Friday 9 October 2015

Everything has become fiction

हा अनुभव योसाच्या अनुभवाच्या नेमका विपरित आहे. त्याच्या देशात कादंबरीवर बंदी होती. इथं आताच्या परिस्थितीत फक्त कादंबरीच लिहिता येईल असं दिसतंय. जे काही लिहायचं, ते केवळ कादंबरीच्याच रूपात. इतिहास, धर्म, विज्ञान, वास्तव या साऱ्या गोष्टी विद्रुप करून मांडल्या जातायत आणि लोकांना त्यावर विश्वास ठेवण्याची, त्याला खरं मानून चालण्याची विकृत घाई झालेली आहे. वास्तव विच्छिन्न करण्याच्या अशा बेताल परिस्थितीत आपला उच्चार टिकवण्याचा एकच मार्ग शिल्लक उरतो : मिथकं, कहाण्या, फिक्शन सांगण्याचा.  

सत्य आणि कल्पिताची सरमिसळ : लॅटिन अमेरिकी कादंबरीचा धडा


सत्य आणि कल्पिताची सरमिसळ : लॅटिन अमेरिकी कादंबरीचा धडा
दक्षिण अमेरिकेतल्या स्पॅनिश वसाहतींमध्ये इन्क्विझिशनच्या काळात कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती. समाजाची नैतिक, राजकीय वर्तणूक आणि स्थानिक इंडियनांची धार्मिक श्रद्धा या दोहोंना कादंबरी या साहित्यप्रकारापासून धोका आहे अशी इन्क्विझिटर्सची समजूत होती. आणि अर्थात, ते बरोबर होते. कोणत्याही समीक्षकाआधी त्या स्पॅनिश इन्क्विझिटर्सना कादंबरीच्या अटळ विध्वंसक प्रवृत्तीचा पत्ता लागला, याबद्दल आम्ही कादंबरीकारांनी त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे. वसाहतींमध्ये कादंबरी वाचणे किंवा प्रकाशित करणे यावर बंदी होती. अर्थात, आमच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालणारी कादंबऱ्यांची तस्करी रोखण्याचा कोणताच उपाय मात्र त्यांच्याकडे नव्हता. उदाहरणार्थ, आपल्याला ठाऊक आहे की दॉन किहोतेच्या (Don Quixote) प्रती पहिल्यांदा वाईनच्या बॅरलमध्ये लपून अमेरिकेत पोहचल्या. त्या काळात स्पॅनिश अमेरिकेत कादंबरी वाचण्याचा अनुभव काय प्रकारचा असेल याबद्दल आपण केवळ हेवावजा स्वप्नंच पाहू शकतो. एका कल्पित जगाच्या अधीन व्हायचं असेल तर तुरुंगवास आणि अवहेलना यांना तोंड देण्याची तयारी हवी! एक पापमूलक धाडस करण्याची तयारी हवी!    
स्वातंत्र्ययुद्धांच्याही नंतरच्या काळापर्यंत स्पॅनिश अमेरिकेत कादंबऱ्या प्रसिद्ध होत नव्हत्या. El Periquillo Sarniento  (खाजणारा पोपट) ही पहिली कादंबरी मेक्सिकोमध्ये १८१६ साली प्रकाशित झाली. मात्र, तब्बल तीन शतकं कादंबरीला हद्दपार करूनही कादंबरीच्या प्रभावापासून मुक्त असा समाज तयार करण्याचं उद्दिष्ट इन्क्विझिटर्सना गाठता आलं नाही. कादंबरीचा प्रदेश कादंबरी या साहित्यप्रकाराहून अधिक विशाल आणि अधिक खोलवर पसरलेला होता याची त्यांना जाणीवच झाली नाही. असत्याची तहान, म्हणजे, आभासाचा वापर करून वस्तुनिष्ठ वास्तवापासून सुटका करून घेण्याची प्रवृत्ती, इतकी प्रबळ आणि मानवी जाणिवेत इतकी खोलवर रुजलेली होती की तिच्या पूर्ततेसाठी कादंबरी वापरता येत नाही हे उमजल्यावर, कल्पनांचं मुक्तपणे वहन करता येण्याजोग्या इतर सगळ्या ज्ञानशाखा आणि साहित्याचे विविध प्रकार यांचा पर्यायी वापर केला जाईल हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. इतिहास, धर्म, कविता, विज्ञान, कला, व्याख्याने, पत्रकारिता, आणि लोकांच्या दैनंदिन सवयी हे सर्व कादंबरीला पर्याय ठरले.  अशाप्रकारे, विशेषतः शहरी अवकाशात स्वतःचं स्थान तयार करण्यासाठी निर्माण झालेल्या या साहित्यप्रकाराचं दमन, निंदा करूनदेखील इन्क्विझिटर्सच्या पदरी त्यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या विपरीतच गोष्टी घडल्या.
आम्ही आजही लॅटिन अमेरिकेत, ज्याचं वर्णन कादंबरीने घेतलेला सूड अशा शब्दांत करता येईल, त्याचे बळी आहोत. आजही आमच्या देशबांधवांना कादंबरी आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यात फरक करणं फार अवघड जातं. परंपरेने आम्ही या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करण्यास सरावलो आहोत. राजकीय बाबींमध्ये आम्ही इतके अव्यवहारी आणि मूर्ख ठरतो यामागे कदाचित हेच कारण असावं. पण आमच्या संपूर्ण आयुष्याच्या अशा कादंबरीकरणामधून काही चांगलंही निष्पन्न झालं आहे. अन्यथा, One Hundred Years of Solitude सारखी कादंबरी, हुलिओ कोर्ताजारच्या (Julio Cortazar) कथा आणि रोआ बास्तोस (Roa Bastos) याच्या कादंबऱ्या यासारखं साहित्य शक्य झालं नसतं.
                                                                                                                                           मारियो वर्हास योसा


(A Writer’s Reality, Mario Vargas Llyosa, Houghton Mifflin Company, Boston, 1991. पृष्ठे 24-25वरील मजकूर सारांशरूपाने.)