Thursday 13 May 2021

मराठी कवितेतली क्रांती, जर्मन तंत्रज्ञान आणि आपलं इतिहास-भान


मराठी कवितेत केशवसुतांनी पहिली क्रांती घडवून आणली खरी, पण या क्रांतीला जर्मन तंत्रज्ञानाचाही मोठा हातभार लागला होता. कवितेत,साहित्यात होणाऱ्या क्रांतीचा तंत्रज्ञानाशीही संबंध असतो. वाङ्मयीन संस्कृतीच्या इतिहासात तंत्रज्ञानाचा असलेला वाटाही लक्षात घ्यावा लागतो. आज ही गोष्ट प्रकर्षाने जाणवण्याचं कारण म्हणजे जुनी वर्तमानपत्रं चाळताना अचानक हाती आलेली दै. दिव्य मराठीच्या १६ फेब्रुवारी २०२०च्या अंकातली जळगावातला १३५ वर्षं जुना छापखाना बंद होणार असल्याची एक बातमी. ज्या काळात मुंबई-पुण्याबाहेर महाराष्ट्रात अन्यत्र कुठल्या शहरात छापखाने जवळजवळ नव्हते, त्या काळात, १८८०मध्ये नारायण नरसिंह फडणीस (मराठी साहित्यात ज्यांची नाना फडणीस म्हणून नोंद आहे -) यांनी जळगावात नवा छापखाना सुरू करण्याचं स्वप्नं पाहिलं. त्यासाठी जर्मनी, लंडन येथून यंत्रसामुग्री मागवली. स्टीम छपाई यंत्र जर्मनीहून आणलं आणि जळगावमध्ये बाबजी स्टीम प्रिंटिंग प्रेस’ सुरू केला. या प्रेसमधूनच १८८७पासून पुढं काव्यरत्नावलि हे केवळ कवितेला वाहिलेलं मासिक बाहेर पडलं. नाना फडणीसांनी खपाची, आर्थिक नुकसानीची तमा न बाळगता या मासिकातून मराठीत नव्याने लिहिल्या जाऊ लागलेल्या रोमँटिक कवितांचा प्रसार सातत्याने अर्धशतकभर केला. मराठीत रोमँटिक कवितेचा प्रवाह रुजवून क्रांती घडवण्याचं श्रेय केशवसुतांच्या कवितेला जसं आहे, तसंच ही कविता वाचकांपर्यंत निष्ठेने पोहोचवणाऱ्या काव्यरत्नावलिलाही दिलं पाहिजे.   





पद्यपंक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे असं म्हणत त्या तरफेच्या जोरावर जग उलथवून टाकण्याची आकांक्षा केशवसुतांनी मराठी कवितेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दाखवली. पण ही आकांक्षा काही आभाळातून अचानक टपकली नव्हती किंवा केशवसुतांनी जन्मतः आपल्या सोबत आणलेली नव्हती. केशवसुतांसारख्या साध्या शाळामास्तर असलेल्या कवीच्या मनात अशा दुर्दम्य आकांक्षेचे कोंभ फुटले ते सभोवतालच्या पर्यावरणात शतकभरापासून चालू असलेल्या उलथापालथींच्या परिणामांतून. नाना फडणीसांची आधुनिक प्रिंटिंग प्रेस सुरू करण्याची आकांक्षा आणि केशवसुतांची आधुनिक सामाजिक मूल्यं रुजवण्याची आकांक्षा यांचा उगम एकाच परिस्थितीतून झाला.

मराठी आधुनिक साहित्य – कविता, कादंबऱ्या – हे इंग्रज समाजाशी झालेल्या संस्कृति- संपर्कातून उदयाला आलेलं आहे असं म्हटलं जातं. या संस्कृति-संपर्काच्या प्रक्रियेतून केशवसुत, ह. ना. आपटे, रानडे इत्यादींनी जशी नवी सामाजिक मूल्यं, इहवादी दृष्टिकोन वगैरे आत्मसात केली, तशीच काही लोकांना नवं वैज्ञानिक तंत्रज्ञान खुणावू लागलं. भारतात रेल्वे आणण्याचं श्रेय इंग्रजांना असलं, तरी इंग्लंडमध्येही त्या काळात नव्यानेच सुरू झालेली रेल्वे वाहतूक आपल्याही देशात सुरू व्हावी यासाठी कंपनी स्थापन करण्याची धडपड, मदत मिळण्यासाठी इंग्रज सरकारकडे पाठपुरावा हे सर्व सर्वप्रथम नाना शंकरशेट आणि त्यांच्या समकालीन मुंबईकरांनी केलं होतं. इंग्रज कारागिरांच्या हाताखाली छपाईचे खिळे तयार करण्याचं आणि प्रत्यक्ष छपाईचं शिक्षण घेतल्यानंतर स्वतः छापखाने उभारून आपल्या मनाजोगती पुस्तकं प्रसिद्ध करण्याची स्वप्नं हाती भांडवलाचं पाठबळ नसताना गणपत कृष्णाजी पाटील, निर्णयसागरचे जावजी दादाजी चौधरी, राणूजी आरू यांनी पाहिलं आणि प्रत्यक्षात उतरवलंही. इतकंच नव्हे, तर निर्णयसागरने जगभरच्या इंडॉलॉजीस्टना संशोधनासाठी हवे असणारे संस्कृत ग्रंथ सुबक वळणदार देवनागरी टंकांमध्ये उपलब्ध करून दिले. एकप्रकारे भारतविद्येच्या जागतिक पातळीवरच्या अभ्यासाला हातभार लावला. या छापखान्यांमध्ये छापली जाणारी पुस्तकं आणि नियतकालिकं नव्या विचारांचे प्रसारक होते. पण हे नवे विचार गावोगावच्या वाचकांपर्यंत वाहून नेणारी भौतिक यंत्रणा आवश्यक होती. रेल्वे वाहतुकीचं दिवसेंदिवस विस्तारणारं जाळं आणि त्याच्या आधाराने इंग्रजांनी स्थापन केलेली टपाल यंत्रणा यामुळं ही मासिकं, त्यांतले नव-विचार वाचकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. 

या आजच्या चिंतनाचं निमित्त आहे जळगावची बाबजी प्रिंटिंग प्रेस. बातमीत म्हटलंय की गेली १३५ वर्षं अव्याहतपणे सुरू असलेली ही प्रिंटिंग प्रेस आता बंद होणार आहे. नाना फडणीसांच्या वंशजांनी तसा निर्णय घेतला आहे. गणपत कृष्णाजी, निर्णयसागर हे छापखाने तर केव्हाच इतिहासजमा झाले. त्यांच्या अस्तित्वाची एखादी खूणही शिल्लक राहिली नाही. याची खंतही कुठं व्यक्त झाली नाही. या पार्श्वभूमीवर फडणीस कुटुंबाने घेतलेला एक निर्णय त्यांच्या जाणतेपणाचा द्योतक आहे. प्रेस बंद करताना, प्रेसमधलं पहिलं, नाना फडणीसांनी जर्मनीहून मागवलेलं स्टीम प्रिंटिंग मशीन त्यांच्या वारसांनी कुठल्यातरी वस्तुसंग्रहालयाला भेट द्यायचं ठरवलं आहे. बातमी एक वर्षापूर्वीची आहे. माझ्या नजरेला ती आत्ता पडली आहे. फडणीस कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं त्यांना शक्य झालं काय याची खातरजमा करणं आवश्यक आहे. परंतु या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूचं जतन करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय नक्कीच दखल घेण्याजोगा आहे. 

खरं म्हणजे बाबजी प्रिंटिंग प्रेसमधलं हे स्टीम मशीन मराठी साहित्याच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे एखाद्या विद्यापीठाच्या मराठी विभागाने, मोठ्या ग्रंथालयाने किंवा साहित्य महामंडळाने हे मशीन ताब्यात घेऊन त्याचं जतन करायला हवं. काव्यरत्नावलि याच मशीनवर छापलं जात होतं. केशवसुत आणि त्यांच्या संप्रदायातल्या कवींच्या कविता या मासिकातूनच सर्वाधिक प्रमाणात छापल्या गेल्या. जुन्या विचाराचे मराठी समीक्षक त्या काळात केशवसुत आणि त्यांच्या संप्रदायातल्या इतर कवींच्या कवितेवर टीका करत असताना, आणि आर्थिकदृष्ट्या आतबट्टयाचं ठरत असतानाही पन्नासेक वर्षं हे मासिक निष्ठेनं चालवणं म्हणजे साधी गोष्ट नव्हे. नाना फडणीस हे स्वतः कवितेचे उत्तम जाणकार होते आणि मराठी कवितेचा हा नवा आविष्कार त्यांना वाचकांसमोर सातत्याने येणं निकडीचं वाटत होतं. त्यामुळेच निष्ठापूर्वक काव्यरत्नावलिचं प्रकाशन ते करू शकले. या मासिकाच्या ऐतिहासिक कर्तृत्वाच्या काही ठळक नोंदी करता येतील – 

१)    १८८७ ते १९३५ एवढा दीर्घकाळ हे मासिक नियमितपणे प्रसिद्ध झालं.

२)     केशवसुतांची पहिली आणि अखेरची कविता काव्यरत्नावलीमध्ये प्रसिद्ध झाली. काव्यरत्नावलि ऑक्टोबर १८८८च्या अंकात जास्वंदीचीं मुलें व पारिजातकाचीं फुलें ही कविता कोणी एक कवी या टोपणनावाने छापून आली. ही केशवसुतांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. केशवसुतांनी लिहिलेली अखेरची कविता हरपलें श्रेय. ही काव्यरत्नावलीच्याच जून १९०५च्या अंकात प्रसिद्ध झाली. केशवसुत त्यांच्या हयातीत फारसे वाचले गेले नाहीत, दुर्लक्षित राहिले. महान कवी म्हणून त्यांची चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मृत्यूच्या एकदीड दशकानंतर. पण त्यांच्या हयातीत त्यांच्या कवितेला निष्ठेने साथ दिली ती नाना फडणीसांच्या काव्यरत्नावलिने. १८९७मध्ये खानदेशातल्या भडगाव इथं केशवसुत शिक्षक म्हणून गेल्यावर त्यांचा आणि नाना फडणीसांचा निकटचा संबंध आला. या कवीच्या कवितेतलं क्रांतिकारकत्व ओळखून त्यांच्या अनेक कविता फडणीसांनी इथून पुढं प्रसिद्ध केल्या.

३)    केशवसुत या नावासह केशवसुतांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता – प्रणयकथन ही  काव्यरत्नावलिच्या ऑगस्ट १८९८च्या अंकात आहे. काही लोक सतारीचे बोल ही मासिक मनोरंजनच्या फेब्रुवारी १९०० अंकात आलेली कविता केशवसुत या नावाने छापलेली पहिली कविता आहे असं मानतात, त्यापूर्वीची ही कविता. त्यामुळे केशवसुत हे नाव रूढ करण्याचं श्रेयही काव्यरत्नावलिचंच.  

४)     केशवसुतांपासून माधव ज्यूलियन यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांमधल्या (पहिली केशवसुतांची, दुसरी गोविंदाग्रजांची आणि तिसरी रविकिरण मंडळ व त्यांच्या समकालीन कवींची–) सर्व आघाडीच्या कवींचा काव्यरत्नावलीशी जवळचा संबंध राहिला. केशवसुत, रे. टिळक, विनायक, दत्त, बी, चंद्रशेखर, माधवानुज, अनंततनय, गोविंदाग्रज, बालकवी, दु. आ. तिवारी, रहाळकर, ना. के. बेहेरे, यशवंत, गिरीश, माधव ज्यूलियन, आनंदराव टेकाडे, देवदत्त टिळक, साने गुरुजी या वैविध्यपूर्ण प्रवृत्तींच्या कवींच्या कविता काव्यरत्नावलीतून प्रसिद्ध झाल्या.

५)     अलीकडील कविमंडळीनी चालविलेले कवितेचे मासिक पुस्तक हे बिरुद काव्यरत्नावलिच्या मुखपृष्ठावर छापलेलं असायचं. आपण समकालाचं, नव्या जाणिवांचं प्रतिनिधित्व करतो आहोत, याची नाना फडणीसांना पूर्ण जाणीव होती. त्या जबाबदारीच्या भावनेनेच त्यांनी काव्यरत्नावलि चालवलं आणि मराठीत रोमँटिक कवितेचा संप्रदाय रुजवला. इतर अनेक मासिके आधुनिक मराठी कवींची कविता आवर्जून प्रसिद्ध करीत. पण काव्यरत्नावलि हे आपले घरचे मासिक आहे असे कविमंडळीना वाटत असे. असं बा. द. सातोस्कर यांनी या मासिकाचा इतिहास लिहिताना म्हटलं आहे.

 

भांडवलाचा, तंत्रज्ञानाचा अभाव असताना आधुनिक तंत्रज्ञान उभारण्याचं आणि त्यातून मराठी साहित्याची सेवा करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या नाना फडणीस यांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून मराठी कवितेतली पहिली क्रांती ज्या जर्मन बनावटीच्या स्टीम प्रिंटिंग मशीनमधून बाहेर पडली, त्या यंत्राचं जतन करणारा मराठी साहित्यात कोणीतरी निपजावा ही अपेक्षा नक्कीच अनाठायी नाही. 

मराठीतल्या निरक्षर मानल्या गेलेल्या बहिणाबाई चौधरी या मोठ्या कवयित्रीने एका कवितेत नाना फडणीस आणि त्यांच्या या स्टीम प्रिंटिंग मशीनला आपल्या शब्दांनी अमर करून ठेवण्याचा द्रष्टेपणा केव्हाच दाखवला आहे. शिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या आम्हाला त्याचं मोल आहे की नाही, हाच प्रश्न आहे. लौकिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या बहिणाबाईंना जे सत्य जाणवलं ते आम्हाला न जाणवल्यास खरे निरक्षर कोण हा प्रश्न विचारून आपणच आपलं मूल्यमापन करावं.

मंमई बाजारावाटे

चाले धडाड-दनाना

असा जयगावामधी

नानाजीचा छापखाना

 

नानाजीचा छापखाना

त्यात मोठे मोठे पुठ्ठे

तसे शाईचे दराम

आन कागदाचे गठ्ठे

 

किती शिशाच्या चिमट्या

ठसे काढले त्यावर

कसे निंघती कागद

छापीसनी भरभर

 

चाले छाप्याचं यंतर

जीव आठे बी रमतो

टाकीसनी रे मंतर

जसा भगत घुमतो

 

मानसापरी मानूस

राहतो रे येडजाना

अरे होतो छापीसनी

कोरा कागद शहाना

बहिणाबाईंनी आपल्यासारख्या सुशिक्षित माणसाचं मूल्यमापन कदाचित आधीच करून टाकलं आहे : शब्दं छापली की कोरा कागदही शहाणा होतो,पण तो कागद वाचूनही माणूस मात्र येडजानाच राहतो.       

9 comments:

  1. खूपच महत्त्वाचा दस्तावेज या निमित्तानं तयार झाला
    धन्यवाद नीतीन

    ReplyDelete
  2. फार महत्त्वपूर्ण शोध।

    ReplyDelete
  3. फार महत्त्वपूर्ण शोध।

    ReplyDelete
  4. खूप महत्त्वाची नोंद.धन्यवाद सर.
    -अरुण ठोके

    ReplyDelete
  5. खूप महत्त्वाची नोंद.धन्यवाद सर.
    -अरुण ठोके

    ReplyDelete
  6. नितीन, नाना फडणीस यांचे योगदान अधोरेखित करतांना, ते मशीन जातं व्हावी ही आपण व्यक्त केलेली अपेक्षा रास्त आहे.
    कोणतेही नवे तंत्रज्ञान नव्या समाजाची उभारणी करीत असते याचे प्रत्यंतर आपल्या लेखातून पुन्हा एकदा लक्षात आले.
    खूप धन्यवाद
    खूप महत्वाची नोंद

    ReplyDelete
  7. नितीन, नाना फडणीस यांचे योगदान अधोरेखित करतांना, ते मशीन जातं व्हावी ही आपण व्यक्त केलेली अपेक्षा रास्त आहे.
    कोणतेही नवे तंत्रज्ञान नव्या समाजाची उभारणी करीत असते याचे प्रत्यंतर आपल्या लेखातून पुन्हा एकदा लक्षात आले.
    खूप धन्यवाद
    खूप महत्वाची नोंद

    ReplyDelete