ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं २४ जुलै रोजी अचानक निधन झालं. वयोमानानुसार येणारी आजारपणं असली तरी ते इतक्या झटपट आपल्यातून निघून जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं. गेली सुमारे सहा दशकं सतीश काळसेकर केवळ साहित्यात नव्हे, तर महाराष्ट्राच्या एकंदर सामाजिक-सांस्कृतिक अवकाशात किती महत्त्वाची भूमिका निभावत होते, याची प्रचिती, काळसेकर गेल्यानंतर समाजमाध्यमांवर त्यांच्याप्रति वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या अनेक लोकांकडून जी आदरांजली वाहण्यात आली, त्यांच्या आठवणी जागवण्यात आल्या, त्यावरून दिसून येते.
सतीश काळसेकर यांच्या अनेक ‘ओळखी’ होत्या : लघुनियतकालिक चळवळीतले कवी-कार्यकर्ते, पुस्तकवेडे आणि पर्यटनवेडे, साहित्याचे भाष्यकार,नव्या लेखक-कवींचं साहित्य शोधून प्रसिद्ध करणारे प्रकाशक, ट्रेड युनियनचे नेते, संपादक इत्यादी. ‘कवी काय काम करतो’ अशा मथळ्याचा दिलीप चित्र्यांचा लेख, कवीच्या कवितालेखनाविषयी आहे. पण एक कविता लेखन सोडून एखादा कवी काय काय करू शकतो याचं सतीश काळसेकर हे एक जितंजागतं उदाहरण होतं. आयुष्य रसरसून कसं जगावं हे या कॉम्रेडकडून शिकण्यासारखं होतंच, पण त्याशिवाय लेखनाव्यतिरिक्त अंगावर पडलेल्या इतर जबाबदाऱ्यांच्या निमित्ताने व्यवस्थेत शक्य तिथं हस्तक्षेप करत, तिला आपल्या भूमिकेला सुसंगत असं वळण देण्याचा प्रयत्न अथकपणे करणं – हे काळसेकरांचं खास वैशिष्ट्य होतं. त्यामुळं लघुनियतकालिकांची चळवळ संपली, तरी काळसेकरांच्या आयुष्यातली चळवळ संपली नव्हती. किंबहुना, काळसेकरांचं आयुष्य हीच एक चळवळ होती. प्रगतिशील लेखक संघ, लोकवाङ्मय गृह, महाराष्ट्र फाउण्डेशन इत्यादी संस्थांमधलं काळसेकरांचं काम पाहिलं तर ही बाब प्रकर्षाने ध्यानात येते.
सतीश काळसेकरांची सर्वात ठळक ओळख लघुनियतकालिक चळवळीशी निगडीत आहे. त्यांचा लघुनियतकालिक चळवळीशी संबंध १९६४च्या सुमारास, वयाच्या २१व्या वर्षी आला. तेव्हा काळसेकर भवन्स कॉलेजमध्ये शिकत होते. ताडदेवचं समाजवादी विचारांचं जनता केंद्र आणि दादरचं कम्युनिस्ट विचारांचं जागृती मंडळ या दोन संस्थांमध्ये प्रारंभीच्या काळात काळसेकरांची वैचारिक जडणघडण झाली. जागृती मंडळात तारा रेड्डी, जी. एल्. रेड्डी यांच्या भोवती गोळा झालेले शशि प्रधान, नंदा प्रधान, श्याम मोकाशी, अरुण खोपकर, प्रदीप वर्मा, पुष्पा त्रिलोकेकर यांच्यासारखे तरुण नवं काहीतरी करण्याची उमेद बाळगून होते. ‘भारूड’ हे द्वैमासिक जागृती मंडळातर्फे १९६४-६५मध्ये चालवलं जायचं. या मासिकाच्या १९६५मधल्या कथास्पर्धेत सतीश काळसेकरांनी लिहिलेल्या कथेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्यापूर्वी त्यांचं लेखन ‘नवाकाळ’, ‘मराठा’ या पत्रांमध्ये छापून येत होतं.
१९५९मध्ये कोकणातल्या मालवणजवळच्या काळसे या छोट्याशा गावातून मुंबईत महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेल्या या मुलाला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं. पण आर्थिक ओढगस्तीमुळे हे महागडं शिक्षण घेणं आपल्याला शक्य होणार नाही, हे त्याच्या लवकरच ध्यानात आलं, आणि त्याने भवन्स कॉलेजमध्ये कलाशाखेत प्रवेश घेतला. जयवंत दळवी यांचे काका वि. वि. दळवी हे इथं उपप्राचार्य होते. ‘माझे रामायण’कर्ते दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांचा मुलगा वैनतेय तुळजापूरकर हे त्यांना इंग्रजी शिकवत असत. काळसेकर भवन्समध्ये शिकत असतानाच त्यांची मैत्री सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वसंत गुर्जर आणि राजा ढाले यांच्याशी झाली.
मुंबईत लघुनियतकालिकांची चळवळ १९६०पासूनच सुरू झाली होती. अशोक शहाणे यांनी त्यांच्या मित्रांसह संपादित केलेल्या ‘शब्द’ आणि ‘अथर्व’चे अंक, ‘साप्ताहिक मनोहर’मधला मराठी साहित्यावर क्ष किरण टाकणारा प्रक्षोभक लेख यांनी मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली होती. या साऱ्याचा प्रभाव सतीश काळसेकर, राजा ढाले, वसंत गुर्जर अशा तरुणांवर पडला, आणि १९६४पासून लघुनियतकालिकांची चळवळ अधिक विस्तारली.
१९६४च्या सुमारास मुंबईत लघुनियतकालिक चळवळीची दुसरी लाट आली. ‘आत्ता’, ‘भारूड’, ‘हेमा’ ही लघुनियतकालिकं १९६४मध्ये निघाली. १९६७ ते ७० या काळात ‘फक्त’, ‘चक्रवर्ती’, ‘तापसी’ ही लघुनियतकालिकं निघाली. सतीश काळसेकरांसह राजा ढाले, अरुण खोपकर, वसंत गुर्जर, तुळसी परब,चंद्रकांत खोत, नामदेव ढसाळ, नारायण बांदेकर या लेखकांचा यात समावेश होता.
लघुनियतकालिकांच्या या दुसऱ्या लाटेची दोन वैशिष्ट्यं सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य – त्या काळात काळसेकर आणि त्यांच्या मित्रांवर ज्या मार्क्सवादी, आंबेडकरवादी (दलित) जाणिवांचे संस्कार होत होते, त्या जाणिवा लघुनियतकालिकाच्या या दुसऱ्या लाटेतून व्यक्त होऊ लागल्या. त्यामुळे लघुनियतकालिक चळवळीचं बंड हे केवळ वाङ्मयीन परिघात मर्यादित न राहता, तिला राजकीय-सामाजिक आयाम मिळाला. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांच्या ‘आवाजां’ना त्यात प्रतिनिधित्व मिळू लागल्याने या चळवळीचा अधिक विस्तार झाला. पुढे ‘मागोवा’सारखी निखळ राजकीय विचार मांडणारी लघुनियतकालिकं यातून सुरू झाली.
दुसरं वैशिष्ट्य – लघुनियतकालिकांची चळवळ ही जगभर प्रामुख्याने महानगरी-शहरी चळवळ राहिली. परंतु १९६५नंतर महाराष्ट्रात औरंगाबाद, अमरावती,पुणे अशा त्या काळातल्या निमशहरांमधूनही लघुनियतकालिकं प्रसिद्ध होऊ लागली. यामुळं या चळवळीचं विकेंद्रीकरण झालं. भौगोलिकदृष्ट्या महानगराबाहेरच्या निमशहरी-ग्रामीण भागातल्या लिहित्या लेखकांना व्यक्त होण्याचं माध्यम उपलब्ध झालं.
लघुनियतकालिकांच्या या विस्तारशील काळात सतीश काळसेकर हे या चळवळीतलं महत्त्वाचं नाव होतं. काळसेकरांची या चळवळीतली भूमिका समन्वयाची, संवादाची होती. ते विचाराने डावे होते, आणि त्या विचाराच्या दृष्टीतून साहित्याविषयीची भूमिका लिखाणामधून ठामपणे मांडत होते, हे तर खरंच. परंतु त्याचबरोबर लघुनियतकालिक चळवळी-अंतर्गत या काळात वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये जो संघर्ष निर्माण झाला, त्यात त्यांनी संवादाची भूमिका घेतली. प्रस्थापित व्यवस्थेला विरोध हेच या चळवळीतल्या वेगवेगळ्या प्रवाहांचं अंतिम उद्दिष्ट होतं. त्या दृष्टीने त्यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न काळसेकरांनी केला. १९६८ आणि १९६९ या वर्षांत प्रसिद्ध झालेल्या अनुक्रमे ‘तापसी’ (काळसेकरांनी संपादित केलेला केवळ एकच अंक प्रसिद्ध झाला) आणि ‘चक्रवर्ती’ (राजा ढाले यांच्यासह संपादन) या लघुनियतकालिकांमध्ये काळसेकरांची ही भूमिका दिसून येते.
पण असा समन्वय साधण्याची, संवादी भूमिका काळसेकर घेत असले, तरी त्यात त्यांच्या वैचारिक भूमिकेशी कोणतीही तडजोड नव्हती. डाव्या विचाराची दृष्टी बाळगून त्यांनी सातत्याने साहित्यव्यवहारात हस्तक्षेप केला. त्यामुळे त्यांना संवाद किंवा समन्वय साधायचा होता, तो परिवर्तनवादी विचारांच्या विविध प्रवाहांमध्येच. या प्रवाहांबाहेरचे, पुनरुज्जीवनवादी किंवा प्रस्थापित अशा व्यवस्थांशी काळसेकरांनी कधीही हातमिळवणी केली नाही. म्हणूनच कोणतंही काम करताना ते एक कार्यकर्ता म्हणून, चळवळीसारखंच त्यांनी केलं. त्यांची बांधिलकी कायम परीघावरच्या संस्थांशी, व्यक्तींशी राहिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक प्रस्थापित संस्थान बनून राहिल्यानंतर काळसेकर त्याला पर्यायी म्हणून महाराष्ट्रात वेळोवेळी उभ्या राहिलेल्या, पर्यायी साहित्य संमेलन,सकल साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन अशा उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले. प्रगतिशील लेखक संघ हिंदीमध्ये अतिशय प्रभावी कार्य करत होता. महाराष्ट्रात प्रगतिशील लेखक संघाचं काम शहराबाहेर ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी, नवनवे लेखक त्याला जोडून घेण्यासाठी काळसेकरांची शोधक दृष्टी सातत्याने जागृत राहिली.
अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउण्डेशन या संस्थेने मराठी साहित्य पुरस्कार सुरू केल्यानंतर अल्पावधीतच या पुरस्कारांनी महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेचं स्थान मिळवलं. पुरोगामी विचारांची व्यापक चौकट स्वीकारून ही पुरस्कार योजना सुरू झाली होती. या पुरस्कार समितीचे निमंत्रक म्हणून सतीश काळसेकर यांनी २००३पासून पुढं काही वर्षं काम पाहिलं. मराठीतले महादेव मोरेंसारखे मौलिक लेखन करूनही दुर्लक्षित राहिलेले लेखक या पुरस्कारासाठी विचारात घेतले जावेत,यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अजीम नवाज राही याच्यासारख्या ग्रामीण भागातल्या कवीच्या कवितांना पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस केली. परिणामी मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेरच्या अनेक लेखकांना महाराष्ट्र फाउण्डेशनचा सन्मान मिळू शकला. काळसेकरांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र फाउण्डेशनने मराठीतल्या नियत-अनियतकालिकांसाठी पुरस्कार सुरू केले होते. ही कल्पना सतीश काळसेकरांचीच. ध्येयाने पछाडलेल्या तरुणांनी चालवलेल्या छोट्या नियतकालिकांना पुरस्कार देऊन त्यांचं कार्य आणि महत्त्व समाजाच्या नजरेस आणून देण्याचा तो प्रयत्न होता.
नारायण सुर्वे, सदा कऱ्हाडे, सुधाकर बोरकर यांच्यासोबत सतीश काळसेकरांनी देखील लोकवाङ्मय गृहाचं काम पाहायला सुरुवात केली. आज मागं वळून पाहताना या संस्थेमध्ये काळसेकरांनी उमटवलेला कामाचा ठसा स्पष्ट दिसतो. सुरुवातीला काळसेकरांनी पीपल्स बुक हाऊस या फोर्ट परिसरातल्या पुस्तकांच्या दुकानाच्या उभारणीत लक्ष घातलं. काळसेकरांचं ग्रंथप्रेम आणि चौफेर वाचन इथं उपयोगी पडलं. मराठीसोबतच इंग्रजी आणि मुख्यतः हिंदी भाषेतली निवडक पुस्तकं वेचून ती इथं विक्रीसाठी ठेवली जाऊ लागली. त्यातून, इतर पुस्तक-दुकानांमधल्या लोकप्रिय साहित्याच्या गर्दीत स्थान मिळणं शक्य नव्हतं, असे अनेक परिवर्तनवादी-डाव्या विचारांची पुस्तकं मुंबईकर वाचकांना सहजपणे उपलब्ध होऊ लागली. छोटे छोटे प्रकाशक शोधून, मुंबई विद्यापीठ, मराठी संशोधन मंडळ,विदर्भ संशोधन मंडळ यांसारख्या संस्थांनी प्रसिद्ध केलेली आणि विक्रीविना पडून राहिलेली पुस्तकं धुंडाळून – प्रसंगी अशा पुस्तकांचे गठ्ठे स्वतः खांद्यावर वाहून – त्यांनी पीपल्स बुक हाऊस हे ‘हट-के’ पुस्तकांचं केंद्र बनवलं. इथं चोखंदळ वाचकाला आणि नव्याच्या शोधात असलेल्या वाचकाला हवं ते मिळत असे. मुंबई विद्यापीठाच्या गोदामातले जवळजवळ लगदा झालेले र. पं. कंगले भाषांतरित ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’चे खंड त्यांनी स्वतः स्वच्छ करून, ठीकठाक करून वाचकांना उपलब्ध करून दिले; गौरी देशपांड्यांनी भाषांतरित केलेले अरेबियन नाईट्सचे खंड, धर्मानंद कोसंबी यांचं ‘निवेदन’ हे आत्मकथन, अ. का. प्रियोळकर गौरव ग्रंथ अशा वाचकांना फारशा माहीत नसलेल्या कितीतरी पुस्तकांच्या शोध घेऊन ती त्यांनी पीपल्स बुक हाऊसमध्ये विक्रीसाठी ठेवली. हिंदीमध्ये साहित्य-संस्कृतीविषयीची अनेक नियतकालिकं निघतात. पैकी बहुतेक महत्त्वाची नियतकालिकं हमखास मिळणारं मुंबईतलं एकमेव केंद्र म्हणजे पीपल्स बुक हाऊस, हे आजही वाचकांना ठाऊक आहे. ही नियतकालिकं मागवून ती विक्रीसाठी ठेवण्याचा उपक्रम काळसेकरांनीच सुरू केला. या छोट्याशा दुकानाच्या मोकळ्या जागेत संध्याकाळी छोटे वाङ्मयीन चर्चांचे, कवितावाचनाचे, पुस्तकप्रकाशनाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. आज दक्षिण मुंबईतल्या इंग्रजी पुस्तक दुकानांत असे कार्यक्रम नेहमीच होत असतात. पण पीपल्स बुक हाऊस या मराठी पुस्तकांच्या दुकानात काळसेकरांनी हे तीस वर्षांपूर्वी केलं.
वीस वर्षांपूर्वी काळसेकरांनी लोकवाङ्मय गृहाचं संपादकीय काम पाहायला सुरुवात केली. ‘वाङ्मयवृत्त’ ही मासिक पत्रिका लोकवाङ्मय गृहाचं हाऊस जर्नल आहे. या आठ पानांच्या मासिकाचं स्वरूप काळसेकरांनी असं काही पालटून टाकलं की तेवढ्या लहानशा जागेत छापलेल्या मजकुराने वाचकांचं समाधान होईना; वाचकांच्या आग्रहावरून मासिकाची पृष्ठसंख्या वाढवावी लागण्याचं अलीकडच्या काळातलं हे एकमेव उदाहरण असावं. प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांनी ‘वाङ्मयवृत्त’च्या पानांची संख्या आठवरून सोळा केली, आणि मजकूर अधिक असल्यास त्याहूनही अधिक पानं या मासिकात छापली जाऊ लागली. २००२ पासून पुढची चौदा-पंधरा वर्षं महाराष्ट्रातले चोखंदळ वाचक, लेखक आणि नव्याने लिहू-वाचू लागलेले ग्रामीण-अर्धनागर भागातले लोक अशा दोन्ही प्रकारच्या वर्गांत ‘वाङ्मयवृत्त’ने विलक्षण लोकप्रियता मिळवली होती, याचा अनुभव या मासिकात लिहिणाऱ्या लेखकांनीही घेतला आहे. मराठीतल्या पहिल्या फळीतल्या दैनिकांच्या पुरवण्यांत लिहिल्यानंतरही जेवढ्या प्रतिक्रिया आल्या नसतील, तेवढ्या प्रतिक्रिया, फोन ‘वाङ्मयवृत्त’मध्ये लेख प्रसिद्ध झाल्यानंतर येतात, असा अनुभव या मासिकात लिहिणाऱ्या अनेक लेखकांनी घेतला आहे. ही सतीश काळसेकर यांच्या संपादकनकौशल्याला मिळालेली दाद आहे. स्वतः काळसेकरांनी ‘वाङ्मयवृत्त’मध्ये दरमहा ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे सदर नियमितपणे लिहिलं. काळसेकरांचं ग्रंथप्रेम सर्वज्ञात आहे. त्यांच्यासारख्या जाणकार आणि चौफेर वाचकाला मराठी-हिंदी-इंग्रजी भाषेतली भावलेली नवनवी पुस्तकं, त्यांच्या निमित्ताने आधीच्या पुस्तकांच्या, लेखकांच्या जागवलेल्या आठवणी, स्वतःच्या पुस्तकप्रवासातल्या पुस्तकं मिळवण्याच्या, त्यांचं जतन करण्याच्या गोष्टी, क्वचित चित्रपट, संगीत इत्यादी कलांमधले नेमके संदर्भ – यांनी ही रोजनिशी गजबजलेली असे. महाराष्ट्रभराच्या कानाकोपऱ्यातले तरुण पिढीतले वाचक या रोजनिशीची आतुरतेने वाट पाहात आणि तिची वाट पुसत स्वतःचं वाचन वाढवत,अशा आठवणी काळसेकरांच्या निधनानंतर कित्येकांनी समाजमाध्यमांवर सांगितल्या आहेत. या रोजनिशीचं ग्रंथरूप पुढं लोकवाङ्मय गृहाने प्रसिद्ध केलं आणि त्याला साहित्य अकादेमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळाला हा नंतरचा इतिहास आहे.
लोकवाङ्मय गृहाने २००१पासून प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांच्या यादीवरून नजर फिरवली तर या संस्थेने किती वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लेखकांचं वैविध्यपूर्ण साहित्य वाचकांसमोर ठेवलं हे ध्यानात येईल. यामागे सतीश काळसेकर, प्रकाश विश्वासराव यांची दृष्टी होती. गोविंद पानसरे यांचा या दोघांवरही विश्वास होता आणि त्यामुळेच अल्पावधीतच ‘भाकपची सांस्कृतिक शाखा’ असलेल्या लोकवाङ्मय गृहाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अव्वल आणि सर्वोच्च स्थान प्रस्थापित केलं होतं. भालचंद्र नेमाडे, गो. मा. पवार, अशोक केळकर, वसंत पळशीकर, मे. पुं. रेगे, राम बापट, रंगनाथ पठारे, दिलीप चित्रे, दि. के. बेडेकर, भाऊ पाध्ये, राजा ढाले, अशोक शहाणे, वसंत आबाजी डहाके, भालचंद्र मुणगेकर, नीरज हातेकर, सुधीर पानसे, दिनानाथ मनोहर, अरुण काळे, भुजंग मेश्राम – असे विविध प्रवाहातले बहुतेक सगळे महत्त्वाचे लेखक लोकवाङ्मय गृहाशी या काळात जोडले गेले.
महाराष्ट्र फाउण्डेशन, प्रगतिशील लेखक संघ आणि इतर निमित्ताने सतीश काळसेकरांची महाराष्ट्रभर भटकंती सुरूच असायची आणि अशा प्रत्येक फेरीत त्या त्या प्रदेशातले नवे चांगले लिहिणारे लेखक कोण आहेत, याचा शोध त्यांची शोधक दृष्टी घ्यायची. त्यामुळेच कोकणातल्या प्रवीण बांदेकर, वीरधवल परब,अजय कांडर यांच्यापासून विदर्भातल्या रामराव झुंजारे, अशोक पवार यांच्यापर्यंत अनेक नव्या लेखक-कवींचं साहित्य लोकवाङ्मय गृहासाठी काळसेकरांनी मिळवलं. अनेकांना त्यांनी लिहितं केलं; अनेकांच्या लेखनाचं मोल जाणून ते रचनेत कच्चं वाटलं तर त्याला वेळ देऊन ते वारंवार पुनर्लिखित करण्यासाठी लेखकांचा पाठपुरावा करून त्यांनी ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केलंच.
सतीश काळसेकरांच्यामधला कॉम्रेड हा अखेरपर्यंत काम करत होता. परिवर्तनवादी विचारांनी भारलेल्या अनेक प्रवाहांशी, अनेक पिढ्यांशी अखेरपर्यंत त्यांचा संवाद कायम राहिला. म्हणूनच गेल्या पन्नास वर्षांतल्या महाराष्ट्राच्या वाङ्मयीन संस्कृतीवर ज्यांनी आपला ठसा उमटवला, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये सतीश काळसेकरांची गणना करावी लागेल. काळसेकरांच्या लेखनापेक्षाही त्यांनी केलेल्या वरील कार्याचं मोल त्या दृष्टीने मोठं आहे. याची प्रचिती येणाऱ्या काळात हळूहळू, पण प्रकर्षाने येईल अशी सध्या भोवतालची परिस्थिती आहे.
(साप्ताहिक युगांतर, ५ ते ११ ऑगस्ट २०२१)
-----