Thursday 30 March 2023

धर्मरेषा वितळवणारी हिंदुस्थानी संगीत परंपरा

  बाराव्या-तेराव्या शतकापासून हिंदुस्थानी संगीतात अनेक स्थित्यंतरं झाली. या सर्व स्थित्यंतरांचा उगम, प्रेरणा या पारंपरिक देशी संगीतामध्ये होत्या. ध्रुपद गायकी जाऊन त्या जागी ख्याल गायकी आली, टप्पा आला, नंतर ठुंबरी, कव्वाली आली – हे सर्व गायनप्रकार भारतातल्या निरनिराळ्या प्रांतांतल्या देशी गायनपद्धतीतूनच निर्माण झाले. हिंदुस्थानी गायकीची जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर, किराणा अशी घराणी अस्तित्वात आली. मध्ययुगापासून हिंदुस्थानी गायकीची परंपरा पुढे चालवणारे गायक बव्हंशी मुस्लिम होते. आणि ते जोपासत असलेल्या संगीत-परंपरेत हिंदू धार्मिक परंपरांमधले अनेक घटक मिसळलेले होते. पण त्यांचं मुस्लिम असणं या गायकीच्या कधी आड आलं नाही. आधुनिक काळातल्या ज्या महान गायक-कलावंतांची चरित्रं आज उपलब्ध आहेत, त्यांत या हिंदु-मुस्लिम सांस्कृतिक मिलाफाची काही मनोरम उदाहरणं सापडतात. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले अनेक मुस्लिम गायक हिंदुस्थानी संगीतातल्या हिंदू भक्तिगीतांचा, संगीताचा आविष्कार करताना इथल्या धार्मिक परंपरांशी एकरूप झाले. त्यांच्या चरित्रांमध्ये विखुरलेल्या अशा काही आठवणी इथं नोंदवून ठेवतो आहे. आजच्या धार्मिक अस्मितांच्या ध्रुवीकरणाच्या आत्यंतिक विखारी आणि विषारी उद्रेकाच्या काळात अशा काही आठवणींचे झरे जपून ठेवणं, त्यांना पुन्हा पृष्ठस्तरावर आणणं गरजेचं वाटतं. 

    जयपूर घराण्याचे गायक अल्लादिया खाँ यांना छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आश्रय दिला होता. उत्तर भारतात राजेरजवाड्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या घराण्यांच्या गायकांनी आपापलं बस्तान बसवलं. उपजीविकेच्या शोधात काही गायकांनी दक्षिण दिशा धरली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस त्यापैकी काहींचा पडाव महाराष्ट्रात पडला. अल्लादिया खाँ अशा गायकांपैकी होते. ते सांगत की त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष हिंदू होते. त्यांचं नाव नाथ विश्वंभर. ते संगीतोपासक होते. स्नानसंध्या, पूजाअर्चा, इत्यादींच्या मंत्रांचं पठणही ते रागरागिणीत करत. तानसेन याचे गुरू हरदास हे या नाथ विश्वंभरांचे पूर्वज. या नात्याने अल्लादियां खाँ स्वतःला थेट तानसेनाच्या परंपरेशी जोडून घेत. अल्लादियां खाँ आपलं गोत्र, जात वगैरेही सांगत. गोत्र शांडिल्य आणि जात आद्य गौड ब्राह्मण. तीन प्रवर, अंजनीसूत्र वगैरेंची संध्येमधील संथा त्यांना पिढीजाद परंपरेतून मिळाली. त्यांना वाडवडलांकडून मिळालेल्या गाण्याच्या चिजा ते म्हणत. त्यात शंकर, गणपती, सरस्वती, राम, कृष्ण या देवतांच्या स्तुतीपर रचना होत्या.

    दुसरं उदाहरण ग्वाल्हेरचे निसारहुसेन खाँ यांचं. हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे (वझेबुवा) यांचे गुरू. त्यांची राहणी ब्राह्मणी पद्धतीची असे. ते गळ्यात जानवं घालीत आणि श्रावणातल्या सोमवारचा उपवासही करीत. निसारहुसेन खाँ यांना लहानपणी त्यांच्या घरच्यांनी शास्त्रीपंडित नेमून संस्कृतचंही शिक्षण दिलं होतं. केशवराव भोळे यांनी अस्ताई या पुस्तकात ही माहिती देऊन लिहिलंय की या शिक्षणामुळे त्यांची वाणी शुद्ध व सुसंस्कृत झाली होती. ती इतकी की त्यांचे बोलणे ऐकताना त्यांची जात ओळखणे त्या काळी फार कठीण जाई. निसारहुसेन खाँ यांना भागवतातले संस्कृत श्लोक आणि मोरोपंतांच्या मराठी आर्या पाठ येत होत्या. ते म्हणायचे, मला मागल्या जन्मी गायन शिकण्याची इच्छा झाली म्हणून मी मुसलमानी धर्मात जन्म व घेतला व गाणं शिकलो. आता ती इच्छा पूर्ण झाली. पुढल्या जन्मी मी पुन्हा ब्राह्मणाचा जन्म घेणार आहे. असं म्हणून ते गळ्यातलं जानवं दाखवत.

    तिसरं उदाहरण मूळ त्रिपुराचे असलेल्या उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचं. हे अल्लाउद्दिन खाँ म्हणजे प्रसिद्ध सतारिये अलिअकबर खाँ यांचे वडील आणि पंडित रविशंकर यांचे सासरे. निसारहुसेन खाँ यांच्याप्रमाणे उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचीही राहणी ब्राह्मणी वळणाची होती. १९३६ साली पंडित पलुस्करांचे शिष्य बी. आर. देवधर अलाहाबादला संगीत परिषदेसाठी मुक्कामी होते. सकाळी सात वाजता त्यांना एक ब्राह्मण मनुष्य खांद्यावर पंचा टाकलेला, चालत येताना दिसला. जवळ आल्यावर देवधरांच्या लक्षात आलं की ते अल्लाउद्दिन खाँ आहेत. इतक्या सकाळच्या थंडीत कुठं निघाले असं देवधरांनी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, “आज एकादशी आहे. सुदैवाने मी गंगेच्या काठी आहे, म्हणून गंगास्नानासाठी जात आहे. हे ऐकल्यावर, आपण हिंदू असूनही आपल्याला ना एकादशी आठवली ना गंगा आठवलीम्हणून देवधर शरमले. अल्लाउद्दिन खाँच्या वागण्यात मात्र सहजपणा होता. त्यांच्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या हिंदू परंपरा पाळल्या जात होत्या. आपले पूर्वज वैष्णवपंथी हिंदू होते, आणि नऊ पिढ्यांपूर्वी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असं ते सांगत. त्यांच्या घराण्यात मांसभक्षण वर्ज्य होतं. त्यांचे वडील शिवभक्त होते आणि थोरले भाऊ कालीदेवीचे भक्त होते. हे अल्लाउद्दिन खाँ त्रिपुरामधल्या ज्या शिवपूर नावाच्या गावचे होते, तिथं शंकराचं एक प्रसिद्ध मंदिर होतं. आणि या शंकराच्या यात्रेला हिंदू-मुस्लिम असे दोन्ही धर्माचे लोक मोठ्या संख्येने येत. अशी अनेक ठिकाणं भारतात आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. अल्लाउद्दिन खाँचे वडीलही या शंकराचे निस्सिम भक्त होते.

    किराणा घराण्याचे गायक अब्दुल करीम खाँ यांची जवळजवळ सारी कारकीर्द महाराष्ट्रात गेली. अब्दुल करीम खाँचे शिष्य सवाई गंधर्व आणि त्यांचे शिष्य भीमसेन जोशी. या अब्दुल करीम खाँ यांचा विसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसऱ्या दशकात पुण्या-मुंबईत भरपूर वावर होता. त्यावेळी प्रार्थना समाजाचे डॉ. रा. गो. भांडारकर, कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्याशी त्यांचा संबंध आला. या दोघांनीही अब्दुल करीम खाँ यांना गायत्री मंत्रासह आणखी चारसहा मंत्र शिकवले आणि हे संस्कृत मंत्र रागदारीमध्ये बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अब्दुल करीम खाँ ओम् नमशिवाय’, गायत्री मंत्र वगैरे हिंदू परंपरेतले मंत्र रागामध्ये म्हणून दाखवत असत. भांडारकरांच्या मुलीला गाणे अब्दुल करीम खाँ यांनी शिकवलं. अब्दुल करीम खाँ यांनी पुण्यात निवासी संगीत विद्यालय सुरू केलं. अनेक जातींची मुलं तिथं शिकत. पुण्यातल्या सनातन्यांना याचा तिटकारा असल्याने अब्दुल करीम खाँ यांना तिथून हुसकावून लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा भांडारकर, आपटे यांनी मध्यस्ती करून वाड्याच्या मालकाची समजूत घालून ते विद्यालय चालू राहील असं पाहिलं.

    या गायकांची चरित्र-पुस्तकं आता हळूहळू विस्मृतीत लोटली जात आहेतकाही वर्षांनी ती कुणाच्या नजरेसही पडणार नाहीत. ही चरित्रं वाचलेली माणसंही काळाच्या पडद्याआड जातील. तेव्हा हा दोन धार्मिक परंपरांच्या समन्वयाचा मनोरम इतिहासही अज्ञातात नाहीसा होईल. इथं केलेल्या नोंदी म्हणजे हा इतिहास अज्ञातात गडप होण्यापासून वाचवण्याचा एक क्षीण प्रयत्न.

                                                                           

    

1 comment:

  1. छान आहे लेख.. पण 'फिक्शन' या सदराखाली का?

    ReplyDelete