवेधच्या गोतावळ्याशी जोडून घेण्यासाठी धडपडलो, तरी या गोतावळ्याने वेरुळ भेटीच्या आधीपासून, आणि नंतरही, माझ्याकडे अभिधाच्या गोतावळ्यातला, मुंबईकर म्हणूनच पाहिलं. आणि इकडं मुंबईत एम्० ए० पासून अभिधापर्यंत सोबत असलेला आमचा जिवलग मित्र मन्या जोशी हा परभणीहून आलेल्या अभिजित देशपांडेला आणि चार गावचं पाणी पिऊन आलेल्या मला गावाकडचे समजत होता. त्याच्या दृष्टीने आम्ही दोघं मुंबईकर, महानगरी नव्हतो. आमची संवेदनशीलता, विचार करण्याची पद्धत अमहानगरी होती.

 

 

       आजवरच्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सामाजिक अवकाशात उपराबाहेरचा ठरल्यामुळं की काय, माझ्या आतून मला कुठल्याच प्रदेशाशी, संस्कृतीशी, बोलभाषेशी नाळ जुळलेली असल्याची भावना झाली नाही. वर म्हटल्याप्रमाणे मी तरुणपणात काही काळ कळत नकळत प्रयत्न करून पाहिला, मूळ गावाशी नाळ जोडून पाहण्याचापण तुम्हाला लोकांनी काय म्हणून ओळखावं हे तुमच्या हातात नसतं, असा अनुभव येऊन मी त्या प्रयत्नात अपयशी झालो (आजही मी बुलढाण्याला भाषेच्या, वागण्याच्या कुठल्याच अंगाने स्थानिक वाटत नाही; तिथं माझं राहणं, मित्रांना भेटणं हे पाहुण्यासारखंच असतं. माझ्या आणि त्यांच्या दृष्टीतून). 

       परिणामी सर्व ठिकाणी आजवर मी बाहेरचा, परका म्हणूनच राहात आलोय : आऊटसायडर. हा परकेपणाचा फील कायम माझी सोबत करत आला आहे. याचा परिणाम माझ्या लिखाणावर, भूमिकेवरही झाला आहे. मराठी साहित्यात देशीवादी, ग्रामीण, महानगरी, नव्वदोत्तरी, उत्तराधुनिकवादी अशा कडेकोट तटबंदीच्या गढ्या आहेत. या गढ्यांचे शिलेदार आणि सुभेदारही आहेत. ते हिरीरीने परस्परांशी लढत असतात. या प्रत्येक गढीच्या मुळाशी प्रादेशिक, सांस्कृतिक अस्मितांचा एक थर आहेच. ग्रामीण आणि देशीवादी हे महानगरींच्या दृष्टीतून कालबाह्य काहीतरी खरडणारे गाववाले असतात. तर देशीवाद्यांच्या दृष्टीतून नव्वदोत्तरी आणि उत्तराधुनिकवादी हे  पाश्चात्यांचं केवळ भ्रष्ट अनुकरण करतात. नव्वदोत्तरी हे स्वतःला पूर्वीच्या साठोत्तरीवाल्यांपासून आणि आताच्या देशीवाद्यांपासून वेगळे समजतात. त्यांना आपलं (आणि फक्त आपलंच) नातं उत्तराधुनिकवादाशी आहे असं वाटत असतं. पण या उत्तराधुनिकवादात पर्यावरणवादी, देशीवादी विचाराला स्थान आहे आणि हे विचार ग्रामीणतेशी, देशीवादाशी नातं सांगतात हे त्यांच्या गावीही नसतं. दुसरीकडं, देशीवाद्यांनाही उत्तराधुनिकवाद ही केवळ पाश्चात्य आणि शहरी भानगड वाटते. 

       या गलबल्याकडं मी त्रयस्थपणे पाहतो. कारण या प्रत्येकाच्या तंबूत मी आऊटसायडर असणं अनुभवलेलं असतं. मी मूळचा कोण? कुठला?’ हे प्रश्न आताशा मला पडत नाहीत. कुठलंही नसणं, कशाशीही नाळ जुळलेली नसणं उपभोगायला शिकलो आहे. त्यात एक असीम मोकळेपणाची गोडी आहे असं माझ्या ध्यानात आलं आहे.


(सावंतवाडीहून प्रसिद्ध होणाऱ्या 'वैनतेय' या साप्ताहिकात सुमारे शंभर वर्षांपूर्वी वि. स. खांडेकरांनी सर्वप्रथम लघुनिबंध प्रसिद्ध केले होते. याचे औचित्य साधून सध्याचे 'वैनतेय'चे संपादक प्रवीण बांदेकर यांनी २०२०चा दिवाळी अंक ललित लेख विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला. त्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. )

3 comments:

  1. उत्तम लेख
    मौलिक
    माझ्यासाठी कारण मला माझं असं कुठलं गाव नाही. कल्याणात मला स्थान नाही.
    या शहराचा गावाचा म्हणून.

    ReplyDelete
  2. उत्तम लेख
    मौलिक
    माझ्यासाठी कारण मला माझं असं कुठलं गाव नाही. कल्याणात मला स्थान नाही.
    या शहराचा गावाचा म्हणून.

    ReplyDelete
  3. स्वतःला तपासायला लावणारा लेख आहे हा. अप्रतिम !

    ReplyDelete