Tuesday 3 May 2016

शब्द : झोरान झिवकोविच

झोरान झिवकोविच या सर्बीयन लेखकाची कथा : शब्द


प्लुशाल नावाचा गृहस्थ शब्द गोळा करायचा. वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी त्याने आयुष्यात पहिल्यांदा प्रेमकवितांचा एक संग्रह वाचला आणि शब्द गोळा करायला सुरुवात केली. ते एक छोटं कागदी बांधणीचं पुस्तक होतं; मुखपृष्ठावर सुंदर जांभळं फूल असलेलं. पुस्तकाचा वास मात्र या चित्राशी विसंगत होता. बराच काळ जुन्या पुस्तकांच्या दुकानात तळघरात पडून राहिल्यावर  पुस्तकाला अपरिहार्यपणे एक जुनाट कुबट दर्प येतो, तसा त्या पुस्तकाला होता.
प्लुशालने तो कवितासंग्रह खरीदलाही नसता. दर काही दिवसांनी तो पुस्तक-दुकानात जात असला तरी त्याने क्वचितच कधी पुस्तक विकत घेतलं. आणि तो घ्यायचा ती देखील अगदी वेगळ्या प्रकारची पुस्तकं असायची. त्याच्यापाशी प्रामुख्याने हस्तपुस्तिकांचा (Handbooks) एक लहानसा संग्रह होता. उदाहरणार्थ, रोपं कशी वाढवावीत? त्याच्या घरी फुलझाडं मुळीच नव्हती. पण स्वतःला तो या विषयातला जाणकार समजायचा. किंवा मांजरीविषयीची पुस्तकं. मांजरीच्या केसांचं वावडं असल्यामुळे त्याने स्वतः मांजर पाळलेली नव्हती, पण कोणाला गरज असल्यास मांजरपालनाविषयी भरपूर सूचना त्याच्याकडे होत्या. फ्रीजची निगा व दुरुस्ती या विषयावरचीही एक हस्तपुस्तिका त्याच्या संग्रहात होती. खरं तर फ्रीजची त्याला काहीच गरज नव्हती; पण व्यवहारोपयोगी ज्ञानाला तुच्छ लेखणं बरं नव्हे.
मुखपृष्ठावरच्या फुलासाठी प्लुशालने ते पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं. फुलझाडांचा तज्ज्ञ म्हणून त्याला ठाऊक होतं की असं फूल प्रत्यक्षात अस्तित्वात नसतं. पण याच कारणामुळे त्याला ते फूल अधिक भावलं. काहीशा अस्वस्थ मनाने त्याने ते पुस्तक विक्रेत्या मुलीच्या हाती ठेवलं. त्याच्या वयाच्या माणसाने अशा रोमँटिक कवितेत रस दाखवणं शोभत नव्हतं. एखादं अश्लील मासिक खरेदी केल्यासारखं वाटलं त्याला. सुदैवाने विक्रेत्या मुलीने या गोष्टीची जराही दखल घेतली नाही. तिने फक्त पुस्तकाची किंमत पाहिली आणि त्याने दिलेले  नेमके सुटे पैसे घेतले.
प्रेमाविषयी चारदोन गोष्टी त्याला अर्थातच ठाऊक होत्या. त्याही स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून नव्हे. पण त्याची गरज काय होती? बहुतेकांना मूळातच या गोष्टीची जाणीव असते. दुसरं  काय? तरीही त्याने पुस्तक वाचायला घेतल्यावर दुकानात वाटलेली बेचैनी पुन्हा जागी झाली. खरं तर इथं तो एकटाच होता, पण तो लाजला देखील. शेवटी, हा कवितासंग्रह म्हणजे प्रेमविषयक हस्तपुस्तिकाच आहे असा विचार मनात आल्यावर त्याला थोडं मोकळं वाटलं. मग सर्व सोपं आणि मजेदार झालं.
एका गोष्टीचं प्लुशालला नवल वाटलं : त्या कवितांमधल्या हळुवार आणि उदात्त भावनांपेक्षाही त्यांतल्या शब्दांनी तो  अधिक उल्हसित होत होता. आज पहिल्यांदा त्याला जाणवलं की सुंदर शब्द अस्तित्वात असतात. म्हणजे काही खास किंवा दुर्मीळ शब्द नव्हेत. उलट इतर प्रकारच्या पुस्तकांमध्येही आढळणारे साधे शब्द. पण या ना त्या कारणांमुळे हस्तपुस्तिकांमध्ये ते सुंदर वाटत नव्हते. किंवा त्यांचं सौंदर्य त्याच्या नजरेला भावलं नव्हतं.
जसजसं प्लुशाल वाचत गेला, काहीतरी गमावण्याच्या भीतीने त्याला घेरलं. एक पान उलटलं आणि त्यावरचे शब्द मनातून पुसट झाले; त्यांची वाफ झाली. त्यांच्या जागी नवे शब्द आले, पण त्याने समाधान होत नव्हतं. काहीतरी करून आधीचे शब्दही वाचवायला हवे होते. त्यांना नाहीसं होऊ देण्यात अर्थ नव्हता. अर्थातच त्याला पुन्हा मागे, त्या शब्दांकडे जाता येत होतं. पण अशाने ते पुस्तक कधीच वाचून पूर्ण झालं नसतं. दुसरा काहीतरी उपाय हवा होता. आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक कल्पना चमकली. 
कातडी वेष्टनाची मोठ्या आखीव तावांची वही त्याने विकत आणली. सुंदर शब्दांचं संग्रहालय म्हणून शोभून दिसायला   तितक्याच तोलाची गोष्ट हवी. साध्या वहीत हे शब्द कसे लिहिणार? अशाने त्यांच्या पावित्र्याची विटंबना झाली असती. कवितासंग्रहाच्या पहिल्या पानापासून त्याने सुरुवात केली. उघडी वही पुढ्यात ठेवली. सुंदर शब्द आढळताच लगेच झरणीने वहीत नोंदवू लागला. झरणी सोन्याची नव्हती हे खरं; सगळ्याच गोष्टी काटेकोरपणे मनाजोगत्या घडत नसतात.
त्याचं हस्ताक्षर स्वच्छ होतं. नक्षीदार नव्हे, पण प्रमाणबद्ध आणि काहीसं सरळ, थेट. आपल्या परीने सुंदर; सुंदर शब्द लिहिताना त्यांना अधिक ठळक करणारं नव्हे, तर त्यांच्याशी मेळ राखण्यासाठी गरजेचं होतं तितपत. एरवी तो टपोरं अक्षर काढायचा; पण या खेपेला त्याने अक्षर लहान काढलं. सुंदर शब्दांची संख्या किती असेल याचा अदमास नव्हता. वही पुरेशी मोठी असली तरी काळजी घ्यायलाच हवी होती.
कवितासंग्रहातला एकूण एक सुंदर शब्द लिहून होईपर्यंत वहीतल्या शब्दांचं काय झालंय ते पाहण्याचं त्याला धाडस झालं नाही. वहीत त्यांचं सौंदर्य टिकून राहिलं असेल की हस्तपुस्तिकांमधल्या शब्दांप्रमाणे ते नाहीसं झालं असेल? वही थोडी दूर पकडून दाटीवाटीने लिहिलेली चार पानं न्याहाळल्यावर त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. शब्दांमधलं सौंदर्य कायम होतं; किंबहुना काहीसं वाढलंच होतं. वहीत केवळ सुंदर शब्दच नोंदवले गेल्याने असं घडलं असावं. अगदीच कुरूप म्हणता येणार नाहीत, पण विशोभीय वाटतील असे इतर शब्द वहीत नव्हते. ती वही एक संपृक्त सौंदर्यवस्तू बनली होती.
संपूर्ण कवितासंग्रह पाहून झाल्यावर प्लुशालला प्रश्न पडला, आता काय करावं? वहीची थोडीच पानं भरली होती. उरलेली तशीच कोरी सोडायची? सौंदर्याचा लचका तोडल्यासारखं होईल ते. नाही, हे काम पुढं सुरू ठेवलं पाहिजे. सुंदर शब्दांची संख्या कितीतरी मोठी असणार. ते सगळे एकाच जागी असले पाहिजेत. पण त्यांना कुठं शोधायचं?
पहिला विचार त्याच्या मनात आला तो दुसऱ्या प्रेमकविता संग्रहाचा. विचार चुकीचा नव्हता. प्रेमकवितेत सुंदर शब्दांचा होणारा आविष्कार थोरच असतो, याची प्रचिती त्याने घेतली होती. पण हीच पुस्तकं तो सतत विकत घेत राहिला, तर ते लोकांच्या नजरेत येणार. त्याने पाहिलेल्या मुख्य ग्रंथालयातल्या सूचीनुसार अशा प्रकारची तीनशे पस्तीस पुस्तकं होती. दोनतीन पुस्तकांपर्यंत लोक दुर्लक्ष करतील, पण नंतर मात्र नावं ठेवतील. नको. दुसरं काहीतरी करायला पाहिजे. आणि इथं त्याच्या मनात दुसरी कल्पना चमकली.
फक्त प्रेमकवितांच्या संग्रहांमध्येच सुंदर शब्द सापडू शकतील असं कोण म्हणतं? दुसऱ्या प्रकारच्या पुस्तकांमध्येही ते नक्कीच असले पाहिजेत. अगदी हस्तपुस्तिकांमध्येही का नाही? एव्हाना महान सत्याचा साक्षात्कार करवून घेण्यात तो निष्णात झाला होता. सुंदर शब्द सर्वत्र आहेत. खरं कौशल्य पुस्तकं निवडण्यात नसून असे शब्द हेरण्यात आहे. त्यासाठी तशी दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी आपल्याकडे असल्याची चाहूल त्याला लागली होती. पडताळा घेण्याचा एक सोपा मार्ग होता : हाती येईल ती पहिली हस्तपुस्तिका त्याने उघडली. त्याच क्षणी सुंदर शब्दांच्या झोताने त्याचे डोळे दिपले. जणू कोणीतरी ते शब्द चमकदार मार्करने ठळक करून ठेवलेले असावेत.
वही उघडून हे शब्द तिच्यात उतरवून घेण्याची तीव्र इच्छा त्याने कशीबशी आवरली. त्याच्यातल्या विवेकबुद्धीनेच त्याला सावरलं. याचा त्याला रास्त अभिमानही वाटला. माणसाने इतकं उतावळं असू नये. असं उतावळेपण त्याला कुठं घेऊन जाईल? क्षणात सगळा गोंधळ माजेल. आपण खंबीर आणि शिस्तीत राहिलं पाहिजे. एकूण परिस्थितीचा बारकाईने विचार केल्यानंतर, मनात पुन्हा एकदा चमकलेल्या कल्पनेच्या रूपात, त्याच्यासमोर मार्ग स्वतःहूनच दृश्यमान झाला.
वहीतली पहिली चार पानं फाडून टाकावीत आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी, या मनात उगवलेल्या विचाराशी त्याला थोडं झगडावं लागलं. शेवटी त्याने तो विचार सोडून दिला. इतकं महत्त्वाचं नोंदकाम फाटक्या वहीत सुरू करणं शक्य नव्हतं. नवी वही घेणंच योग्य. त्याने एक मोठ्यात मोठी वही निवडली. तिच्यातली एक सुविधा फारच उपयुक्त होती : वाचताना किंवा लिहिताना पानांत घालून ठेवण्याच्या खुणेसाठी एक सोनेरी फीत त्या वहीत होती.
त्या प्रचंड शब्दकोशाचे सोळा अवजड टोलेजंग खंड होते. पहिला खंड त्याने उघडला आणि चमचमत्या सुंदर शब्दांची झुंडच त्याच्या नजरेस पडली. अर्थात पुढे वाढून ठेवलेल्या कामाच्या प्रचंड आवाक्याने तो मुळीच डगमगला नाही. आव्हानाला तोंड देण्याची पूर्ण तयारी त्याने केली होती. त्यात त्याला कोणत्याही सवलती, चोरवाटांची अपेक्षा नव्हती. हे सर्व लिहून काढायला जेवढा म्हणून वेळ हवा होता तेवढा तो देणार होता, थोडाही कमी किंवा अधिक नाही. शेवटी त्याच्यासमोर वाढून ठेवलेलं ते दुःख नव्हतं, आनंद होता. खरंच, सौंदर्याला शब्दबद्ध करण्याहून अधिक आनंददायक आणखी काय असणार?
अखेर, जेव्हा प्लुशाल गृहस्थाचं काम संपत आलं, तेव्हा त्याने वयाची छप्पन्न वर्षं ओलांडली होती. पण त्यामुळे त्याच्या मनातली समाधानाची आणि कृतार्थतेची भावना तीळभरही उणावली नाही. उलट, आपण सौंदर्याचा संग्रह केल्यामुळे आपलं आयुष्य सार्थकी लागलं, असं त्याच्या वयाचे कितीसे लोक म्हणू शकतात? आता फक्त एकच गोष्ट करायची राहिली होती. संपूर्ण भरलेल्या त्या वहीत शेवटच्या पानाच्या तळाशी केवळ दोन शब्द मावतील इतकी जागा शिल्लक होती. शब्द नोंदवायला सुरुवात केल्यापासून प्रथमच त्याचं हस्ताक्षर किंचित हळुवार झालं. पूर्वीइतकंच सरळ, पण कोमल, कारुण्यपूर्ण. अगदी संगीताच्या सुरावटीच्या लिपीप्रमाणं. वहीत प्रवेश करून त्याने वहीचं अखेरचं पृष्ठ आपल्यामागे हलकेच मिटून घेतलं, जडावलेली पापणी मिटावी, तसं.
इंग्रजी अनुवाद : अलिस कॉपल-तोसिक
                                                                                                               
##############